बीडमध्ये 'जादुची कांडी' कोण फिरवणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 05:12 PM2019-04-12T17:12:31+5:302019-04-12T17:13:32+5:30

गोपीनाथ मुंडे यांचा वारसा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडून सांगण्यात येतो. परंतु, गोपीनाथ मुंडेंची जादूची कांडी कुणाला मिळाली हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Lok Sabha Election 2019 Dhananjay Munde and Pankaja Munde | बीडमध्ये 'जादुची कांडी' कोण फिरवणार ?

बीडमध्ये 'जादुची कांडी' कोण फिरवणार ?

- रवींद्र देशमुख

मुंबई - राज्याच्या राजकारणात बीड जिल्ह्यातील राजकीय तापमान प्रत्येक निवडणुकीत सरासरीपेक्षा अधिकच असते. ज्या प्रमाणे विकासाचा मुद्दा निवडणुकीत गाजतो, त्याप्रमाणे जातीचा मुद्दा बीडच्या राजकारणात कायम केंद्रस्थानी राहिलेला आहे. मागील काही वर्षांपासून बीडच्या राजकारणावर मुंडे कुटुंबियांचे वर्चस्व आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी बीड लोकसभेचे दोन वेळा प्रतिनिधीत्व केले. दोन्ही वेळा लोकसभा निवडणुकीत मुंडे यांनी ऐनवेळी जादूची कांडी फिरवली अशा चर्चा रंगत होत्या. त्याच गोपीनाथ मुंडे यांचा वारसा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडून सांगण्यात येतो. परंतु, गोपीनाथ मुंडेंची जादूची कांडी कुणाला मिळाली हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

२००९ मध्ये गोपीनाथ मुंडे पहिल्यांदा लोकसभेवर गेले. त्यावेळी त्यांच्यासमोर अत्यंत प्रतिकूल स्थिती होती. बीड जिल्ह्यातील सहापैकी पाच विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादीच्या ताब्यात होते. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बीडमध्ये मजबूत होता. मुंडे आणि पवार यांच्यातील वैर सर्वश्रूत होते. परंतु, २००९ मध्ये हे वैर राजकीय पटलावर अधिक स्पष्ट झाले. त्यामुळे बीड लोकसभा जिंकणे शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय झाला होता.

२००९ मधील बीड जिल्ह्यातील स्थिती मुंडे यांच्यासाठी अत्यंत खडतर होती. मात्र गोपीनाथ मुंडे यांना राष्ट्रवादीला शह देण्यात यश आले. मुंडे साहेब जादुची कांडी फिरवणार, असा विश्वास मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना असायचा. त्यावेळी ती जादुची कांडी फिरली आणि मुंडे विजयी झाले. आगदी तिच परिस्थिती २०१४ मध्येही कायम होती. पाच विधानसभा राष्ट्रवादीकडे तर एकटा परळी मतदार संघ भाजपच्या ताब्यात होता. त्यावेळी मोदी लाट आणि गोपीनाथ मुंडे यांचे मतदार संघावर असलेले वर्चस्व यामुळे भाजपला बीड आपल्याकडे राखण्यात यश आले. अर्थात २०१४ मध्ये देखील मुंडे यांची जादुची कांडी चर्चेत आली होती.

दरम्यान भाजप सरकार आल्यानंतर काही दिवसांनी गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोट निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला. अर्थात त्यावेळी प्रमुख पक्षांनी उमेदवार दिले नव्हते. त्यामुळे प्रितम यांचा विजय निश्चितच होता.

सहानुभूतूची लाट संपली

ज्या प्रमाणे २००९ आणि २०१४ लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांच्यासमोर आव्हान होते, त्याचप्रमाणे आता राष्ट्रवादी आणि पर्यायाने गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे याच्यासमोर आव्हान आहे. बीड जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघ भाजपकडे असून बीड विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादीकडे आहे. परंतु, तो देखील जयदत्त क्षीरसागर यांच्या भूमिकेमुळे डळमळीत आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादीला बीडमधून मार्गक्रमण करायचे आहे. तर प्रितम मुंडे यांच्या पाठिशी असलेली सहानुभूतीची लाट आता काही प्रमाणात ओसरली आहे.  तसेच त्यांच्या खासदार निधी खर्च करण्यावरून मतदार संघात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लोकसभेचा शिवधनुष्य पेलणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या विजयाची जबाबदारी धनंजय मुंडे यांच्याकडेच आहे. त्याचप्रमाणे प्रितम मुंडे यांचा विजय मंत्री पंकजा मुंडे यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. बीड लोकसभा निवडणूक चुरशीची समजली जात असली तरी जातीच्या समीकरणांवर बरच काही अवलंबून असणार आहे. त्यामुळे लढत एकतर्फी होणार नाही, हे निश्चितच आहे. परंतु, याआधी जादूची कांडी फिरवणारे गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर बीडमध्ये जादुची कांडी पंकजा फिरवणार की, धनंजय मुंडे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019 Dhananjay Munde and Pankaja Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.