'ती' व्यक्तीच साहित्य क्षेत्रातील दहशतवादी; सहगल निमंत्रण वादावर आयोजकांचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 11:02 PM2019-01-07T23:02:25+5:302019-01-07T23:08:39+5:30

स्थानिक आयोजकांचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्यावर गंभीर आरोप

organisation committe slams shripad joshi for cancelling nayantara sahgal invention of marathi sahitya sammelan | 'ती' व्यक्तीच साहित्य क्षेत्रातील दहशतवादी; सहगल निमंत्रण वादावर आयोजकांचा खळबळजनक आरोप

'ती' व्यक्तीच साहित्य क्षेत्रातील दहशतवादी; सहगल निमंत्रण वादावर आयोजकांचा खळबळजनक आरोप

Next

मुंबई: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांनी दिलेलं निमंत्रण रद्द करण्यात आल्यानं मोठा वादंग माजला आहे. आता यावरुन स्थानिक आयोजकांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. श्रीपाद जोशी हे साहित्य क्षेत्रातले दहशतवादी असल्याचा घणाघाती आरोप आयोजन समितीचे सदस्य पद्माकर मलकापुरे यांनी केला. नयनतारा सहगल यांचं आमंत्रण रद्द करण्यात आल्याचं पत्र खुद्द श्रीपाद जोशी यांनी लिहिलं आणि त्यावर फक्त आयोजकांची सही घेतली, असा दावा मलकापुरेंनी केला आहे. 

यवतमाळमध्ये होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रेसनोटपासून ते पत्रापर्यंतचे सर्व अधिकार श्रीपाद जोशी यांनी स्वत:कडे ठेवले होते. सहगल यांना संमेलनाच्या उद्घाटनाला बोलावण्याचा निर्णयदेखील त्यांनीच घेतला. त्यामुळे आम्ही सहगल यांना विमानाचं तिकीट पाठवलं. मात्र काही पक्ष आणि संघटनांनी सहगल यांच्या नावाला विरोध करताच जोशी यांनी त्यांना उद्घाटनाचं निमंत्रण रद्द करणारं पत्र लिहिलं. त्यावर जोशी यांनी संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांची स्वाक्षरी घेतली, असा संपूर्ण घटनाक्रम मलकापुरेंनी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीशी बोलताना उलगडून सांगितला. 

संमेलनाशी संबंधित चांगल्या गोष्टींचं श्रेय स्वत:कडे घ्यायचं आणि काही घोळ झाल्यास त्याची जबाबदारी कोलतेंवर ढकलून द्यायची अशी श्रीपाद जोशी यांची वृत्ती असल्याचा गंभीर आरोप मलकापुरेंनी केला. सहगल यांना उद्घाटनासाठी बोलावण्याचा आणि त्यांचं निमंत्रण रद्द करण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचाच होता. तुम्ही फक्त आलेल्या पाहुण्यांची व्यवस्था आहे. तुम्ही केवळ संमेलनाचे व्यवस्थापक आहात, असं जोशी वारंवार म्हणायचे. त्यांची वृत्ती हिटलरसारखी आहे. ते साहित्य क्षेत्रातले दहशतवादी आहेत, असा सनसनाटी आरोपदेखील मलकापुरेंनी केला. या आरोपांवर श्रीपाद जोशी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: organisation committe slams shripad joshi for cancelling nayantara sahgal invention of marathi sahitya sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.