चौथ्या टप्प्यात १५ खासदारांची परीक्षा, १७ मतदारसंघांत सोमवारी मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 04:12 AM2019-04-28T04:12:07+5:302019-04-28T04:13:46+5:30

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील १७ मतदारसंघांत सोमवारी मतदान होत असून, शनिवारी सायंकाळी प्रचारतोफा थंडावल्या.

Polling for 15 MPs in the fourth phase, polling in 17 constituencies on Monday | चौथ्या टप्प्यात १५ खासदारांची परीक्षा, १७ मतदारसंघांत सोमवारी मतदान

चौथ्या टप्प्यात १५ खासदारांची परीक्षा, १७ मतदारसंघांत सोमवारी मतदान

googlenewsNext

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील १७ मतदारसंघांत सोमवारी मतदान होत असून, शनिवारी सायंकाळी प्रचारतोफा थंडावल्या. या टप्प्यात सर्वाधिक विद्यमान १५ खासदार पुन्हा आपले भाग्य आजमावित आहेत. मुंबई, ठाणे पालघरसह परिसरातील शहरी मतदारांचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. धुळ्यात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची कसोटी लागणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार मावळमधून रिंगणात उतरला आहे.

उत्तर पूर्व मुंबई : मराठी मतांवर भाजप-राष्ट्रवादीची भिस्त
मुंबई : भाजपमधील अंतर्गत वाद आणि शिवसेनेच्या दबावापोटी किरीट सोमय्या यांना उमेदवारी नाकारल्याने उत्तर पूर्व मुंबई मतदार संघ चर्चेत आला. हा गड काबीज करण्यासाठी राष्ट्रवादीने ‘मराठी विरुद्ध अमराठी’ हा प्रचाराचा मुद्दा बनवला. मनसेच्या सभेमुळे मराठी टक्का वळल्याचा दावा आघाडीचे उमेदवार संजय पाटील यांनी केला आहे. भाजपचे उमेदवार मनोज कोटक यांनी विकासावर जोर देत, मी ‘अस्सल मराठी’ म्हणत प्रचार केला. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची बनली. कोटक यांच्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनीही रोड शो करत, आम्ही एक आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न केला. या मतदारसंघातील गुजराती मतांवर भाजपची भिस्त आहे. उत्तर भारतीय मतांत मात्र फाटाफूट होईल, असा दोन्ही पक्षांचा दावा आहे.

उत्तर मध्य मुंबई : महाजन व दत्त यांच्यात ‘काँटे की टक्कर’
मुंबई : प्रमोद महाजन यांच्या कामाच्या पुण्याईचा दाखला देणाऱ्या भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांच्या कार्याची ओळख सांगणाºया त्या पक्षाच्या माजी खासदार प्रिया दत्त यांच्यात उत्तर मध्य मुंबईत लढत असली, तरी वंचित बहुजन आघाडीचे डॉ. अब्दुल रहमान अंजारीया किती मते घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. महाजन आणि दत्त या दोन्ही उमेदवारांचा मतदारसंघाशी संपर्क नसल्याचा आक्षेप होता. काँग्रेसने संविधान व देश वाचविण्याची हाक दिली आहे, तर भाजपने पाच वर्षांत केलेली विकासकामे समोर ठेवून प्रचार केला आहे. या मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांपैकी तीन ठिकाणी शिवसेनेचे, दोन ठिकाणी भाजपचे, तर एका ठिकाणी काँग्रेसचा आमदार आहे.

दक्षिण मध्य मुंबई : साऱ्यांच्या नजरा दादर आणि धारावीवर
मुंबई : दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे आणि काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांच्यात थेट लढत आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे मतविभागणीचा धोकाही आहे. येथे सलग दुसºयांदा विजय मिळवता येत नाही, हे मिथक गायकवाडांनी २००४ आणि २००९ च्या विजयाने तोडले होते. हाच कित्ता गिरविण्याच्या प्रयत्नात सध्या शेवाळे आहेत. या मतदारसंघातील सत्तेचे गणित धारावी आणि दादरच्या मतदानावर अवलंबून असते. दादरकर मैदानात उतरले तर शिवसेनेची सत्ता आणि धारावीत मतदानाचा टक्का वाढला की काँग्रेसची सरशी, असे साधारण गणित आहे. यंदा मात्र मनसेमुळे शिवसेनेला दादरची साथ मिळणार नाही, असा काँग्रेसचा अंदाज आहे. ही मते फुटू नयेत, यासाठी शेवाळे प्रयत्नशील आहेत. त्यामुळे चुरस वाढली आहे.

