शिवसेनेचे मतदारसंघ सोडून भाजपाची लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 06:22 AM2019-01-31T06:22:26+5:302019-01-31T06:23:02+5:30

युतीसाठी सकारात्मक संकेत; दोन्ही पक्षांच्या नेत्यांची गुप्त ठिकाणी बैठक

Leaving the Shiv Sena's Constituency for BJP's Lok Sabha election | शिवसेनेचे मतदारसंघ सोडून भाजपाची लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

शिवसेनेचे मतदारसंघ सोडून भाजपाची लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

Next

मुंबई : शिवसेनेकडे असलेले लोकसभा मतदारसंघ सोडून उर्वरित मतदारसंघात भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे, तर दुसरीकडे, युती व्हावी, ही लोकांची इच्छा असून अंतिम निर्णय उद्धवजी घेतील, असे सांगत गृहराज्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनीही युतीबाबत सकारात्मक संकेत दिले.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने लढविलेल्या मतदारसंघाचा आढावा दोन दिवसांपासून ‘वर्षा’ बंगल्यावर घेणे सुरू आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह माजी मंत्री एकनाथ खडसे हेही उपस्थित आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाचे एक केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे एक ज्येष्ठ मंत्री यांच्यात चर्चेच्या फेऱ्या गुप्त ठिकाणी सुरू आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मातोश्रीवर उत्तर महाराष्ट्र आणि कोकणमधील मतदारसंघाचा आढावा घेतला. शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ पाचोरा (जि.जळगाव) येथे १५ फेब्रुवारीला फोडण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. पाचोरा शहर ज्या जळगाव मतदारसंघात येते, तो भाजपाकडे आहे.

भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा उद्धव ठाकरेंना फोन
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी युतीसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ‘शिवसेना हा भाजपाचा सर्वात जुना मित्र पक्ष आहे आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण एकत्र आहोत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने युती लवकर होणे आवश्यक आहे, अशी भावना अमित शहा यांनी ठाकरे यांच्याकडे व्यक्त केल्याचे समजते.

Web Title: Leaving the Shiv Sena's Constituency for BJP's Lok Sabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.