पाऊस यावा म्हणून...निसर्गाची साथसंगत करा... !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 07:00 AM2019-05-26T07:00:00+5:302019-05-26T07:00:14+5:30

उकाड्याने हैराण झालेल्या सर्वांना प्रतिक्षा आहे पावसाची...

As rain coming ...friendship with nature ...! | पाऊस यावा म्हणून...निसर्गाची साथसंगत करा... !

पाऊस यावा म्हणून...निसर्गाची साथसंगत करा... !

Next

पाऊस येण्याची काही गणिते आहेत, आडाखे आहेत. ते कोणते, कसे, निसर्गातल्या घडामोडी आणि पावसाचे नाते काय, याबाबत राजू इनामदार यांनी ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्याशी साधलेला संवाद. 

................................

गप्पांच्या सुरवातीलाच डॉ. गाडगीळ यांनी प्रश्न केला, ‘पावसाच्या गप्पा मारायच्या?’ ‘पाऊस अनुभवायचा असतो हो’ असे उत्तरही त्यांनीच देऊन टाकले. पाऊस कमी झाल्याची ओरड होत असल्याचे सांगताच गाडगीळ म्हणाले, ‘‘लोकांना पाणी दिसेनासे झाले. त्यातून ही भावना निर्माण झाली. पाऊस आहे तेवढाच दरवर्षी पडत असल्याचे आकडेवारी सांगते. जिल्हा व तालुकास्तरावरील काही दिव्यपर्जन्यमापके सोडली तर ही आकडेवारी खरीही असते. पण पाऊस आणि पावसाचे पाणी दिसायचे बंद झाले व लोक तसे बोलू लागले. पुर्वी अगदी रस्तोरस्ती नाही, पण अनेक ठिकाणी चिखल असायचा. आम्ही ‘रूतला बाण’ नावाचा एक खेळ खेळायचे लहानपणी, त्यात लोखंडाची एक सळई उभी फेकून मारायची. ती रुतली की पुढे जायचे व खाली पडली की त्या मुलाने लंगडी घालत बाकीच्यांना आऊट करायचे. आता असे खेळता येईल का सांगा, सिमेंटच्या जंगलात लोखंडी सळई रूतवायला जागाच राहिलेली नाही. पुर्वी पाऊस मुरायचा, मुरून झाले की साचायचा, साचला की वाहू लागायचा, वाहिला की पुढची जागा ओलसर करायचा. ही प्रक्रियाच थांबली आहे. त्यामुळे पाऊस कमी झाला ही लोकांची ओरड सकारात्मक आहे व खरीही आहे.

पावसाच्या भाकितांमध्ये कितपत तथ्य आहे, असे विचारल्यावर म्हणाले, ‘‘कावळा व कोकीळ असे काही पक्षी उन्हाळ्याच्या काही दिवस आधी घरटी बांधतात. पावसाळ्यात किडे मोठ्या संख्येने मिळतात, तेच त्यांच्या पिल्लांचे अन्न असते. पावसाळ्यात पिल्ले खाऊ लागलीत इतकी मोठी होतील अशा अंदाजाने ते घरटी बांधतात. अशी घरटी दिसायला लागली की पावसाळा जवळ आला हे पक्के सांगता येते, मात्र पाऊस येणारच असे म्हणता येत नाही. कधीकधी ते बरोबर ठरते, व कधीकधी चूक! मात्र आपल्या ग्रामीण भागात अशाच अनेक ठोकताळ्यांवर गेली अनेक वर्षे शेती सुरू आहे. बेडकाचे ओरडणे, भूछत्रांचे उगवणे, मुंग्यांची वारूळे असे प्रत्येक ठिकाणी याचे प्रकार वेगवेगळे असतात, ते तिथल्या रुढी, परंपरा यावर आधारलेले असतात.’’

