'नाट्यक्षेत्रात एकट्यापुरती अ‍ॅम्बिशन उपयोगाची नाही'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 06:42 PM2018-06-22T18:42:23+5:302018-06-22T18:42:23+5:30

नाट्यचळवळीतल्या मित्रांशी मी आज जेव्हा बोलतो तेव्हा प्रायोगिक नाटकांमध्ये तरुणांच्या मनातली अस्वस्थता, खदखद बाहेर येतेय हे ऐकायला मिळतं.

Ratnakar matkari express his views about Marathi Theatre and Drama | 'नाट्यक्षेत्रात एकट्यापुरती अ‍ॅम्बिशन उपयोगाची नाही'

'नाट्यक्षेत्रात एकट्यापुरती अ‍ॅम्बिशन उपयोगाची नाही'

Next

रत्नाकर मतकरी यांच्या बालसाहित्यातील योगदानासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. गेली अनेक दशके बालसाहित्य, बालनाट्यचळवळ आणि साहित्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या रत्नाकर मतकरी यांची मुलाखत काही दिवसांपुर्वीच लोकमतमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्या मुलाखतीचा काही भाग येथे देत आहोत...

नाटक, सिनेमा आणि लेख-पुस्तकांमधून आजची पिढी काय करतेय हे दिसायला लागतं. नाट्यचळवळीतल्या मित्रांशी मी आज जेव्हा बोलतो तेव्हा प्रायोगिक नाटकांमध्ये तरुणांच्या मनातली अस्वस्थता, खदखद बाहेर येतेय हे ऐकायला मिळतं. पण माझ्या मते कोणीही लिहित असताना एखादी 'पोझ' घेऊन लिहू नये. इथं मला पोझ म्हणजे भूमिका अशा अर्थाने म्हणायचं नाही. भूमिका असली पाहिजे पण पोझ म्हणजे मी अमक्या लेखकासारखा लिहितो अशा समजुतीमध्ये जाऊन लेखकांनी लिहू नये. इन्स्पीरेशनसुद्धा इंडिपेडंट विचारांतून घेतलं तरच बरं. स्वत:ची विचार करण्याची क्षमता असूनही विनाकारण प्रभावित होणं मला योग्य वाटत नाही. चांगली शैली असूनही क्लिष्ट लिहिणं, उगाचच नवे शब्द तयार करणं, इंग्लिश शब्द वापरणं हे अयोग्य वाटतं. हां! आता ते नैसर्गिकरित्या आणि सहज येत असेल तर चांगलं आहे आणि एखाद्या लेखनात इंग्रजी शब्द सहज आले असतील तर ते समजतंही पण ते सगळं ओढून-ताणून केलेलं नसावं. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचं लेखन शक्य तेवढं स्वतंत्र हवं. लेखनासकट सर्व गोष्टी प्रामाणिक हव्यात. केवळ दिखाऊपणा, मी म्हणजे या 'लेव्हल'चा विचार करतो असा अभिनिवेश नको. विचार प्रामाणिक असला की बास. तो भले दुसऱ्यांना आवडणार नाही, पण तो माझा आहे एवढं पुरेसं आहे.

आज तरुण आजूबाजूच्या विषयांवर किंवा स्वत:च्या आयुष्यावर लिहीत आहेत. पण ते झालं की त्यांना एकदम रिकामपण येतं. वर्षानुवर्षे साधना केल्यासारखे काही जुने लेखक लिहायचे ते श्रेष्ठ ठरतात कारण ते सर्वच विषयांवर, सर्वच माणसांना सगळ््यांच वेळी कवेत घेऊ शकत होते. आता ते होत नाही. आता केवळ एखादा एकदम जवळचा विषय घेतला जातो. उदा: आई-वडिलांचा घटस्फोट हा एकदम जवळचा विषय घेऊन झाला की दुसरा पुढचा विषय उरत नाही. त्यानंतर त्यांचं लेखन होत नाही. हां. हे लेखन चांगलं असू शकतं कारण ते आतून जाणवून, पाहून लिहिलेलं असतं. त्या विषयाबद्दल त्यांची जवळीकता असते पण माझ्या मते ही जवळीकता संपूर्ण मानवजातीबद्दल वाटली पाहिजे अन्यथा तुम्ही तुमच्यापुरतेच मर्यादित राहाता. हा व्यक्तीवाद मला सगळीकडे दिसतो. आपला सगळा समाजच व्यक्तीवादी झाला आहे असं दिसतं. १९९१ नंतर म्हणजे जेव्हा खासगीकरण आणि जागतिकीकरण झाल्यापासून लोकांची आर्थिक भूक वाढली आणि माणसं व्यक्तीवादी झाली. मी माझं जास्तीत जास्त कसं बरं करु शकतो याचा विचार सुरु झाला. मग कुटुंबाचे विचारही मागे पडले. आपल्या कुटुंबात कोणी एकटं पडलंय तर त्याच्याशी बोलून त्याला सामावून घ्यावं किंवा एखाद्या उपेक्षिताला जवळ करुन त्याला वाढवून आपल्या पातळीवर आणावं हे विचार मागे पडले. मग आपल्या कल्पनेतील सुखाच्या आयुष्यात कॉम्प्लीकेशन्स यायला नकोत म्हणून मुलंसुद्धा नकोत असा विचार केला जातो. मधल्या काळात मुलं नोकरीसाठी अमेरिकेत जायची आता ती शिक्षणासाठी लहान वयातच तिकडे जाऊ लागली आहेत. त्यामुळे सगळ्यांना पुढच्या आयुष्यात एकदम एकटेपण यायला लागतं. एकदम वयस्कर माणसांना आधार नाही आणि एकदम तरुणांना संस्कार नाहीत अशा स्थितीत समाज सापजतो. याच व्यक्तीवादी बेटांचं प्रतिबिंब लेखन, नाटकातही दिसतं. मधल्या काळामध्ये लोकांची अभिरुची फारच खराब झाली. फॅशनच्या चुकीच्या संकल्पना आणि जे जे देशी, पारंपरिक ते वाईट असं काहीतरी मानण्यामुळे आपलं सगळं जुनाट ठरवलं गेलं. मग मुलांबद्दलच्या, कुटुंबाबद्दलच्या संकल्पना जशा तशा आपण स्वीकारल्या.
हा व्यक्तीवाद म्हणजे तरी काय तर प्रत्येकाने स्वत:च्या विकासाची दिशा ठरवून घेतली आहे. ती दिशा, तो विकास, ती वाढ म्हणजे फक्त आर्थिकच वाढ त्यांना अपेक्षित आहे. मी जास्त पैसे मिळवेन, जास्त चांगल्या नोकºया मिळवेन, वस्तू मिळवेन यासाठी झटापट चालू होते. त्यातून फ्रस्ट्रेशन येतं. कारण आजकालच्या नोकºयांमधील कामाचं स्वरुप, कामाची वेळ पाहिली की तुम्हाला दुसरं काही करताच येत नाही. लेखन-वाचनाची आवड असेल किंवा तुम्हाला मित्र-मैत्रिणी असतील तर त्यांना वेळ देता येत नाही. समोर फक्त पैसा असतो. स्वत:चं अधिक चांगलं होण्यासाठी, सतत वरच्या स्तरात जाण्याच्या या प्रवासात नकळत फ्रस्ट्रेशन येतं. तुम्ही करत असलेल्या स्पर्धेमध्ये तुम्ही किती तत्त्वांचा त्याग करणार याचा विचार करा म्हटलं की उत्तर येतं, स्पर्धेत राहायचं म्हणजे आम्हाला हे करावंच लागतं मग नाईलाजाने का होईना तत्त्व सोडून त्या कराव्या लागतात. या रॅटरेसमध्ये तुम्ही नक्की काय कमावत आहात आणि काय गमावत आहात याकडेही थोडं लक्ष असू द्या. प्रेस्टिजच्या नावाखाली फरपट कशाला करायची. एकमेकांचं पाहून, यालाही ती वस्तू मिळाली मग ती मला का नको? असा विचार कशाला करायचा? ज्या वस्तू मिळवायच्या आहेत त्यातल्या खरोखरच किती वस्तू तुम्हाला लागणार आहेत हेही थोडं पाहा ना...
मला दुसरा एक त्रासदायक प्रकार दिसतो तो म्हणजे प्रेक्षकांची अधोगती. गंभीर विषय, गंभीर हाताळणी नकोच असं त्यांना वाटतं. त्यापेक्षा आम्हाला काहीतरी हलकंफुलकं वरवरचं चटपटीत आवडून घेण्याची त्यांना सवय लागली आहे. त्यात भर घातली ती सीरियल्सने.  एकेकाळी मीही सिरियल केल्या होत्या पण जी गॉन विथ द विंड कादंबरी अडीच तासांच्या नाटक-सिनेमात बसू शकते ती अनेक भागांमध्ये का दाखवावी? आता तर मालिकांचे ५०० ते १००० भाग व्हायला लागले आहेत. आम्ही करायचो त्या १३ भागांच्या मालिका असतं. आता जितकं मूर्खपणा असेल तितका जास्त टीआरपी असं गणित आहे. आणि हे सगळ्याच क्षेत्रांमध्ये आहे. 

