आवक घटल्याने नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:49 AM2018-10-13T11:49:24+5:302018-10-13T11:50:17+5:30

बाजारगप्पा : जिल्ह्यातील बहुसंख्य तालुक्यांमध्ये यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे खरीप मका, सोयाबीन, मूग, बाजरी या पिकांना योग्यवेळी पाणी मिळाले नाही.

In Nashik district Market committees hits after the inward decline | आवक घटल्याने नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांना फटका

आवक घटल्याने नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांना फटका

Next

- संजय दुनबळे (नाशिक)

नाशिक जिल्ह्यात  मका, सोयाबीन, बाजरी या खरीप पिकांच्या काढणीचा हंगाम सुरू झाला असून, या पिकांची बाजार समित्यांमध्ये आवक सुरू झाली. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत बाजार समित्यांमध्ये यावर्षी होणारी आवक मोठ्या प्रमाणात घटली असून, त्याचा बाजार समित्यांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य तालुक्यांमध्ये यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे खरीप मका, सोयाबीन, मूग, बाजरी या पिकांना योग्यवेळी पाणी मिळाले नाही. पिकांच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे. ज्यांच्या विहिरींना पाणी आहे त्यांनी कशीबशी पिके जगविली, कोरडवाहू शेतकऱ्यांना मात्र पिकांची सोंगणी करणेही कठीण झाले आहे. परिणामी, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी बाजार समित्यांच्या आवकेत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

नांदगाव बाजार समितीत मुगाची आवक जवळजवळ संपली असून बाजरी, मक्याची आवक सुरू आहे. येथे बाजरीची दररोज साधारत: ८० ते १०० क्विंटल आवक होते. बाजरीला १,२०० ते १,८०० रुपये सरासरी १,६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. मक्याची २,५०० क्विंटल आवक होणे अपेक्षित असताना त्याचे प्रमाणही कमी झाले. मक्याला येथे १,३०० ते १,४६६ सरासरी १,३११ रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. एकूण आवकेत सुमारे ५० टक्क्यांनी घट झाली असल्याने बाजार समितीच्या उत्पन्नावरही त्याचा परिणाम होणार असून, यावर्षी बाजार समितीच्या उत्पन्नात सुमारे ४० टक्केघट होण्याची शक्यता बाजार समितीच्या सूत्रांनी व्यक्त केली.

मालेगाव बाजार समितीत भुसार मालाची स्थानिक  आवक कमी असून, येथे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव भागातून मका, बाजरीची आवक होत आहे. आवक वाढल्याचे भुसार मालाचे व्यापारी भिका कोतकर यांनी सांगितले. येथे ओला मका १,२०० ते १,३५० रुपये, तर सुका मका १,४०० ते १,४८० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत, बाजरीला १,६०० ते १,८०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. हरभरा, तूर, मठ या पिकांची आवक फारशी नाही. साधारणत: २०० क्विंटलपर्यंत इतर भुसार मालाची आवक येथे होते. या बाजार समितीतही मागील वर्षीच्या तुलनेत आवकेचे प्रमाण निम्म्याने कमी झाले. त्याचा बाजार समित्यांच्या उत्पन्नावर परिणाम होणार असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

मका, बाजरी या पिकांच्या उत्पन्नात घट झालेली असल्याने भविष्यातही चांगला भाव राहील, असा अंदाज कोतकर यांनी व्यक्त केला. सोयाबीनला लासलगाव बाजार समितीत ३,००० ते ३,१०० रुपये, तर मक्याला १,४०० ते १,४५० रुपये प्रतिक्ंिवटल भाव मिळत असल्याचे येथील भुसार मालाचे व्यापारी सचिन ब्रह्मेचा यांनी सांगितले. बाजरीची आवक येथे कमी असून, बाजरीला १,६०० ते १,८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. बाजार समितीत अद्याप पूर्ण क्षमतेने आवक सुरू झालेली नाही. सध्या पीक काढणीचा हंगाम असल्याने आवकेवर किती परिणाम झाला याचा अंदाज दिवाळीनंतर येईल, असे ब्रह्मेचा यांनी सांगितले.

Web Title: In Nashik district Market committees hits after the inward decline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.