कारखान्यातून रसद पुरवल्याचा आरोप; राजेश टोपेंकडून पहिल्यांदाच सविस्तर खुलासा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 06:50 PM2024-02-27T18:50:39+5:302024-02-27T18:52:52+5:30

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या आरोपांबाबत राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधत सविस्तर खुलासा केला आहे.

Rajesh Tope explanation regarding the allegations made by the ruling party on Manoj Jarange Patils agitation | कारखान्यातून रसद पुरवल्याचा आरोप; राजेश टोपेंकडून पहिल्यांदाच सविस्तर खुलासा, म्हणाले...

कारखान्यातून रसद पुरवल्याचा आरोप; राजेश टोपेंकडून पहिल्यांदाच सविस्तर खुलासा, म्हणाले...

Rajesh Tope ( Marathi News ) : अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी विधानपरिषदेत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरुन भाजप नेते आणि माजी विरोधी पक्षनेते आमदार प्रविण दरेकर हे चांगलेच आक्रमक झाले होते. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप करत, आमदार राजेश टोपे यांच्या कारखान्यावर आंदोलनाचे षडयंत्र रचले जात होते, असा गंभीर आरोप प्रविण दरेकर यांनी केला. या आरोपाबाबत राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधत सविस्तर खुलासा केला आहे.

"माझ्यावरील कोणत्याही आरोपात सत्यता नाही. राजेश टोपेला जे लोक ओळखतात, त्यांना माहीत आहे की मी दंगल घडवणारा माणूस नाही, दगडफेक करणारा माणूस नाही, दगडफेकीला प्रोत्साहन देणारा माणूस नाही. अशा प्रकरणात खरंच एसआयटी नेमायला हवी का? हा प्रश्न आहे. मात्र आता एसआयटीमधून सर्व चित्र स्पष्ट होईल. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आम्ही दोन-दोन वर्षे यापूर्वी सामोरे गेलो आहोत. त्यावेळी आम्ही पोलीस प्रशासनाला आणि जिल्हाधिकाऱ्यांना संयमाने आणि सबुरीने हे आंदोलन हाताळण्याच्या सूचना देत होतो. ज्यावेळी लाठीचार्ज त्यावेळी मी तिथं जरूर गेलो. पण कशासाठी गेलो तर तिथं जे लोक जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेलो. तसंच काही रुग्णांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला न्यायचं होतं, यासाठी मी तिथं गेलो. काही लोकं तेव्हा भयभयीत होऊन उसात वगैरे गेले होते. त्यामुळे मी तिथं गेलो होतो. माझा दुसरा कोणताही उद्देश नव्हता," असं स्पष्टीकरण टोपे यांनी दिलं आहे.

एसआयटी गठित करण्याच्या सरकारच्या निर्णयाबद्दल बोलताना राजेश टोपे म्हणाले की, "चौकशीला बोलावलं तर मी नक्की जाईन. माझी काम करण्याची पद्धत जनतेला माहीत आहे. आम्ही कधी साधी मुंगीही मारली नाही. अशा पद्धतीचे आम्ही संवेदनशील लोक आहोत. आंदोलनस्थळापासून आमचा कारखाना पाच किलोमीटर अंतरावर आहे. एखाद्याची राहण्याची व्यवस्था नसेल तर आपण त्याला कारखान्यावर राहायला जागा उपलब्ध करून देतो. मीडियातील काही लोकंही गरेज असेल तेव्हा तिथे राहतात," असा दावा टोपे यांनी केला आहे.

Web Title: Rajesh Tope explanation regarding the allegations made by the ruling party on Manoj Jarange Patils agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.