उदरनिर्वाहासाठी स्थलांतर : सोलापूर भीषण दुष्काळामुळे नातीही दुरावली...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 03:48 AM2019-05-06T03:48:40+5:302019-05-06T03:56:03+5:30

शिंगणापूरच्या डोंगररांगेच्या पायथ्याशी सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर माळशिरस तालुक्यात भांब गाव वसलेलं आहे़ कायम दुष्काळी म्हणून भाळी शिक्का. लोकांना उदरनिर्वाहासाठी स्थलांतराशिवाय पर्याय नाही़ दुष्काळाने आई, वडील, भावंडं यांसह अन्य नातीही दुरावली गेली आहेत़

Migration to livelihood: Solapur due to drought | उदरनिर्वाहासाठी स्थलांतर : सोलापूर भीषण दुष्काळामुळे नातीही दुरावली...

उदरनिर्वाहासाठी स्थलांतर : सोलापूर भीषण दुष्काळामुळे नातीही दुरावली...

Next

- एल़ डी़ वाघमोडे
माळशिरस (जि. सोलापूर) - शिंगणापूरच्या डोंगररांगेच्या पायथ्याशी सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर माळशिरस तालुक्यात भांब गाव वसलेलं आहे़ कायम दुष्काळी म्हणून भाळी शिक्का. लोकांना उदरनिर्वाहासाठी स्थलांतराशिवाय पर्याय नाही़ दुष्काळाने आई, वडील, भावंडं यांसह अन्य नातीही दुरावली गेली आहेत़ येथील लोक रोजी-रोटीसाठी विखुरलेली आहेत़ आज ना उद्या पाऊस पडेल या आशेवर जगत
आहेत.
गावातील मारुती काळे यांच्या मुलीचा विवाह झाल्यानंतर हे कुटुंब दुष्काळामुळे उदरनिर्वाहासाठी बाहेर पडले़ परंपरेनुसार मुलीचे पहिले बाळंतपण माहेरी केले जाते़ त्यामुळे मुलगी माहेरी आली, मात्र दोन वर्षांपासून असलेल्या दुष्काळामुळे आई हिराबाई व वडील मारुती काळे आपल्या मेंढ्या घेऊन गावाकडे फिरकलेच नाहीत़ भाऊ बाबाजी हा रंगकाम करण्यासाठी परराज्यात गेला आहे़ त्यांची ख्यालीखुशाली मोबाईलच्या माध्यमातून कळत असली तरी भेटीची आतुरता मात्र कायम आहे़ काळे कुटुंबातील मुलगी आपल्या घरी बाळंतपणासाठी आली आहे, मात्र घरी थकलेली आजीच धुरपताबाई तिची देखभाल करते़ परिस्थितीशी झगडणारी लेक कुटुंबाची गावी येण्याची आतुरतेने वाट पाहते आहे.
माढा तालुक्यातील उपळाई गावाची स्थितीही काही वेगळी नाही. पाणी नाही अन् चाराही. लोक पाण्याच्या टँकरची वाट पाहत असतात. बागा कशा जगवायच्या याची त्यांना चिंता लागून राहिली आहे. बागा जगविण्यासाठी बाराशे ते पंधराशे रुपये दराने टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. विहिरी आणि कूपनलिकांनी तळ गाठला आहे. दुष्काळाची भीषणता वाढली असून फळबागांना सर्वाधिक फटका बसला आहे.

