ऑनलाइन लिलाव पद्धत पाडली बंद, शेतमालाला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2018 10:58 PM2018-02-02T22:58:48+5:302018-02-02T22:58:59+5:30

राज्य शासनाने मागील काही दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आॅनलाइन लिलाव पद्धतीद्वारे शेतमाल विक्री सुरू केली आहे.

The online auction system is closed down, the farmers are angry because they get lesser prices | ऑनलाइन लिलाव पद्धत पाडली बंद, शेतमालाला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त

ऑनलाइन लिलाव पद्धत पाडली बंद, शेतमालाला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त

Next

वरोरा (चंद्रपूर) : राज्य शासनाने मागील काही दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आॅनलाइन लिलाव पद्धतीद्वारे शेतमाल विक्री सुरू केली आहे. मात्र, या पद्धतीत प्रत्येक क्विंटल मागे प्रचंड तफावत येत असल्याचे शेतक-यांच्या निदर्शनात आल्याने शेतक-यांनी वरोरा येथील बाजार समितीमधील ही पद्धत शुक्रवारी बंद पाडली.

लिलाव पद्धत बंद पाडून बोली पद्धतीने शेतमाल घेण्यास व्यापा-यांना भाग पाडल्याने प्रती क्विंटल ४०० रुपयांपर्यंतचा अधिक भाव शेतक-यांना मिळाला. राष्ट्रीय कृषी बाजार समिती ईनाम योजनेंतर्गत राज्यातील प्रत्येक बाजार समितीमध्ये व्यापारी आपली बोली आॅनलाइन पद्धतीने बोलून दर ठरवित होते. त्यानंतर शेतमाल खरेदी करीत होते. मात्र, शेतमाल खरेदी करताना आपल्या मालाला व्यापारी कुठपर्यंत दर देत आहेत याची कल्पना शेतक-यांना पावती आल्यानंतरच येत होती.

शुक्रवारी वरोरा बाजार समितीत आॅनलाइन लिलावात तुरीला ४ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल तर सोयाबीनला ३ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याचे शेतक-यांच्या लक्षात आले. हा भाव कमी असल्याने शेतकरी संतप्त झाले व आॅनलाइन लिलावाला कडाडून विरोध केला. जुन्याच पद्धतीने बोली बोलून शेतमाल खरेदी करण्याचा आग्रह केला. अखेर बाजार समिती प्रशासनाने याची दखल घेत खुल्या बोलीने व्यापा-यांनी शेतमाल घ्यावा, असे निर्देश दिले. या बोलीत शेतक-यांना तूर व सोयाबीनवर प्रति क्विंटल २०० रुपये अधिक दर मिळाला.

सोमवारपासून बाजार समिती मार्केट बंद
राष्ट्रीय कृषी बाजार समिती ईनाम योजनेतंर्गत ई-लिलाव पद्धतीने वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रक्रिया सुरू केली. परंतु आॅनलाइन लिलाव प्रक्रियेमध्ये शेतक-यांना भाव कमी मिळत असल्याने सदर प्रक्रिया शेतक-यांना बंद पाडून बोलीप्रमाणे शेतमाल विकला. आॅनलाईन लिलाव पद्धतीबाबत शासनाच्या वरिष्ठ अधिका-यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांचे पुढील निर्देश येतपर्यंत सोमवारपासून वरोरा बाजार समितीचे मार्केट बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव चंद्रशेन शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

व्यापा-यांकडून शेतक-यांची लूट
आॅनलाइन लिलाव पद्धतीने शेतमाल खरेदीची योजना चांगली आहे. मात्र, यात व्यापा-यांनी साखळी तयार करून शेतक-यांची लूट सुरू केली आहे. त्यामुळे व्यापारी संख्या वाढविणे गरजेचे झाले आहे. बाजार समितीतील व्यापा-यांच्या अशा मिलीभगतमुळे वरोरा बाजारपेठेवर पुन्हा मंदीचे सावट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आॅनलाइन पद्धतीने लिलावात भाव कमी मिळाला. त्यामुळे ही पद्धत आम्ही बंद पाडली. जुन्या बोली पद्धतीने शेतमाल खरेदी करण्यास व्यापा-यांना भाग पाडले. त्यामुळे प्रति क्विंटल मागे भाववाढ मिळाली.
- मनोज पुनवटकर, शेतकरी, आबमक्ता

Web Title: The online auction system is closed down, the farmers are angry because they get lesser prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.