मराठा समाजातील वंचित, दुर्बलांच्या विकासासाठी ‘क्वॉलिटी सर्कल’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 01:45 AM2019-01-28T01:45:34+5:302019-01-28T06:43:41+5:30

कोल्हापुरात महासंघाच्या बैठकीत निर्णय; राजर्षी शाहू मराठा महोत्सव

'Quality Circle' for the development of deprived and destitute people in Maratha community | मराठा समाजातील वंचित, दुर्बलांच्या विकासासाठी ‘क्वॉलिटी सर्कल’

मराठा समाजातील वंचित, दुर्बलांच्या विकासासाठी ‘क्वॉलिटी सर्कल’

Next

कोल्हापूर : उद्योग-व्यवसाय, शिक्षण, कृषी अशा विविध क्षेत्रांतील अनुभवी, गुणवत्तापूर्ण व्यक्तींचा संग्रह (क्वॉलिटी सर्कल) तयार करून त्याद्वारे समाजातील वंचित, दुर्बलांचा विकास साधण्याचा निर्णय शुक्रवारी येथे झाला. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राज्यस्तरीय बैठकीत जिल्हानिहाय मेळावे, जात प्रमाणपत्रांसाठी शिबिरांचे आयोजन, आदींबाबत ठराव केल्याची माहिती महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी दिली.

कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवनमध्ये शुक्रवारी राजर्षी शाहू मराठा महोत्सवात महासंघाची राज्यस्तरीय बैठक झाली. बैठकीला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायक पवार, संयुक्त सरचिटणीस दिलीप जगताप प्रमुख उपस्थित होते. कोंढरे म्हणाले, मराठा समाजातील बांधवांनी दुर्बल, वंचितांना विकासासाठी मार्गदर्शन करावे, यासाठी क्वॉलिटी सर्कलची स्थापना केली जाईल. पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र, मुंबईतील अनुभवी, गुणवत्तापूर्ण व्यक्तींचा संग्रह, संघटन केले जाणार आहे. त्याद्वारे समाजाची संघटनात्मक बांधणी केली जाणार आहे. महामंडळाचे उपाध्यक्ष पाटील म्हणाले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज प्रकरणे होत आहेत. थकबाकी हमीला मान्यता दिली आहे. युवक आणि बँकांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी महासंघाने पार पाडावी. महासंघाच्या १९ जिल्हाअध्यक्षांनी त्यांच्या तीन महिन्यांतील कामगिरीचा अहवाल सादर केला. विविध ठराव मंजूर करण्यात आले.

बैठकीतील ठराव
‘सारथी’ संस्थेचे काम शिवजयंतीपूर्वी सुरू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार.
महासंघाचे जिल्हानिहाय मेळावे फेब्रुवारीपासून घेणे.
दुष्काळग्रस्त भागातील बांधवांसाठी विविध संस्था, समितींद्वारे मदत करणे.
मराठा, कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी शिबिरे घेणे.
विद्यार्थ्यांसाठी मराठा शिष्यवृत्ती फंड निर्माण करणे.
आरोग्य सेवेच्या मदतीसाठी ट्रस्ट स्थापन करणे.

Web Title: 'Quality Circle' for the development of deprived and destitute people in Maratha community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathaमराठा