‘माढा’ची माघारी.. ‘पाडा’ची पोस्ट ठरली भारी !

By सचिन जवळकोटे | Published: March 11, 2019 04:00 PM2019-03-11T16:00:02+5:302019-03-12T15:46:10+5:30

बारामतीकरांनी चुकीच्या क्षणी घेतला अचूक निर्णय

'Madha' withdrawn. 'Pada' post was huge! | ‘माढा’ची माघारी.. ‘पाडा’ची पोस्ट ठरली भारी !

‘माढा’ची माघारी.. ‘पाडा’ची पोस्ट ठरली भारी !

googlenewsNext

- सचिन जवळकोटे

‘माढा...बारामतीकरांना पाडा!’ ही पोस्ट सोशल मीडियावर जेव्हा प्रचंड व्हायरल झाली, तेव्हाच थोरले काका बारामतीकरांच्या ‘माढ्यातील वापसी’चा निर्णय जवळपास फायनल झालेला. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अकलूज अन् करमाळ्याच्या दुसºया दौºयात एक शब्दानंही त्यांनी स्वत:च्या प्रचाराबद्दल चर्चा केली नव्हती; तेव्हाच सोलापूर-सातारा जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. २००९ चा यशस्वी रिमेक २०१९ मध्ये होऊ शकणार नाही, याची कुणकुणही अनेकांना लागली होती.

सहा महिन्यांपूर्वी माण तालुक्यातील सेवानिवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुखांनी माढा मतदारसंघातील गावोगावी जनसंपर्काचा सपाटा लावला, तेव्हा अकलूजकरांच्या नजरा बारामतीच्या दिशेनं वळल्या होत्या. त्यात पुन्हा सांगोल्याचे दीपकआबाही ‘मी लोकसभेला इंटरेस्टेड,’ असं सांगू लागले, तेव्हा ‘कुछ तो गडबड है !’ याची चुणूक सर्वसामान्यांना मिळाली. त्यात पुन्हा माढ्याचे संजयमामा, पंढरीचे प्रशांतपंत, सांगोल्याचे शहाजीबापू यांच्या गुप्त बैठका माणचे जयाभाव अन् फलटणचे रणजितदादा यांच्यासोबत रंगू लागल्या, तेव्हा विजयदादांनी नवा डाव टाकला. ‘मला नाही तर तुम्हालाही नाही !’ म्हणत त्यांनी बारामतीकरांनाच उभं राहण्याची गळ घातली. ‘पक्षाची इच्छा’ म्हणत थोरल्या काकांनीही उगीऽऽ उगीऽऽ आढेवेढे घेत उमेदवारीला ममं म्हटलं.

‘थोरल्या काकांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर २००९ सारखाच जल्लोष होईल. फटाके फुटतील,’ असा जो होरा इथल्या स्थानिक नेत्यांनी बांधला होता, तो फुग्याप्रमाणे फटऽऽकन् फुटला. २००९ साली ‘भावी पंतप्रधानकीला मत’ देणारी मंडळीच आता २०१९ साली ‘आमच्या जिल्ह्यात पुन्हा घुसखोरी कशाला?’ असा प्रश्न विचारत ‘माढा...बारामतीकरांना पाडा’ची पोस्ट फिरविण्यात रमली. ‘माढ्याची बारामती का झाली नाही ?’ असा प्रश्न विचारू लागली. सोलापूर अन् सातारा जिल्ह्यात व्हायरल झालेल्या या पोस्टला सीमेचं बंधन नव्हतं. ही पोस्ट क्षणार्धात बारामतीपर्यंत पोहोचली. दहा वर्षांपूर्वीचा काळ आता बदललाय, हे तिथंही अनेकांच्या लक्षात आलं.

त्याच दरम्यान थोरल्या काकांचा अकलूज अन् करमाळ्यात दौरा झाला. कार्यकर्त्यांचे मेळावेही घेतले गेले; मात्र त्यात चकार शब्दानंही त्यांनी आपल्या उमेदवारीची चर्चा केली नाही. पहिल्या भेटीत त्यांनी करमाळ्याच्या रश्मी दीदींना आपल्या गाडीत बसवून मोठ्या विश्वासानं सांगितलेलं की, ‘मला पक्षासाठी संपूर्ण राज्यात फिरायचंय, तेव्हा इथली माझ्या प्रचाराची धुरा तुम्हालाच घ्यावी लागेल,’...मात्र त्याच करमाळ्याच्या दुसºया दौºयात स्वत:च्या उमेदवारीबद्दल अवाक्षरही न काढणाºया थोरले काका बारामतीकर यांची देहबोली बरंच काही सांगून गेलेली. अकलूजमध्येही ते गप्पच राहिलेले, पत्रकार परिषदेत ‘नगरमध्ये सुजय विखेंना घड्याळ्याची उमेदवारी देणार का?’ या प्रश्नावरही ‘होऽऽ होऽऽ देणारऽऽ’ असं उगाचंच म्हणाले, तेव्हाच त्यांच्या मनातली अस्वस्थता लक्षात आलेली. विशेष म्हणजे, ‘माढ्याची बारामती करू, असे मी कधीच म्हणालो नव्हतो. लोक काय काहीही बोलतात,’ असाही बॉम्ब त्यांनी जनतेवर टाकला. हे ऐकून काही पत्रकारांना प्रश्नही पडला की, बारामतीकरांना यंदा माढ्यात उभारायचं नाही की काय ? दरम्यान, त्या दौºयानंतर त्यांनी आपल्या खास यंत्रणेमार्फत माढा  मतदारसंघाचा पुन्हा एकदा सखोल सर्व्हे केला, तेव्हा म्हणे त्यांना मिळाला टोटल निगेटीव्ह रिपोर्ट... म्हणूनच शेवटच्या क्षणी थोरल्या काकांनी घेतली माघारीचा निर्णय.

कोणत्याही युद्धात राजासोबत केवळ मातब्बर सरदारच असून चालत नाहीत. त्यासाठी लागतात जिगरबाज सैनिकही, हेच या ठिकाणी बारामतीकरांना कळून चुकलं. केवळ प्रत्येक तालुक्यातले वाड्यावरचे नेते भलेही लाखांचे आकडे सांगत असले तरी गावोगावच्या पारावरच्या कार्यकर्ताच एकेक मत मिळवून देत असतो... अन् तोच बिथरला तर पन्नास वर्षांच्या अजिंक्यपदाला एका क्षणात धक्का लागू शकतो, हे ओळखण्यात थोरले काका होते नक्कीच माहीर. म्हणूनच त्यांनी चुकीच्या क्षणी घेतला अचूक निर्णय. आता ‘चुकीचा क्षण’ हा शब्द एवढ्यासाठीच वापरायचा की, युद्धाला निघालेल्या कॅप्टननेच ऐनवेळी माघार घेतली तर अवघ्या सैन्याचा लोप पावू शकतो आत्मविश्वास. होऊ शकतं खच्चीकरणऽऽ; मात्र तरीही त्यांच्या इमानी सरदारांचा त्यांच्यावर अजूनही आहे खूप मोठा विश्वास, ‘आपले साहेब काहीही चमत्कार करू शकतात !’
- सचिन जवळकोटे
(लेखक सोलापूर लोकमतचे निवासी संपादक आहेत.)

Web Title: 'Madha' withdrawn. 'Pada' post was huge!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.