राष्ट्रवादी प्रचंड आशावादी; 'या' 10 जागा जिंकण्याचा एनसीपीला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 13:07 IST2019-01-23T13:06:00+5:302019-01-23T13:07:31+5:30
सध्या राज्यात राष्ट्रवादीचे पाच खासदार आहेत

राष्ट्रवादी प्रचंड आशावादी; 'या' 10 जागा जिंकण्याचा एनसीपीला विश्वास
मुंबई: गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत धूळधाण उडालेल्या राष्ट्रवादीला यंदा किमान दहा जागा जिंकता येतील, असा विश्वास वाटतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत चाचपणीतून हा आकडा समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आघाडी करण्याबद्दल राष्ट्रवादी ठाम आहे. तशी चर्चादेखील दोन्ही पक्षांमध्ये सुरू आहे.
राज्यातील एकूण 48 पैकी केवळ 5 मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. यात बारामती (सुप्रिया सुळे), माढा (विजयसिंह मोहित-पाटील), सातारा (उदयनराजे भोसले), कोल्हापूर (धनंजय महाडिक) आणि भंडारा-गोंदिया (मधुकर कुकडे) या मतदारसंघांचा समावेश आहे. हे पाचही मतदारसंघ कायम राखण्याचा राष्ट्रवादीला विश्वास आहे. याशिवाय रायगड, मावळ, शिरुर, बुलढाणा, परभणी या मतदारसंघातही राष्ट्रवादीला यश मिळेल, असं अंतर्गत अहवाल सांगतो.
गेल्या निवडणुकीत रायगडची जागा थोड्याशा फरकानं राष्ट्रवादीच्या हातून निसटली होती. ही जागा यंदा सुनील तटकरे खेचून आणतील, असा विश्वास पक्षाला आहे. तर मावळमध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा आहे. शिरुरमधून विलास हांडे, तर बुलडाण्यातून राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या सर्व जागांवर राष्ट्रवादीला विजयाची खात्री वाटते.