उत्तर मुंबई : ‘मुंबईच्या पोरी’चं चौकीदाराला आव्हान
मुंबई : अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर काँग्रेसतर्फे रिंगणात उतरल्याने भाजपच्या भक्कम गडाला धक्के बसले. २००४ साली गोविंदाने राम नाईक यांचा केलेला पराभव भाजपच्या जिव्हारी लागला होता. आता भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टींसमोर ऊर्मिला यांनी आव्हान उभे केले आहे. कार्यकर्ता ते खासदार असा प्रवास केलेल्या शेट्टी यांनी मतदारसंघ उत्तम बांधला आहे. सुरुवातीला ऊर्मिला यांच्या उमेदवारीला भाजपने फारसे गांभीर्याने घेतले नव्हते. मात्र उच्चभ्रूच नव्हे, तर गरीब वस्त्यांतही जाऊन ऊर्मिला यांनी सहजसंवाद सुरू केल्याने नंतर त्यांच्या प्रचारसभेत घुसून भाजप कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळाची चर्चा झाली. भाजपइतकी संघटनात्मक ताकद नसली, तरी ऊर्मिला यांनी शेट्टी यांच्यापुढे आव्हान उभे केल्याची चर्चा रंगली. ऊर्मिला आणि शेट्टी यांच्या प्रचारात सोशल मीडियाने रंगत आणली आहे. प्रचाराच्या वेगापेक्षा अधिक वेगाने सोशल मीडियावर एकमेकांवर टीका केली जात आहे. ऊर्मिला या ‘मुंबईची मुलगी’ म्हणून ट्रेंडिगमध्ये आहेत, तर शेट्टी हे ‘मुंबईचा चौकीदार’ म्हणून चर्चेत आहेत.

पालघर : मनोमिलन महत्त्वाचे ठरणार
पालघर : शिवसेनेने भाजपकडून भांडून मिळविलेला आणि तेथे भाजपचाच खासदार उमेदवार म्हणून रिंगणात उतरविल्याने पालघरकडे सर्वांचे लक्ष आहे. युतीचे उमेदवार राजेंद्र गावित आणि बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्यात येथे चुरशीची लढत आहे. गेल्या वर्षी येथे झालेली पोटनिवडणूक प्रतिष्ठेची करत, शिवसेनेने भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचा मुलगा श्रीनिवास यांना उमेदवारी दिली होती. मात्र, भाजपच्या राजेंद्र गावितांनी बाजी मारली. हा मतदारसंघ शिवसेनेला सोडल्याने भाजपमध्ये, तर भाजपचा उमेदवार घेतल्याने सेनेत नाराजी आहे. बविआला काँग्रेस-राष्ट्रवादी, रिपाइं (कवाडे गट), मनसे, माकप आदींनी पाठिंबा दिल्याने लढतीत दिवसेंदिवस रंग भरत आहेत.

भिवंडी : शिवसेनेचं काय ठरलंय?
भिवंडी : या लोकसभा मतदारसंघातील लढत भाजपचे कपिल पाटील आणि काँग्रेसचे सुरेश टावरे यांच्यात आहे. दोन्ही उमेदवार आगरी समाजाचे आहेत. मतदारसंघात मोठ्या संख्येने मुस्लीम मतदार आहेत, तर कल्याण पश्चिमेतील पारंपरिक मतांवर भाजपची मदार आहे. भिवंडीत शिवसेनेतून बंडखोरी केलेला गट भाजपविरोधात काम करत असल्याने आणि ‘आमचं ठरलंय’ असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने त्याबाबत उत्सुकता आहे. कुणबी मतांतील फाटाफूट, उत्तर भारतीय मतदारांचा बदललेला कल, यामुळे दोन्ही उमेदवार अटीतटीने लढत आहेत. नोटाबंदीचा फटका बसलेला यंत्रमाग उद्योग - कामगार आणि गोदाम मालकांची लॉबी नेमका काय विचार करते, तेही महत्त्वाचे ठरणार आहे.
 

ठाणे : आजी-माजी शिवसैनिकांमध्ये सामना
ठाणे : एकेकाळी शिवसेनेत असलेले आणि आता राष्ट्रवादीत असलेले आनंद परांजपे आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांच्यातील लढतही दिवसेंदिवस चुरशीची होत गेली. २००९ च्या निवडणुकीत गुन्हेगारी विरुद्ध सुशिक्षित उमेदवार अशी लढत या मतदारसंघात झाली होती. शिक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापले. त्यानंतर, पालिकेतील भ्रष्टाचारप्रकरणी नंदलाल समितीचा मुद्दाही गाजला होता. विद्यमान पालकमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या राजकीय संघर्षाची लढाई म्हणूनही या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. नवी मुंबईतील राष्ट्रवादीचा वरचष्मा, ठाण्यातील युतीचा पारंपरिक मतदार, मीरा-भार्इंदरमध्ये भाजपने लावलेली ताकद या साऱ्यांचा नेमका काय परिणाम होतो, ते पाहणे औत्सुक्याचे आहे.

मावळ : पवार घराण्याच्या प्रतिष्ठेची लढाई
पिंपरी : मावळ लोकसभेतील शिवसेनेची हॅट्ट्रिक रोखण्यासाठी राष्ट्रवादीने दस्तुरखुद्द माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याला रिंगणात उतरविले. त्यामुळे महायुतीचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यासाठी निवडणूक आव्हानात्मक आहे. पार्थ यांच्यासाठी अवघे पवार कुटुंबीय मावळात तळ ठोकून आहेत. शिवाय राज्यभरातून अजित पवार यांचे समर्थक आजी-माजी आमदारांनी ताकत दिली आहे. तर बारणे यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्या. पालकमंत्री गिरीश बापट, गिरीश महाजन तळ ठोकून आहेत. बारामतीकरांना परत पाठवा, अशी युतीची अन् कार्यक्षम उमेदवार निवडून देण्याची महाआघाडीची मागणी आहे.

शिरूर : आढळराव पाटील आव्हान पेलणार का?
पुणे : शिरूरमध्ये विजयाची हॅट्ट्रिक मारलेले शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने माजी शिवसैनिक, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना उभे करत आव्हान दिले आहे. आढळराव यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मंत्री पंकजा मुंडे व गिरीश बापट यांनी सभा घेतल्या, तर डॉ. अमोल कोल्हे यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. मधुकर पिचड यांनी सभा घेतल्या. विमानतळ, बैलगाडा शर्यती, वाहतूककोंडी हे मुद्दे कोल्हे यांनी निवडणुकीत प्रतिष्ठेचे केले आहेत. तर आतापर्यंत केलेली विकासकामे यावर आढळराव पाटील यांची प्रचाराची मुख्य भिस्त आहे.


नंदुरबार : आदिवासींचा कौल कुणाला?
नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात एकूण ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले, तरी खरी लढत विद्यमान खासदार व भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावीत व काँग्रेसचे अ‍ॅड. के. सी. पाडवी यांच्यातच आहे. भाजपचे डॉ. सुहास नटावदकर यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. प्रचार काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा घेण्यात आल्या, तर काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची सभा झाली. वंचित बहुजन आघाडीतर्फे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची सभा झाली. भाजप आणि काँग्रेसने वैयक्तिक संपर्क व कोपरा सभांवर भर देऊन प्रचारात रंगत आणली. इतर उमेदवारांमध्ये बसपा, भारतीय ट्रायबल पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी व पाच अपक्ष उमेदवार आहेत.

धुळे : मतांच्या विभाजनामुळे निर्माण झाली प्रचंड चुरस
धुळे : भाजपचे विद्यमान खासदार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्या लढत होत आहे. मात्र, भाजपचे बंडखोर उमेदवार आमदार अनिल गोटे यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत रंगत आली आहे. मतदारसंघात भाजपतर्फे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि काँग्रेसतर्फे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांची प्रचारसभा झाल्याने दोन्ही पक्षाने ही लढत प्रतिष्ठेची केली आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीतर्फे मालेगावचे राष्टÑवादीचे नगरसेवक नबी अहमद तर बसपातर्फे नंदुरबारचे माजी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय अपरांती हे उमेदवार आहेत. या दोघांमुळे दलित व अल्पसंख्याक समाजाच्या मतांची विभागणी होणार आहे, तर भाजप आणि काँग्रेसने मराठा उमेदवार दिल्याने मतदारसंघातील मराठा मतांचेही विभाजन निश्चित होईल. यामुळे निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे.

दिंडोरी : नाराजांची समजूत कोण काढणार?
नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदार संघात युती विरुद्ध आघाडी विरुद्ध माकपा असे तिरंगी चित्र असले, तरी ठरावीक भागापुरते माकपचे वर्चस्व पाहता, खरी लढत युतीच्या डॉ. भारती पवार व आघाडीचे धनराज महाले या दोघांमध्येच होत आहे. आदिवासी व बिगर आदिवासी अशा संमिश्र मतदारसंघामधून यंदा भाजपचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना पक्षाने तिकीट नाकारले. त्यांच्याऐवजी राष्टÑवादीतून आयात केलेल्या भारती पवार यांना उमेदवारी दिली. त्यामुळे चव्हाण पक्षावर नाराज आहेत. राष्टÑवादीनेदेखील शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिल्याने पक्षांतर्गंत नाराजी आहे. अशा परिस्थितीत माकपचे आमदार जीवा पांडू गावीत यांनी आदिवासी मतदारांच्या बळावर उमेदवारी करून आघाडीला अडचणीत टाकले आहे.


शिर्डी : श्रद्धा-सबुरी की बंडखोरी जिंकणार?
शिर्डी : लोकसभा मतदारसंघात २० उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसचे श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे आणि शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यात लढत आहे. भाजपचे बंडखोर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मैदानात उडी घेऊन आव्हान उभे केले आहे. शरद पवार, राहुल गांधी, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात सभा झाल्या. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिष्ठेची केलेली लढत आणि राधाकृष्ण विखे यांची शिवसेनेला असलेली साथ यामुळे येथील लढत लक्षवेधी ठरली आहे. विखे-थोरात यांच्यात प्रतिष्ठेचा सामना आहे.

Web Title: Polling for 15 MPs in the fourth phase, polling in 17 constituencies on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.