Maharashtra day: 'कोणालाही माझ्यासारखं जगायला लागू नये म्हणून हा अट्टाहास'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2018 11:56 AM2018-05-01T11:56:09+5:302018-05-01T11:56:09+5:30

लैगिक शिक्षणावर काम करणाऱ्या चांदनी गोरे यांची कहाणी 

Maharashtra day chandani gores journey who works in the field of sexual education | Maharashtra day: 'कोणालाही माझ्यासारखं जगायला लागू नये म्हणून हा अट्टाहास'

Maharashtra day: 'कोणालाही माझ्यासारखं जगायला लागू नये म्हणून हा अट्टाहास'

पुणे : जन्माला येताना आपण कोणत्या घरात यायचं, हे जसं आपल्या हातात नसतं. तसं पुरुष म्हणून जन्म घ्यावा की स्त्री म्हणून, हेदेखील आपल्या हातात नसतं. पण म्हणून तृतीयपंथीयांनी कायम पिळवणूकच सहन करायची असा अर्थ होत नाही असं तत्वज्ञान आहे चांदणी गोरे यांचं. 

स्वतः तृतीयपंथी असणाऱ्या आणि लैंगिक शिक्षणासाठी काम करणाऱ्या चांदनी या लहान मुलांमध्ये लैंगिक शिक्षणाविषयी जागरुकता निर्माण करण्याचं काम करतात. सुरुवातीला आपली मुलगी ही स्त्री  किंवा पुरुषापेक्षा काहीतरी वेगळी आहे हे घरचेदेखील स्वीकारत नव्हते. त्यांनी चांदनी यांनी जमेल तेवढे समजवण्याचा, वेळप्रसंगी मारून, धमकी देऊन मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. पण मी वेगळी आहे आणि हे  नैसर्गिक आहे या मतापासून त्या ढळल्या नाहीत. अखेर घरच्यांनी ते मान्य केले. 

आज त्या निर्भया आनंदी जीवन नावाची संस्था चालवतात. त्या माध्यमातून लहान मुलांना लैंगिक शिक्षण देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अनेक ठिकाणी जाऊन, मुलांना एकत्र करून चांगला स्पर्श, वाईट स्पर्श याबद्दल त्या सांगतात. वयात येणाऱ्या मुलांच्या समस्या समजून त्यांची मानसिक गुंतागुंत दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. यावेळी अनेक लहान मुलांच्या शारीरिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या असून त्यातूनही त्या मार्ग काढत असतात. याकरता मुलांचे, पालकांचे मतपरिवर्तन करावे लागते. वेळप्रसंगी वाईटपणा घ्यावा लागला तरी चालेल, पण कोणावरही शारीरिक अत्याचार होऊ नये, असा त्यांचा प्रयत्न असतो. यासोबतच तृतीयपंथीयांसाठी त्या बचतगट चालवतात. त्यांना शिक्षणाचे, बचतीचे महत्व पटावे, त्यांनी समाजात सन्मानाने वावरावे असा त्यांचा प्रयत्न असतो. त्या सांगतात की, तृतीयपंथीयांना बाकी काही नको असते. ते आसुसलेले असतात ते प्रेमासाठी. समाजाने त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. असे झाले नाही तर कायम समाजव्यवस्थेच्या बाहेरच राहतील असे त्यांना वाटते. आज समाज वेगाने बदलत असला, तरी जे माझ्यासारखे पुढे आले त्यांनाच स्वीकारले गेले. जे कायम मागे राहिले त्यांना काळाने मागेच ठेवले असे त्या दुर्दैवाने नमूद करतात. 

चांदनी या पुण्यातल्या गरीब लोकवस्तीत राहतात. जिथे हातातोंडाशी गाठ पडत नाही, तिथे लैंगिक शिक्षणाचे काय महत्त्व असणार? मात्र तरीही, माझे शरीर, माझा अधिकार हा हक्क प्रत्येकाला हवा असे त्यांचे स्पष्ट मत आहे. आजही चांदनी दुवामध्ये नाचतात. तृतीयपंथी म्हणून करण्यात येणारे काम त्यांनी कधीच लपवले नाही. पण माणूस म्हणून त्यांचे काम अधिक स्तिमित करणारे आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास मी स्वतःला स्वीकारलं, तेव्हा जगाने मला स्वीकारलं. जे माझा वेगळेपणा बघून हसतात, त्यांच्या विचारात असणारे मागासलेपण बघून मीही त्यांना हसते. शेवटी समाजाने आम्हाला मोठ्या मनाने स्वीकारलं तर त्यात सगळ्यांचं हित आहे. तसं  झालं नाही तरी आमचं अस्तित्व नाकारून चालणार नाही, हेदेखील सत्य समाजाला स्वीकारावं लागणारच आहे. चांदनी यांचे शब्द अधिक टोचतात, कारण त्यांना सत्याची धार आहे. आकाशातल्या चांदणीप्रमाणे उपेक्षितांच्या आयुष्यात लखलखणाऱ्या चांदनी यांच्या कामाला खूप खूप सदिच्छा !
 

Web Title: Maharashtra day chandani gores journey who works in the field of sexual education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.