नांदेड चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीजच्या सचिवाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 07:13 AM2018-07-13T07:13:57+5:302018-07-13T07:14:02+5:30

भागिदारी कंपनीत आर्थिक गुंतवणूक करावयास लावल्यानंतर करारानुसार सहकाऱ्यांनी व्यवहार न केल्याने झालेल्या आर्थिक कोंडीतूनच कंत्राटदार सुमोहन राममोहनराव कनगाला (६०, रा. नांदेड) यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

Nanded Chamber of Commerce and Industries secretari arrested | नांदेड चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीजच्या सचिवाला अटक

नांदेड चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीजच्या सचिवाला अटक

Next

 नांदेड - भागिदारी कंपनीत आर्थिक गुंतवणूक करावयास लावल्यानंतर करारानुसार सहकाऱ्यांनी व्यवहार न केल्याने झालेल्या आर्थिक कोंडीतूनच कंत्राटदार सुमोहन राममोहनराव कनगाला (६०, रा. नांदेड) यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गुरुवारी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून नांदेड चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीजचे सचिव चंद्रकांत गव्हाणे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
शहरातील श्रीनगर भागातील सायन्स कॉलेज रोडवर असलेल्या विद्यानगर येथील ‘कनगुला व्हिला’ या अलिशान बंगल्यात महावितरणचे प्रसिद्ध कंत्राटदार सुमोहन कनगाला यांनी बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आपल्या राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. कनगाला यांच्याजवळ तीन पानी पत्र आढळून आले होते. त्यावरुन पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपी चंद्रकांत गव्हाणे, बाला रेड्डी, विनोद रेड्डी आणि जितेंद्र गुप्ता या चौघांनी भागिदारी कंपनीत ३ कोटी ७५ लाख रुपये गुंतवायला सांगून भागिदारी कराराप्रमाणे व्यवहार न केल्याने कनगाला यांची कोंडी झाल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले आहे. यातील गव्हाणे यांनी ५० टक्के गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र करारानुसार तशी गुंतवणूक केली नाही. बाला रेड्डी व विनोद रेड्डी यांनी आयसीएसए या कंपनीतून कनगाला यांचे ८० लाख रुपये परत केले नाहीत तर जितेंद्र गुप्ता यांच्याकडूनही कनगाला यांना १ कोटी १६ लाख रुपये परत येणे बाकी होते. सदरील रक्कम जालना व नांदेड येथे आयपीडीएस प्रकल्पातून कनगाला यांना द्यावयाची होती. मात्र ही रक्कम मिळत नसल्याने तसेच गुंतवणूक करायला सांगणारे सहकारी कराराप्रमाणे व्यवहार करत नसल्याने मानसिक व आर्थिक त्रासाला कंटाळलेल्या कनगाला यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. कनगाला यांच्याकडे पिस्तूल बाळगण्याचा परवाना होता. मात्र ते पिस्तूल बँकेच्या लॉकरमध्ये ठेवत असत. बुधवारी नागपूरला जायचे असल्याचे घरच्यांना सांगून ते बँकेत गेले. बँकेतील लॉकरमधून रिव्हॉल्वर आणून त्यांनी स्वत:च्या घरी गोळी झाडून घेतली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक काकडे हे करीत आहेत.
तिघे फरार
या प्रकरणी कनगाला यांचा भाऊ मुरलीमोहन राममोहन कनगाला यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चंद्रकांत गव्हाणे (६२, रा. नांदेड), बाला रेड्डी (५५, रा. हैदराबाद), विनोद रेड्डी (५०, रा. हैदराबाद) आणि जितेंद्र गुप्ता (५०, रा. भुवनेश्वर) या चौघांविरूद्ध कलम भादंवि ३०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील गव्हाणे यांना गुरुवारी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने गव्हाणे यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. अद्याप तीन आरोपी फरार आहेत. त्यांंच्या अटकेसाठी पोलीस पथके हैदराबादकडे रवाना झाली आहेत.

Web Title: Nanded Chamber of Commerce and Industries secretari arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक