वीज दर कडाडणार; निवडणुकीच्या तोंडावर महावितरणाची 6% दरवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 08:23 AM2019-03-27T08:23:59+5:302019-03-27T08:26:08+5:30

1 एप्रिलपासून वीज दरवाढीचा शॉक

mahavitaran ready to increase electricity rate by 6 percent from 1st april | वीज दर कडाडणार; निवडणुकीच्या तोंडावर महावितरणाची 6% दरवाढ

वीज दर कडाडणार; निवडणुकीच्या तोंडावर महावितरणाची 6% दरवाढ

Next

मुंबई: ऐन उन्हाळ्यात आणि निवडणुकीच्या तोंडावर जनतेला वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. 1 एप्रिलपासून महावितरणकडून विजेच्या दरात सहा टक्क्यांनी वाढ होणार आहे. सप्टेंबरमध्ये राज्य वीज नियामक आयोगानं याबद्दलचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून करण्यात येईल. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात सर्वसामान्य जनतेला वीज दरवाढीची झळ सोसावी लागेल. 

राज्यात उन्हाचा कडाका वाढतो आहे. त्यातच आता महावितरणकडून दरवाढ केली जाणार आहे. चार दिवसांनी महावितरणची दरवाढ लागू होईल. त्यामुळे विजबिलात सहा टक्क्यांनी वाढ होईल. राज्य वीज आयोगानं गेल्या वर्षी १२ सप्टेंबरला राज्यातील वीज वितरण कंपन्यांच्या नव्या वीजदरांना मान्यता दिली होती. त्यानुसार महावितरण, अदानी, टाटा पॉवर यांचे वीजदर वाढले. महावितरणला ८२६८ कोटी रुपयांची दरवाढ करण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे १ एप्रिल २०१९ पासून नव्या आर्थिक वर्षांतही पुन्हा या दरवाढीचा फटका ग्राहकांना बसणार आहे.

दरमहा १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांकडून महावितरण ५.३० रुपये प्रति युनिट इतका दर आकारतं. आता त्यामध्ये १६ पैशांची भर पडेल. त्यामुळे एका युनिटसाठी  ५.४६ रुपये मोजावे लागतील. तर १०१ ते ३०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना प्रति युनिटमागे २४ पैसे जास्त मोजावे लागतील. ५०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांची वीज १५ पैशांनी महाग होणार आहे. वीजदरांसोबतच स्थिर आकारातही १० रुपयांची वाढ होणार आहे. तो ८० रुपयांवरून ९० रुपये होणार आहे. महावितरणची १२ हजार ३८२ कोटी रुपयांची दरवाढ तूर्तास लांबणीवर टाकण्यात आली आहे. ती विधानसभा निवडणुका संपल्यानंतर कधीही लागू होऊ शकते. त्यामुळे येत्या काही महिन्यात राज्यातील जनतेला दरवाढीचे आणखी शॉक बसण्याची शक्यता आहे.
 

Web Title: mahavitaran ready to increase electricity rate by 6 percent from 1st april

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.