चांगले निर्माते गेले. पुर्वी पणशीकरांसारखा विद्वान माणूस जो निर्माता, चांगला अ‍ॅक्टर, वाचन असलेला, चांगल्या लेखकांशी संबंध असलेला निर्माता असे. पण आता सगळी इंडस्ट्री मॅनेजर्सच्या ताब्यात गेली आहे. मग डायरेक्टरच म्हणतो, कशाला लेखक पाहिजे. लेखक नकोच शक्यतो सेटवर आणि युनिटवर. मीच लिहून काढतो सिन्स झालं. त्याचप्रमाणे आपण सगळे मिळून काहीतरी एकत्र चांगली कलाकृती तयार करु हा विचारच संपला. मी माझं नाव मोठं करणार असा विचार होतो. थर्ड असिस्टंटला आपलं काम नीट करण्याच्या आधी डायरेक्टर होण्याचे वेध लागतात. हे सगळ्यांच्या बाबतीत आहे. व्ही. के. मूर्ती नावाचे उत्तम कॅमेरामन होते. त्यांनी गुरुदत्त, देवानंद अशांचे सिनेमे केले होते. त्यांना सगळे लोक विचारायचे, तुम्ही इतके चांगले काम करता मग दिग्दर्शन का करत नाही? पण त्यावर ते म्हणायचे, एवढ्या चांगल्या लोकांबरोबर मला काम करायला मिळतं. त्यांचा सिनेमा चांगला होण्यासाठी जितकं करता येईल तितकं मी करतोय की मग मी हे सोडून वेगळा डायरेक्टर होण्याची काय गरज आहे... आता बरोबर उलटं आहे. जरा कॅमेरा हाताळायला आला की ते डायरेक्टर होतात मग लेखकही होतात, मग तो गाणंसुद्धा लिहितो. अशी एकट्यापुरती अ‍ॅम्बिशन तेव्हा नव्हती. आम्ही सगळे एकत्र येऊन एक चांगली कृती करु अशी अ‍ॅम्बिशन तेव्हा होती. आम्हाला काय मिळेल असा विचारच नव्हता. पदरचे पैसे घालून आम्ही झोपडपट्टीत सुद्धा नाट्यचळवळ वाढावी यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आता सगळे सुटंसुटं काम करताना दिसतात. एक चांगला चित्रपट तयार होण्याऐवजी चार वाईट चित्रपट तयार होतात. यामुळेच आता संघटना नाहीत. लोक एकत्र येत नाहीत. ज्या मोठ्या गोष्टी व्हायला पाहिजेत त्या एकत्र येत नसल्याने होत नाहीत. प्रायोगिक नाटकांना जागा मिळत नाहीत म्हणून मी नाटक तुमच्या दारी संकल्पना सुचवली होती. सोसायटीचा हॉल, गच्ची यांवर ही थोड्या मदतीने हे प्रयोग करता आले असते. मोठी नाट्यगृहं भाड्याच्या दृष्टीने परवडत नाहीत. अशावेळी १००० जागांपैकी केवळ ३०० तिकीटं  गेल्याने नुकसान करण्यापेक्षा ३०० लोकांसाठीच लहान जागी नाटक करायला काय हरकत आहे?
 

Web Title: Ratnakar matkari express his views about Marathi Theatre and Drama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.