नाणार प्रकल्प रायगडला; मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 04:45 AM2019-06-20T04:45:54+5:302019-06-20T06:29:28+5:30

शिवसेनेच्या प्रचंड विरोधानंतर नाणारमध्ये प्रकल्प होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे

Nair project to Raigad; Chief Minister's signal given | नाणार प्रकल्प रायगडला; मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

नाणार प्रकल्प रायगडला; मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

Next

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील तेलशुद्धिकरण प्रकल्प रायगड जिल्ह्यात हलवण्यात येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एका लेखी उत्तरात बुधवारी दिले.

शिवसेनेच्या प्रचंड विरोधानंतर नाणारमध्ये प्रकल्प होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. या प्रकल्पाबाबत विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी तेलशुद्धिकरण प्रकल्प रायगड जिल्ह्यात होणार, असे स्पष्टपणे सांगितले नाही. मात्र, त्या ठिकाणी सिडकोने औद्योगिक टाऊनशिप उभारण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे आणि त्या ठिकाणी भूसंपादनास स्थानिकांकडून कोणताही विरोध झालेला नाही, असेही स्पष्ट केले.

अलिबाग, मुरुड, रोहा आणि श्रीवर्धन या चार तालुक्यांमधील ४० गावांमध्ये सिडकोच्या वतीने १३ हजार ४०९ हेक्टरमध्ये औद्योगिक टाऊनशिप उभारणे प्रस्तावित आहे. या प्रकल्पास स्थानिकांनी विरोध केलेला नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले मात्र, त्या ठिकाणी तेलशुद्धिकरण प्रकल्पच होणार असल्याचे सांगितले नाही. विरोधी पक्षांच्या वीसहून अधिक सदस्यांनी नाणारचा प्रकल्प रायगड जिल्ह्यात हलविणार का असा प्रश्न उपस्थित केला होता. त्या बाबत मुख्यमंत्र्यांनी हो वा नाही असे ठोस उत्तर न देता संदिग्धता कायम ठेवली. त्यामुळे तेलशुद्धिकरण प्रकल्प रायगडला हलविणार अशी जोरदार चर्चा माध्यमांमधून सुरू झाली. रायगड जिल्ह्यात हा प्रकल्प येऊ देणार नाही, अशी भूमिका शेकापचे नेते जयंत पाटील यांनी जाहीर केली.

Web Title: Nair project to Raigad; Chief Minister's signal given

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.