राज्याच्या राजकारणात लवकरच नवी समीकरणे जन्माला येतील- पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 05:35 PM2018-01-28T17:35:28+5:302018-01-28T17:36:19+5:30

राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे आणि गणिते मांडण्याची वेळ आलेली आहे. देशाच्या राजकारणाचे चित्र बदलण्यासाठी एकत्र येण्याची वेळ आली आहे.

Prithviraj Chavan, the new state of state politics will soon be born | राज्याच्या राजकारणात लवकरच नवी समीकरणे जन्माला येतील- पृथ्वीराज चव्हाण

राज्याच्या राजकारणात लवकरच नवी समीकरणे जन्माला येतील- पृथ्वीराज चव्हाण

Next

पुणे : राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे आणि गणिते मांडण्याची वेळ आलेली आहे. देशाच्या राजकारणाचे चित्र बदलण्यासाठी एकत्र येण्याची वेळ आली आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत संभाजी काकडे यांनी मार्गदर्शन करावे. त्यांनी घरामधून कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन मार्गदर्शन केल्यास देशाचे चित्र वेगळे दिसू शकेल, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

लोकनेते संभाजीराव काकडे गौरव समितीच्या वतीने काकडे यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चव्हाण बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिहारचे माजी राज्यपाल डी. वाय. पाटील होते. यावेळी मंचावर महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, डॉ. बाबा आढाव, रत्नाकर महाजन, बाळासाहेब शिवरकर, प्रकाश आंबेडकर, संभाजी काकडे, कंठावती काकडे, दादा जाधवराव, अनंत थोपटे, प्रकाश देवळे, बुवा नलावडे, डॉ. तोडकर, समितीचे अध्यक्ष प्रकाश भोईटे उपस्थित होते. यावेळी काकडे यांचा सन्मानचिन्ह, मानपत्र आणि पुष्पहार घालून विशेष सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. आढाव यांनी सर्वांना महात्मा फुलेंची सत्य सर्वांचे आदीघर ही प्रार्थना सांगितली.

चव्हाण म्हणाले, काकडे यांच्याशी माझ्या कुटुंबाचा अनेक दशकांचा स्नेह आहे. बाबालाल काकडे आणि संभाजी काकडे यांच्या निरा आणि पुण्यातील घरी अनेकदा जेवणाची संधी मिळाली. काकडे यांचे राज्याच्या तसेच दिल्लीच्या राजकारणात मोठे वजन होते. मोरारजी देसाई, व्ही. पी. सिंग, चंद्रशेखर या तिन्ही पंतप्रधानांसोबत त्यांचे घनिष्ट संबंध होते. त्यांनी समाजकारणासाठी मंत्रिपद नाकारले. त्यांनी उत्तम जनसंपर्कातून कार्यकर्ते घडवले. त्यांनी घडविलेल्या कार्यकर्त्यांची यादी मोठी आहे. कंठावतीताईंनी केलेल्या आदरातिथ्याला तोड नसल्याचे ते म्हणाले. पाटील म्हणाले, काकडे यांनी अहंकार बाजूला ठेवून काम केले. कसलीही अपेक्षा न ठेवता समाजकारणही केले. माणूस म्हणून त्यांचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग आहे. कार्यकर्त्यांना जिव्हाळ्याने जपणारा हा नेता आहे.

सत्काराला उत्तर देताना काकडे म्हणाले, सच्चाईने वागणे हाच जीवनाचा मंत्र आहे. आमच्या कुटुंबाच्या शेजारी दलित कुटुंबाचे घर होते. या कुटुंबातील कोंडिबासोबत मी जेवण करीत असे. मी घरी नसताना माझी तेवढ्याच प्रेमाने त्याला जेवायला वाढायची. कधीही जात-पात पाहिली नाही. ग्रामीण भागात असे पर्यंत जात-धर्म माहिती नव्हता. मात्र, शहरात आल्यावर जात समजायला लागली. कोरेगाव-भीमा येथे घडलेली घटना दुर्दैवी असून हे दुहीचे द्योतक आहे. नोटबंदी आणि जीएसटीने देशाचे वाटोळे केले. शेतक-यांचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. देशातील एक टक्का लोकांकडे ७३ टक्के संपत्ती असेल तर आपण कुठे चाललोय याचा विचार करावा लागेल. संत तुकारामांच्या वचनांनाच संदेश मानत डॉ. बाबा आढाव यांच्याकडून समाजसेवेचे धडे घेतले. त्यानंतर राजकारणात आलो. रसिकलाल धारीवाल आणि नानासाहेब परुळेकर यांच्या आग्रहाने पहिली निवडणूक जिंकलो. संपत्ती ही विनाशाकडे नेणारी असते. संपत्तीच्या मागे लागू नका. पत्नीशी विवाह तिला न पाहताच केला. मात्र, तिच्याकडून कधीही हट्ट नाही, त्रास नाही. तिने खंबीर साथ दिल्याचे काकडे यावेळी म्हणाले. या सत्काराच्या निमित्ताने नवी ऊर्जा मिळाली असून मला दीर्घायुष्यापेक्षाही समाजाची सेवा करण्याची आणखी संधी मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बापट म्हणाले, राज्याच्या राजकारणात ६० वर्षांपेक्षा अधिक काळ काकडेंनी काम केले आहे. कार्यकर्त्यांवर प्रेम करणारा असा लोकप्रिय नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सर्व पक्षांतील कार्यकर्त्यांशी त्यांचा उत्तम संपर्क आहे. त्यांच्याकडे संकुचितपणाला थारा नाही. यावेळी महापौर टिळक, हर्षवर्धन पाटील, दादा जाधवराव, अनंत थोपटे आणि डॉ. बाबा आढाव यांनी मनोगत व्यक्त केले. सदानंद शेट्टी यांनी प्रास्ताविक केले. तर सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. आभार प्रदर्शन बुवा नलावडे यांनी मानले.
===========
गौरव समितीने आपला उल्लेख लोकनेता असा केला आहे. मात्र, आपण लोकांना गाड्या भरुन आणतो, मिष्टान्न खाऊ घालतो म्हणून आपण लोकनेते ठरत नाही. डॉ. बाबा आढाव हा एकच लोकनेता असून कष्टक-यांना न्याय देणारा समाजसेवक आहे. बारामतीकरांनाही आजकाल लोकनेता म्हणून घ्यायची सवय लागली असल्याचे सांगत काकडे यांनी शरद पवारांना चिमटा काढला.
===========
डॉ. बाबा आढाव यांनी भाषणाची विनंती केल्यामुळे काकडे यांच्या पत्नी कंठावती काकडे यांना निवेदन सुधीर गाडगीळ यांनी जेवणाच्या आवडीबद्दल आणि वेळ देण्याबद्दल प्रश्न विचारले. तेव्हा, काकडे यांना शाकाहारी जेवण आवडायचे, ते घरी खूप कमी वेळ देत असत. कधी कधी जेवायला असायचे असे सांगितले. क्रिकेट सामने पहायला आपल्याला आजही आवडते असेही त्यांनी स्पष्ट केले. काकडे यांना रमी खेळायची आवड असली तरी ती विरंगुळा म्हणून खेळत असत असेही त्या म्हणाल्या.

Web Title: Prithviraj Chavan, the new state of state politics will soon be born

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.