अत्यल्प पावसाने नाशकात मका, सोयाबीनचा उतारा घटला, आवकही घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 11:59 AM2018-10-10T11:59:51+5:302018-10-10T12:01:24+5:30

बाजारगप्पा :कमी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे नाशिक जिल्ह्यात खरीप पिकांची स्थिती गंभीर आहे.

Low-rate monsoon, corn, soyabean production drops, decreases in quantity also | अत्यल्प पावसाने नाशकात मका, सोयाबीनचा उतारा घटला, आवकही घटली

अत्यल्प पावसाने नाशकात मका, सोयाबीनचा उतारा घटला, आवकही घटली

Next

- संजय दुनबळे (नाशिक)

कमी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे नाशिक जिल्ह्यात खरीप पिकांची स्थिती गंभीर आहे. त्याचा परिणाम बाजार समित्यांमधील आवकवर झाला आहे. जिल्ह्यातील लासलगाव, नांदगाव, मालेगाव या बाजार समित्यांमध्ये मका, सोयाबीन, बाजरी या पिकांची आवक सुरू झाली असून, मक्याला साधारणत: १३५० ते १४५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. सध्या बाजारात येणारा मका ओला असल्यामुळे भाव कमी-जास्त होत आहे.

लासलगाव बाजार समितीत सोयाबीनला २००० ते ३४२८ रुपये प्रतिक्विं टलचा दर मिळत आहे. मक्याला आर्द्रता पाहून भाव मिळत असून, सध्या बाजारात येणारा मका ओला असल्याने साधारणत: १३५० रुपये क्विं टल भाव मिळत आहे. सुका मका असल्यास त्यास १०० ते १२५ रुपये अधिकचा भाव मिळत आहे. लासलगाव बाजार समितीत इतर भुसार मालाचे भाव स्थिर असल्याचे भुसार मालाचे व्यापारी सचिन ब्रह्मेचा यांनी सांगितले. यावर्षी पाऊस कमी असल्याने मालाच्या उताऱ्यावर त्याचा परिणाम झाला आहे. याशिवाय ऐन काढणीच्या हंगामात वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने त्याचाही पिकांच्या उताऱ्यावर परिणाम होत आहे. कमी उताऱ्याचा शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही फटका बसण्याची शक्यता ब्रह्मेचा यांनी व्यक्त केली. 

नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी ३९ ट्रॉली मक्याची आवक झाली. भाव साधारणत: १०९१ ते १४४६ आणि सरासरी १३४५ रुपये प्रतिक्विं टलपर्यंत होते. बाजरीची ७८ पोती आवक होती. बाजरीला १४२१ ते १७५६ सरासरी १६९० रुपये प्रतिक्विं टल भाव मिळाला. नांदगावी सोयाबीनची आवक नाही. मात्र हरभरा, मूग, गहू, भुईमूग शेंगा यांची आवक आहे. नांदगाव तालुक्यात अत्यल्प पावसाचा सर्वच पिकांना फटका बसला. परिणामी आवक घटली आहे. यामुळे भुसार मालाच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे. चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत भुसार मालाचे हंगामी लिलाव होत असतात. या ठिकाणी अद्याप कोणतीही आवक सुरू झाली नाही.

मालेगावात गुरुवारी ४० ते ५० ट्रॉली मक्याची आवक झाली. मक्याला येथे १३८० ते १४६० रुपये प्रतिक्विं टलचा दर मिळाला. मक्यात आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यास त्याला १२५० ते १३५० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. येथे बाजरीची चांगली आवक सुरू झाली असून, बाजरीची प्रतही चांगली असल्याचे व्यापारी भिका कोतकर यांनी सांगितले. पीक काढणीच्या मोसमात पाऊस झाला नसल्याने बाजरी काळी किंवा डागी झालेली नाही.

येथे बाजरीला १४०० पासून १७६० रुपये प्रतिक्विं टलपर्यंत दर मिळाला आहे. गुरुवारी येथे बाजरीची ४०० ते ५०० पोत्यांची आवक झाली होती. या बाजार समितीत गव्हाला १९०० ते २२०० रुपये क्विं टल दर मिळत आहे. मालेगाव बाजार समितीत या काळात १०० ट्रॉली आवक होणे अपेक्षित असताना केवळ ४० ते ५० ट्रॉलीच आवक झाली. अनेक ठिकाणी मका, सोयाबीनला फटका बसला असल्याने या पिकांचा उताराही कमी झाला आहे.
 

Web Title: Low-rate monsoon, corn, soyabean production drops, decreases in quantity also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.