धान संशोधक दादाजी खोब्रागडे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2018 09:14 PM2018-06-03T21:14:29+5:302018-06-03T21:14:29+5:30

तांदळाचे संशोधक म्हणून देशात प्रसिद्ध असणारे नागभीड तालुक्यातील नांदेड येथील दादाजी खोब्रागडे यांचे रविवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास गडचिरोली येथील सर्चमध्ये उपचारादरम्यान निधन झाले.

 Paddy researcher Dadaji Khobragade passed away | धान संशोधक दादाजी खोब्रागडे यांचे निधन

धान संशोधक दादाजी खोब्रागडे यांचे निधन

Next

चंद्रपूर : तांदळाचे संशोधक म्हणून देशात प्रसिद्ध असणारे नागभीड तालुक्यातील नांदेड येथील दादाजी खोब्रागडे यांचे रविवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास गडचिरोली येथील सर्चमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. दादाजी खोब्रागडे हे मागील काही महिन्यांपासून अर्धांगवायू या दुर्धर आजाराशी झुंज देत होते. अर्धांगवायूने त्यांचे शरीर सुन्न झाले होते.

नांदेड येथे राहून कृषी क्षेत्रात नवनवे सकारात्मक बदल करीत असतानाच त्यांना अर्धांगवायूच्या आजाराने ग्रासले. त्यानंतर चार महिने त्यांच्यावर ब्रह्मपुरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांच्या या दुर्दशेवर लक्ष वेधले. त्यानंतर शासनाने मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाखांची आर्थिक मदत केली होती. दरम्यान, सर्च या संस्थेचे संस्थापक डॉ. अभय बंग यांनी दादाजी खोब्रागडे यांना सर्च येथील इस्पितळात दाखल करुन घेतले होते. तिथे मागील दहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होता. विशेष म्हणजे, दहा-बारा दिवसांपूर्वीच त्यांनी जेवण बंद केले होते. त्यांना बोलणेही अवघड जात होते. दरम्यान, रविवारी सायंकाळी त्यांची प्रकृती चांगलीच खालावली. मात्र उपचारादरम्यान सायंकाळी ७.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ४ जून रोजी दुपारी त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी नांदेड येथे नेले जाणार आहे. तिथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

इयत्ता तिसरी शिकलेला कृषीतज्ज्ञ
१९८३ मध्ये ते तांदळाचे संशोधक म्हणून समोर आले. त्यांचे शिक्षण जेमतेम इयत्ता तिसरीपर्यंत झाले. परिस्थितीमुळे त्यांना शिक्षणसुद्धा घेता आले नाही. मात्र त्यांनी आपल्या शेतात धान पीक लावून त्यावर संशोधन केले. दादाजींनी धान संशोधनाच्या क्षेत्रात अत्यंत मोलाची कामगिरी बजावली आहे. शरद पवारांपासून ते डॉ. अब्दुल कलाम यांच्यापर्यंत अनेकांनी त्यांना सन्मानित केले आहे. अवघ्या दीड एकर शेतीत त्यांनी धानपिकाचे विविध यशस्वी प्रयोग केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत फोर्ब्सने २०१० मध्ये जगातील सर्वोत्तम ग्रामीण उद्योजकांच्या यादीत त्यांना मानाचे स्थान दिले होते. ५ जानेवारी, २००५ रोजी अहमदाबाद येथे तत्कालिन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते ५० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. तर २००६ मध्ये महाराष्ट्र शासनानेदेखील त्यांना कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांच्या नावावर नऊ धान वाण विकसित करण्याचा विक्रम आहे. त्यांनी विकसित केलेली धानाची प्रजाती आजही देशाच्या विविध भागात उत्पादित केली जाते.

दादाजींनी विकसित केलेले नऊ वाण
एचएमटी, विजय नांदेड, नांदेड ९२, नांदेड हिरा, डीआरके, नांदेड चेन्नूर, नांदेड दीपक, काटे एचएमटी आणि डीआरके टू हे नऊ तांदळाचे वाण दादाजी खोब्रागडे यांनी विकसित केले आहे.

 

Web Title:  Paddy researcher Dadaji Khobragade passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.