दोन वर्ष झाली माझ्या डोक्यावर अक्षता टाकून. आई-दादा मेंढरं घेऊन काळ्या रानाला गेली. पहिल्या बाळंतपणाला घरी आई-वडील नाहीत. भाऊ परराज्यात नोकरीला गेलेला. आजी देखभाल करते आहे. इकडं प्यायला पाणी न्हाय. दवाखान्याला जायला नीट रस्ता न्हाय. आता फक्त देवाच्या भरोशावर जगायचंय़यंदा पाऊस पडलं तर मग पडल गाठ आई-दादाची.
- कविता खुर्द, भांब ता. माळशिरस.
द्राक्षबागेत आतापर्यंत ७० हजार रुपये मजुरी खर्च झाला आहे. बागा जगविणे खूप कठीण झाले असून, शासनाने पाण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे.
- अमर कचरे, उपळाई खुर्द (ता.माढा)

दुष्काळातील जलदातृत्व : सरासरी चार मीटरने खोल गेलेल्या भूजल पातळीने नंदुरबारमध्ये
टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ होत असल्याने, प्रशासनाने केलेले नियोजनही तोकडे पडत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे़ यातच रोजगारच उपलब्ध नसल्याने आदिवासी ऐन उन्हाळ्यात स्थलांतर करत आहेत़ तालुक्यातील
धानोरा येथे गेल्या चार महिन्यांपासून पाणीटंचाई आहे़ या पार्श्वभूमीवर गावातील नारायण गुज्जर यांनी नागरिकांना
पाणी उपलब्ध करून दिले आहे़ सकाळपासून त्यांच्या घराबाहेर बैलगाडीने पाणी भरणारे गर्दी करतात़ दिवसभर
अविरत ही कूपनलिका सुरू असते़

वर्ध्यात दूध उत्पादकांना चारा टंचाईच्या झळा
- महेश सायखेड

वर्धा : आठपैकी केवळ आष्टी आणि कारंजा (घा.) तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला. उर्वरित ६ तालुक्यांना शासनाने दुष्काळसदृशच्या सवलती दिल्या आहेत. ज्वारीच्या पेराकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याने दूध उत्पादकांना चारा टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.
आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील पशुपालक जनावरांच्या चारा व पाण्यासाठी इतर तालुक्यांकडे मोर्चा वळवित आहेत. शासनाने वर्धा जिल्हा प्रशासनाला १० कोटी १० लाख ४३ हजार ५२० रुपयांची मदत जाहीर केली होती. ती आष्टी व कारंजा तालुक्यातील ३८ हजार १२९ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वितरित झाली.
आमच्या गावात गवळी समाजाची १५ घरे आहेत. त्यांच्याकडे एकूण १०० गाई तर ३० म्हशी आहेत. पाणी टंचाईमुळे दूध व्यवसाय तोट्यात आला आहे. आम्ही जनावरे दुसºया गावांमध्ये पाठवित आहोत, असे सेलगाव (उ.) येथील दूध उत्पादक श्रावण घंघाळ यांनी सांगितले. तसेच विदर्भात एकाही ठिकाणी शासनाने चारा छावणी उभी केलेली नाही, अशी खंत पं.स. आर्वीचे सदस्य नितीन अरबट यांनी व्यक्त केली.

रोजगारासाठी वाशिममधून शेतमजुरांचे स्थलांतर
संतोष वानखड
वाशिम : अनेक गावांत दुष्काळसदृश परिस्थिती असून, शेतमजुरांनी रोजगाराच्या शोधात गावं सोडली आहेत. पाणी व चारा टंचाईमुळे खैरखेडा (ता. मालेगाव) परिसरातील पशुपालकांनी जनावरे जंगलात मोकाट सोडून दिली आहेत.
जिल्ह्यात ५०० पेक्षा अधिक
गावांना पाणीटंचाईची झळ
बसत आहे. काहींनी जनावरे
विक्रीला काढली आहेत.मानोरा तालुक्यातील पाळोदी, कारखेडा परिसर, मालेगाव तालुक्यातील खैरखेडा भागात रोजगाराचा प्रश्न गहन बनला आहे.

मागणी करुनही रोजगार उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे रोजगाराच्या शोधात अनेक कुटुंबाचे स्थलांतर होत आहे.
- सचिन रोकडे,
कारपा (ता. मानोरा)

खैरखेडा येथे सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळ निवारण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- संजय राठोड, खैरखेडा (ता. मालेगाव)
 

Web Title: Migration to livelihood: Solapur due to drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.