ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 05:42 AM2018-03-28T05:42:32+5:302018-03-28T05:42:32+5:30

शासकीय इतमामात औरंगाबादमध्ये अंत्यसंस्कार

The legendary legendary Gangadhar Pantawane passed away | ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे यांचे निधन

Next

औरंगाबाद : फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा, जाणिवेचे समर्थ वाहक, मराठीतील कवी, विचारवंत, साहित्यिक, समीक्षक, पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ‘अस्मितादर्श’कार डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे (८१) यांचे सोमवारी मध्यरात्री औरंगाबादेत निधन झाले. मंगळवारी सायंकाळी येथील छावणी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मुली नंदिता व निवेदिता यांनी वडिलांच्या पार्थिवास अग्नी दिला.
काही महिन्यांपासून डॉ. पानतावणे यांची प्रकृती बरी नव्हती. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे पद्मश्री किताब घेण्यासाठी त्यांना दिल्लीला जाता आले नव्हते.
भदंत प्रा. डॉ. सत्यपाल व भिक्खू संघाने सामूहिक बुद्धवंदना पठण केली. केंद्र सरकारतर्फे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुष्पचक्र वाहिले. सकाळपासून अनेक साहित्यिक व आंबेडकरी कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, माजी मंत्री गंगाधर गाडे, आ. सुभाष झांबड, न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, गंगाधर गाडे, सुधीर रसाळ, बाबा भांड, रा. रं. बोराडे, रतनकुमार पंडागळे, डॉ. ऋषिकेश
कांबळे, मसापचे अध्यक्ष कौतिकराव
ठाले पाटील आदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
मार्गदर्शक हरपला - मुख्यमंत्री
डॉ. पानतावणे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळ आणि साहित्याला वैचारिकतेचे अधिष्ठान देणारा एक ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला आहे. व्यासंगी प्राध्यापक, कृतिशील विचारवंत आणि परखड समीक्षक म्हणून एक स्वतंत्र ओळख त्यांनी
निर्माण केली. त्यांनी वंचित-उपेक्षितांच्या प्रबोधनासह सक्षमीकरणासाठी दिलेले योगदान 'अस्मितादर्श’क म्हणून समाजाला सतत मार्गदर्शन करीत राहील. विशेषत: साहित्यिकांच्या नव्या पिढीला अभिव्यक्तीसाठी माध्यम उपलब्ध करून देण्यासह तिच्या वैचारिक जडणघडणीतही त्यांचे मोलाचे योगदान होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
दलित जाणिवेला आत्मभान देणारे साहित्यिक
दलित साहित्याला वैचारिक दिशा देतानाच दलित जाणिवेला आत्मभान देणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या निधनाने साहित्य आणि समाजाची फार मोठी हानी झाली आहे. डॉ. पानतावणे यांनी ‘अस्मितादर्श’ या नियतकालिकाच्या माध्यमातून शोषित, वंचितांना विचारपीठ मिळवून दिले. त्यांच्या साहित्यिक योगदानाची जागतिकस्तरावर दखल घेण्यात आली. वैचारिक लिखाणासोबतच समीक्षेच्या क्षेत्रातही त्यांचे योगदान फार मोलाचे आहे. दलित चळवळीला विवेकाचे भान देणाऱ्या या ज्येष्ठ साहित्यिकाच्या निधनाने लोकमत परिवाराने आपला जवळचा मित्र गमावला आहे, अशा शब्दांत माजी खासदार व लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Web Title: The legendary legendary Gangadhar Pantawane passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.