विद्यार्थ्यांसाठी गणित कठीणच! आकलन क्षमता कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 06:54 AM2018-12-22T06:54:37+5:302018-12-22T06:54:49+5:30

विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसलेला असो किंवा पाचवीला, त्याला सर्वात जास्त भीती कोणत्या विषयाची असेल किंवा तुला कोणता विषय जास्त अवघड वाटतो, असा प्रश्न विचारला, तर बहुतांश विद्यार्थ्यांचे हमखास उत्तर गणित हेच असते.

 Mathematics difficult for students! | विद्यार्थ्यांसाठी गणित कठीणच! आकलन क्षमता कमी

विद्यार्थ्यांसाठी गणित कठीणच! आकलन क्षमता कमी

Next

मुंबई : विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसलेला असो किंवा पाचवीला, त्याला सर्वात जास्त भीती कोणत्या विषयाची असेल किंवा तुला कोणता विषय जास्त अवघड वाटतो, असा प्रश्न विचारला, तर बहुतांश विद्यार्थ्यांचे हमखास उत्तर गणित हेच असते. नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हेच्या दुसऱ्या टप्प्यानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांची गणित विषयातील प्रगती इतर विषयांच्या तुलनेत अत्यंत खालावलेली असल्याचे समोर आले आहे. राज्यातील केवळ सरासरी ३३.५७ टक्के विद्यार्थी गणितात योग्य प्रकारे उत्तरे देऊ शकत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. इतर विषयांच्या तुलनेत ही टक्केवारी सगळ्यात कमी असल्याने विद्यार्थ्यांच्या मनातील गणित विषयाची भीती यातून समोर दिसून येते.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) शैक्षणिक सर्वेक्षण विभागाने देशभरातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेविषयी भाग-२ चे सर्वेक्षण (न्यास ) नुकतेच पूर्ण केले. त्यानुसार, प्रत्येक राज्याच्या जिल्ह्यांचे प्रगतिपुस्तक जारी केले आहे. यात हे प्रगतिपुस्तक प्रत्येक प्रकारच्या शाळेतील, गणित, इंग्रजी, समाजशास्त्र, विज्ञान आणि नवीन भाषा या विषयांतील विद्यार्थ्यांच्या संपादणूक क्षमतेवर आधारित आहे.
या सर्वेक्षणानुसार, राज्यातील विद्यार्थ्यांची गणित विषयातील कामगिरी अत्यंत कमी म्हणजेच ३३.५७% इतकी आहे. मुंबई उपनगरतील विद्यार्थ्यांची गणितातील कामगिरी २७.११% असून, मुंबईतील विद्यार्थ्यांची टक्केवारी ३५.२२% आहे. यामध्येही बीजगणितातील राज्यातील विद्यार्थ्यांची कामगिरी ३३.८२ % तर मुंबई उपनगर व मुंबईतील विद्यार्थ्यांची कामगिरी अनुक्रमे २८.५७ % आणि ३६.३८ टक्के आहे.

भूमितीतील राज्यातील विद्यार्थ्यांची कामगिरी ३७.२२ % इतकी आहे. मुंबई उपनगर व मुंबईतील विद्यार्थ्यांची भूमितीतील कामगिरी अनुक्रमे २९.६५ % आणि ४०.४१ % इतकी आहे. आकडेवारीमध्ये राज्यातील विद्यार्र्थ्यांची सरासरी कामगिरी ३०.५७ % इतकी आहे. २४.०४ % आणि २७.६० % ही कामगिरी मुंबई उपनगर व मुंबई शहरातील विद्यार्थ्यांची असल्याचे समोर आले आहे. संख्या प्रणाली, त्रिकोणमिती, संभाव्यता, समनव्य भूमिती यांची आकडेवारी या सर्वेक्षणातून समोर आली असून, कोणत्याच विषयांची सरासरी आकलन क्षमता ४५%च्या वर नसल्याचे समोर आले आहे. यावरून दहावीच्या विद्यार्थ्यांना वाटणारी भीती त्यांच्या आकलन क्षमतेच्या पातळीवर अवलंबून असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Web Title:  Mathematics difficult for students!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.