पर्वतराजी, वृक्षराजी व पाऊस यांचेही नाते फार जवळचे आहे. नैऋत्येकडून आलेले ढग सह्यगिरीच्या पर्वतरागांना धडकतात, मग ते वर वर जातात, थंड होतात. त्यांचे बाष्प होते व त्यानंतर ते द्रवरूप होऊन पाऊस पडतो. वारे सुटले नाही, ढग धडकले नाहीत, ते वरवर जाऊन थंड झाले नाहीत तर काय होईल हे सांगायला नको असे, म्हणत गाडगीळांनी पावसाचे गणित उलगडले. सूर्यप्रकाश जमिनीच्या पृष्ठभागावरून किती प्रमाणात शोषला जातो यावरही बरेच काही अवलंबून असते. ही निसर्गप्रक्रिया आहे. त्यात आपण अडथळे आणले नाही तर ती होत असते. अडथळे आणले तरीही होतच असते, पण मग तिची गती कमी होते. एखाद्या भागात पाऊस कमी होतो याचे कारण अडथळा आला हेच असते, असे त्यांनी सांगितले.

गाडगीळ अनेक वर्षे कर्नाटकात होते. पश्चिम घाटाच्या अभ्यासासाठी केलेल्या केंद्रीय समितीचे ते अध्यक्ष होते. कन्याकुमारीपासून ते गुजरात सीमेवरच्या थेट आपल्या सातपुडा पर्वतराजीपर्यंत पसरलेला पश्चिम घाट व पाऊस यांचा परस्पर संबध काय असा प्रश्न करताच गाडगीळांनी सुरुवात केली. ‘‘अहो फार मोठा संबंध आहे. आपण आता बसलो आहोत तो ‘पृथ्वीखंड’ २४ कोटी वर्षांपुवी तसा नव्हता. आपले नागपूरातील गोंडवन ते आफ्रिकेतील मदागास्कर बेटापर्यंत एकच एक खंड होता. १५ कोटी वर्षांपुर्वी या खंडाचे तुकडे झाले. त्याचा काही भाग उत्तरेकडे सरकायला लागला. साडेसहा कोटी वर्षांपुर्वी त्यातील काही भाग पश्चिम भागातील एका कवचाला धडकला. त्यातून ज्वालामूखी उसळला. तो लाव्हा रस थंड वातावरणात महाराष्ट्र, बेळगाव, गोवा, कर्नाटक, गुजरातेत डांग वगैरे असा पसरला व त्यातून पश्चिम घाट तयार झाला. तिथले पर्वत, त्यावरची वृक्षराजी आपले निसर्गवैभव आहे. त्याचा पावसाशी संबध आहेच, तो शास्त्रशुद्ध पद्धतीने सिद्ध व्हायला हवा, त्यासाठीच अभ्यास करणे गरजेचे आहे.’’

‘‘मानवाचे पृथ्वीवरील अस्तित्व दोन लाख वर्षांपुर्वीचे. त्याआधी कोट्यवधी जाती निसर्गात होत्या. मात्र मानवाला परशू म्हणजे लोखंड व अग्नी यांचा शोध लागला व त्याचा निसर्गात हस्तक्षेप सुरू झाला. कोकण किनारपट्टी म्हणजे मानवाचा निसर्गातील हस्तक्षेपच आहे. परशूरामाने समुद्र हटवला म्हणजे जागा तयार केली. तीच कोकण किनारपट्टी. निसर्गातही बदल होत होते, मात्र मानवाच्या अस्तित्वापुर्वी त्याची गती लाखो, हजारो वर्षांची होती. मानवाच्या हस्तक्षेपामुळे ही गती काही हजार वर्षापर्यंत आली व आता तर डांबर व काँक्रिट यांच्या बेसुमार वापरामुळे आपण उष्णतेची बेटं तयार करतो आहोत. त्याचा त्रास होणारच. पाऊस कमी झाला ही ओरड त्यातूनच आली. आकडेवारी तो कमी झाला नाही असे सांगत असली तरी त्याची ठिकाणं कळेल न कळेल अशी बदलत आहेत हे लक्षात घ्यायला हवे,’’ असे डॉ. गाडगीळ म्हणाले. आपल्याकडे अनेक ठिकाणी निसर्गाबद्दल जनजागृती होत आहे. काही कायदे होत आहेत. पाऊस नीट यावा असे वाटत असेल तर निसर्गाची साथसंगत करायला हवी. त्याला बाजूला सारून काही होणार नाही, हे आपल्या लक्षात येऊ लागले आहे, ही चांगली गोष्ट असल्याचा आशावादही त्यांनी व्यक्त केला. 

----(समाप्त)----

Web Title: As rain coming ...friendship with nature ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.