मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात 5  ते 14 ऑक्टोबरदरम्यान अतिवृष्टीचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 11:42 AM2017-10-03T11:42:57+5:302017-10-03T12:44:16+5:30

राज्याच्या मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात  5 ते 14 ऑक्टोबरदरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता काही हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

The prediction of extreme rainfall in Marathwada, Vidarbha and central Maharashtra from October 5 to 14 | मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात 5  ते 14 ऑक्टोबरदरम्यान अतिवृष्टीचा अंदाज

मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात 5  ते 14 ऑक्टोबरदरम्यान अतिवृष्टीचा अंदाज

Next

मुंबई - राज्याच्या मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात  5 ते 14 ऑक्टोबरदरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता काही हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या काळात शेतकरी बांधवांनी कापणी केलेला अथवा कापणीयोग्य शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले आहे. अतिवृष्टीमुळे खरिपाचे उत्पादनास नुकसान होऊ शकते. सध्या कापणीयोग्य असलेल्या शेतमालास त्यामुळे फटका बसु शकतो. शेतकरी बांधवांच्या शेतमालाचे नुकसान टाळावे, यासाठी त्यांनी हा शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. तसेच जेथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा तसे नियोजन केले असेल तर तो माल व्यवस्थितपणे झाकून ठेवावा. अतिवृष्टीमुळे शेती मालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी नियोजन करावे, असे आवाहनही कृषिमंत्र्यांनी केले आहे. 

यावेळई विजांचा कडकडाट होऊन वीज कोसळण्याच्या दुर्घटनादेखील घडू शकतात. अशा वेळी ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी बांधवांनी स्वत:चा आणि जनावरांचा विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळं मैदान, झाडाखाली, पत्र्याच्या शेडमध्ये, विजवाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मर जवळ थांबू नये. 5 ते 14 ऑक्टोबर याकाळात मुंबई आणि कोकण पट्ट्यातदेखील पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला.

कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, आॅक्टोबर हीट जाणवू लागली

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, सोमवारी उत्तरकाशी, आग्रा, शिवपूर कल्याण, गांधीनगर, द्वारका या परिसरातून तो माघारी फिरला. येत्या ४८ तासांत तो गुजरात, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेशातून माघारी परतण्याची शक्यता आहे़ दरम्यान, येत्या दोन दिवसांत दक्षिण कोकणात काही ठिकाणी मुसळधार, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

गेल्या २४ तासांत कोकणात, म्हसाळा ११०, वैभववाडी ९०, लांजा ७०, संगमेश्वर, देवरुख ६०, देवगड ५०, मंडणगड, श्रीवर्धन ४० मिमी पावसाची नोंद झाली आहे़ मध्य महाराष्ट्रात गगनबावडा ४०, गारगोटी, भुदरगड ३०, आजरा, पन्हाळा २० मिमी पाऊस झाला़ मराठवाड्यातील उदगीर ३० आणि विदर्भातील आमगाव, देवरी ५०, भामरागड, झरीजामनी ४० मिमी पाऊस झाला.

मान्सूनची माघार सुरू झाली असतानाच वातावरणातील आर्द्रता मात्र कायम असल्याने उष्मा वाढला आहे़ त्यामुळे राज्यात अनेक शहरांमध्ये आॅक्टोबर हीट जाणवू लागली आहे़ विदर्भातील अनेक शहरांतील कमाल तापमान ३४ ते ३६अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे़ पुण्यात रविवारी कमाल तापमान ३४़६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते.

 

Web Title: The prediction of extreme rainfall in Marathwada, Vidarbha and central Maharashtra from October 5 to 14

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.