पायाभूत सुविधा क्षेत्र वाढल्यास ‘एनपीए’ घटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2017 03:52 AM2017-05-22T03:52:40+5:302017-05-22T03:52:40+5:30

सिमेंट, पोलाद, ऊर्जा, कोळसा यासारख्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील उद्योगांचा विकास व्हायला सुरुवात झाल्यास राष्ट्रीयीकृत बँकांचा वेगाने वाढत असलेला ‘एनपीए’ (नॉन परफॉर्मिंग अ‍ॅसेट) कमी होईल

'NPA' will be reduced if infrastructure sector increases | पायाभूत सुविधा क्षेत्र वाढल्यास ‘एनपीए’ घटेल

पायाभूत सुविधा क्षेत्र वाढल्यास ‘एनपीए’ घटेल

Next

विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिमेंट, पोलाद, ऊर्जा, कोळसा यासारख्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील उद्योगांचा विकास व्हायला सुरुवात झाल्यास राष्ट्रीयीकृत बँकांचा वेगाने वाढत असलेला ‘एनपीए’ (नॉन परफॉर्मिंग अ‍ॅसेट) कमी होईल, असे मत युनियन बँक आॅफ इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरुण तिवारी यांनी व्यक्त केले.
अरुण तिवारी आणि लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांनी रविवारी बँक क्षेत्राशी संबंधित विविध मुद्यांवर चर्चा केली. विजय दर्डा यांचे निवासस्थान यवतमाळ हाऊस येथे ही चर्चा झाली. याप्रसंगी वरिष्ठ संपादकीय कर्मचारी उपस्थित होते. तिवारी यांनी ‘एनपीए’संदर्भात वरीलप्रमाणे भूमिका मांडली. देशातील सर्व २६ राष्ट्रीयीकृत बँकांचा ‘एनपीए’ सहा लाख कोटी रुपयांवर गेला आहे. युनियन बँकेचादेखील ‘एनपीए’ ७ टक्के असून, ही रक्कम सुमारे २१ हजार कोटी रुपये होते. राष्ट्रीयीकृत बँकांचा ७० टक्के ‘एनपीए’ सिमेंट, पोलाद, ऊर्जा, कोळसा यासारख्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील उद्योगांमुळे आहे. विद्यमान शासनाकडे राजकीय इच्छाशक्ती असून, या शासनाने सदर क्षेत्राला वर आणण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली आहे. सिमेंट उद्योगाने कात टाकायला सुरुवात केली असून, अन्य उद्योगही मंदीतून लवकरच बाहेर येतील. त्यामुळे ‘एनपीए’ घटायला लागेल, असे तिवारी यांनी स्पष्ट केले.
‘एनपीए’ वाढत असल्यामुळे युनियन बँक आॅफ इंडियाने गेल्या दोन वर्षांपासून कॉर्पोरेट कर्ज वितरण बंद केले आहे. त्याऐवजी किरकोळ व्यापार, कृषी, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना जास्तीत जास्त कर्ज देण्याचे धोरण स्वीकारले आहे. ही योजना यशस्वी ठरली असून गेल्या दोन वर्षांमध्ये या क्षेत्रातील ‘लोन पोर्टफोलिओ’मध्ये २२ ते २६ टक्के वृद्धी झाली आहे, अशी माहिती तिवारी यांनी दिली. युनियन बँकेकडे सध्या ३ लाख ७८ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्यात सुमारे ३५ टक्के म्हणजे १ लाख ३० हजार कोटी रुपयांच्या ठेवी चालू व बचत खात्यांतील आहेत. त्यामुळे बँकेचा कर्जावरील खर्च कमी करण्यास व कर्ज वितरणाचे नवीन धोरण पुढे लागू ठेवण्यास मदत होत आहे, असे तिवारी यांनी सांगितले.
विदेशी गंगाजळीबाबत तिवारी यांनी म्हणाले, भारताकडे सध्या ३ कोटी ७५ हजार यूएस डॉलर्स विदेशी चलन असून, परिस्थिती समाधानकारक आहे. शेतकऱ्यांकडे मौल्यवान जमीन असूनही त्यांना कर्ज का मिळत नाही, याचे स्पष्टीकरण देताना तिवारी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. याप्रसंगी युनियन बँकेचे महाव्यवस्थापक एम. व्यंकटेश, नागपूर विभागाचे उपमहाव्यवस्थापक दास व लोकमत वृत्तपत्र समूहाचे वित्त नियंत्रक सीए मोहन जोशी उपस्थित होते.


विजय दर्डा यांनी बँक-ग्राहक नात्याविषयी प्रश्न विचारला असता तिवारी यांनी गमतीदार उत्तर दिले. भारतामध्ये बँक-ग्राहक नाते हिंदू पती-पत्नीसारखे आहे. पती-पत्नीमध्ये प्रेम असते व त्यांची भांडणेही होतात. असेच बँक व ग्राहकांचे आहे. त्यांचे नाते काळानुसार अधिक घट्ट होत जाते, असे तिवारी यांनी सांगितले.


अरुण तिवारी यांनी यवतमाळ हाऊस येथे प्रवेश केला असता त्यांचे कपाळाला कुंकुवाचा टिळा लावून स्वागत करण्यात आले. यासंदर्भात माहिती देताना विजय दर्डा यांनी ही परंपरा त्यांच्या दिवंगत मातोश्री वीणादेवी दर्डा यांनी पाहुण्यांच्या स्वागतासाठी सुरू केली होती, असे सांगितले. मातोश्री वीणादेवी दर्डा यांचा २०१२ मध्ये स्वर्गवास झाला आहे. ही परंपरा आजही पाळली जात आहे, असे सांगताना विजय दर्डा भावूक झाले होते.

Web Title: 'NPA' will be reduced if infrastructure sector increases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.