तीन वर्षांत राज्यातील मलेरियाचे प्रमाण ३३ टक्क्यांनी घटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 06:10 AM2019-01-17T06:10:51+5:302019-01-17T06:10:53+5:30

आरोग्य विभागाचा अहवाल : मलेरियामुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्याही झाली कमी

Malaria in the state decreased by 33% in three years | तीन वर्षांत राज्यातील मलेरियाचे प्रमाण ३३ टक्क्यांनी घटले!

तीन वर्षांत राज्यातील मलेरियाचे प्रमाण ३३ टक्क्यांनी घटले!

Next

मुंबई : गेल्या तीन वर्षांत राज्यातील मलेरियाचे प्रमाण ३३ टक्क्यांनी कमी झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. केवळ मलेरियाच्या रुग्णांची संख्याच नव्हे; तर मलेरियामुळे होणाºया मृत्यूचे प्रमाणही घटल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.


मुंबईत २०१० साली मलेरियाचा उद्रेक झाल्यावर हा आजार रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले गेले. शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये डासनियंत्रण व जनजागृती मोहिमेंतर्गत कार्यक्रम राबविले गेले. त्यानंतर मलेरियाबाबतची स्थिती सुधारल्याचे सरकारी आकडेवारीवरून दिसत आहे. राष्ट्रीय व्हेक्टर रोग नियंत्रण कार्यक्रमानुसार सर्व राज्यांमधून मलेरिया, डेंग्यू आदी आजारांच्या माहितीची नोंद करण्यात येते. अहवालातील नोंदीनुसार राज्यात मुंबई, नवी मुंबई, कल्याण, ठाण्यासह विदर्भात सर्वाधिक मलेरियाच्या रुग्णांची नोंद आहे, तुलनेत पुण्यात मलेरियाचे सर्वाधिक कमी प्रमाण आहे.


या अहवालानुसार, २०१६ साली मलेरियाचे २३ हजार ९८३ रुग्ण आढळले होते. तर २०१७ साली १७ हजार ७१० रुग्णांची नोंद करण्यात आली होती. मात्र गेल्या वर्षी म्हणजेच २०१८ साली हे प्रमाण ९ हजार ३२२ इतके कमी झाले आहे. याखेरीज, २०१६ साली मलेरियामुळे २६ रुग्ण दगावले. २०१७ साली मृत्यूचे हे प्रमाण २० वर आले, तर २०१८ साली हे प्रमाण थेट १० वर आल्याची नोंद आहे.

जनजागृतीचे फळ
याविषयी डॉ. राजेश गावंडे यांनी सांगितले की, राज्यात गेल्या काही वर्षांपासून मलेरियाचे प्रमाण कमी होत आहे. दोन ते तीन वर्षांत मलेरियाच्या उपचारांवर प्रभावी कार्य करण्यात आले आहे. मलेरियाची लागण झालेल्या परिसरांवर लक्ष ठेवून त्या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव कमी करण्याबाबत उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळेच हे यश मिळाले आहे.

Web Title: Malaria in the state decreased by 33% in three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.