विशेष सुरक्षा विभागात पोलीस अधिकाऱ्यांची वयोमर्यादा निश्चित; गृहविभागाचा नवीन अध्यादेश जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 08:59 PM2018-08-30T20:59:54+5:302018-08-30T21:00:14+5:30

विशेष सुरक्षा विभाग घटक, मुंबई कार्यालयाच्या आस्थापनेवर कर्तव्य बजावण्यासाठी पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक आणि पोलीस शिपाई यांच्या नियुक्तीबाबत वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 

Police officers age limit in Special Security department; Home Ordinance New Ordinance Issue | विशेष सुरक्षा विभागात पोलीस अधिकाऱ्यांची वयोमर्यादा निश्चित; गृहविभागाचा नवीन अध्यादेश जारी

विशेष सुरक्षा विभागात पोलीस अधिकाऱ्यांची वयोमर्यादा निश्चित; गृहविभागाचा नवीन अध्यादेश जारी

googlenewsNext

- चेतन घोगरे

अमरावती : विशेष सुरक्षा विभाग घटक, मुंबई कार्यालयाच्या आस्थापनेवर कर्तव्य बजावण्यासाठी पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक आणि पोलीस शिपाई यांच्या नियुक्तीबाबत वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 
३५ वर्षांखालील पोलीस उपअधीक्षक व पोलीस उपनिरीक्षक या सेवेत उपलब्ध होऊ शकतात. परंतु, पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक तसेच पोलीस हवालदार व पोलीस नाईक या संवर्गात ३५ वर्षांखालील पोलीस अधिकारी व अंमलदार मिळणे अत्यंत कठीण झाले होते. यामुळे विशेष सुरक्षा विभागातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार व पोलीस नाईक ही पदे रिक्त राहत होती. परिणामी मनुष्यबळाअभावी ३५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे अधिकारी व अंमलदार विशेष सुरक्षा विभागात प्रतिनियुक्तीवर घ्यावे लागत होते. अपु-या मनुष्यबळामुळे वर्गीकृत संरक्षित व्यक्तींच्या संरक्षणासाठी पूर्ण संख्येने मनुष्यबळ विशेष सुरक्षा विभागाला पुरवता येत नव्हते.
पोलीस शिपाई ते पोलीस नाईक पदावर पदोन्नती मिळण्याकरिता १२ ते १५ वर्षांचा कालावधी लागतो. पोलीस नाईक ते पोलीस हवालदार पदावर पदोन्नती मिळण्याकरिता किमान ९ ते १० वर्षे कालावधी लागतो. या कालावधीत पोलीस नाईक, पोलीस हवालदार वर्गातील अंमलदाराचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त होते. यामुळे विशेष सुरक्षा विभागाला ३५ वर्षाखालील पोलीस नाईक, हवालदार  उपलब्ध होत नव्हते. याशिवाय ज्या पोलीस नाईक अंमलदाराचे ३५ पेक्षा कमी आहे, असे पोलीस नाईक वर्गातील सर्व अंमलदार विशेष सुरक्षा विभागात कर्तव्य बजावण्यास इच्छुक असतीलच असे नाही.  त्यामुळे विशेष सुरक्षा विभाग घटक कार्यालयाच्या आस्थापनेवर नियुक्तीसाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या वयासंबंधी अटी-शर्तीमध्ये गृहविभागाकडून सुधारणा करण्यात आली आहे. 

प्रतिनियुक्तीसाठी पोलीस अधिकारी, कर्मचा-यांची नवीन वयोमर्यादा
अधिकारी                   वयोमर्यादा
पोलीस उपअधीक्षक        - ३५ वर्षे
पोलीस निरीक्षक        - ४५ वर्षे
सहायक पोलीस निरीक्षक    - ४५ वर्षे
पोलीस उपनिरीक्षक        - ३५ वर्षे 

कर्मचारी                  वयोमर्यादा
पोलीस हवालदार        - ४५ वर्षे
पोलीस नाईक        - ४० वर्षे
पोलीस शिपाई        - ३५ वर्षे

विशेष सुरक्षा विभागात निवड करते कोण? 
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा पुरविण्यासाठी गठित विशेष सुरक्षा विभागात निवडीसाठी अधिकारी कर्मचाºयांबाबत बक्षिसे, शिक्षा, विभागीय चौकशी व मानसिक संतुलन हे चार निकष तपासले जातात. राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्तांकडून त्यांची निवड केली जाते. यासाठी आॅनलाइन अर्ज मागविले जातात.

Web Title: Police officers age limit in Special Security department; Home Ordinance New Ordinance Issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस