शिवसेनेत अन् राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या ऑडिओ क्लिपमधील 'प्रसाद कर्वे' नेमके आहेत कोण?; वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 07:51 PM2021-10-02T19:51:39+5:302021-10-02T19:56:16+5:30

प्रसाद कर्वे यांच्या किरीट सोमय्या आणि रामदास कदम यांच्यासोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल; अनिल परब यांच्या विरोधातील माहिती सोमय्यांना दिल्याचा आरोप

know Prasad Karve whose audio clip with kirit somaiya and ramdas kadam went viral | शिवसेनेत अन् राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या ऑडिओ क्लिपमधील 'प्रसाद कर्वे' नेमके आहेत कोण?; वाचा...

शिवसेनेत अन् राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या ऑडिओ क्लिपमधील 'प्रसाद कर्वे' नेमके आहेत कोण?; वाचा...

googlenewsNext

- शिवाजी गोरे

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्यांनी गेल्या काही महिन्यांत शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर सातत्यानं आरोप करून सोमय्यांनी त्यांना वारंवार अडचणीत आलं आहे. परब यांच्यावर तुटून पडलेल्या सोमय्यांना शिवसेनेच्याच बड्या नेत्याने रसद पुरवल्याचा आरोप आता राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. याशिवाय मनसेच्या नेत्यानं सोमय्या आणि कदम यांच्या ऑडिओ क्लिपदेखील समोर आणल्या आहेत.

शिवसैनिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद कर्वे हे अनिल परब यांच्याविरोधात किरीट सोमय्यांना सगळी माहिती पुरवतो, कारवाईसाठी पाठपुरावा करतो आणि मग हाच कार्यकर्ता सगळ्या अपडेट्स शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांना देतो, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी केला आहे. संजय कदम यांचे आरोप रामदास कदम यांनी फेटाळले आहेत.

कोण आहेत प्रसाद कर्वे?
प्रसाद उर्फ बाळा कर्वे हे बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जात होते. कधीकाळी मातोश्रीवर प्रसाद कर्वे यांना थेट प्रवेश दिला जात होता. बाळा कर्वे अशी ओळख असलेले प्रसाद कर्वे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुजारी म्हणून ओळखले जायचे. काही वर्ष मुंबईत भटजी म्हणून काम केल्यानंतर प्रसाद कर्वे दापोलीत आले. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे मूळगाव मुरुड येथील रहिवासी असलेले प्रसाद कर्वे सध्या वास्तव्यास दापोलीत आहेत गेली. अनेक वर्ष पुजारी म्हणून त्यांची ओळख आहे अलीकडे त्यांना सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून ओळखले जाते. कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांच्या पूजेवर सुरू आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून ओळखले जात आहेत. माहिती अधिकारात त्यांनी आजपर्यंत 13000 अर्ज केले आहेत. त्यांच्या माहिती अधिकारामुळे अनेक लोकांना न्यायसुद्धा मिळाला आहे.

कधीकाळी मातोश्रीवर प्रसाद कर्वे यांचा थेट संपर्क असल्याने शिवसेनेत त्यांच्या शब्दाला खूप वजन होते. माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जात होते. परंतु अलीकडे ते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. दापोली तालुक्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावरील सीआरझेडचे उल्लंघन करून बांधण्यात आलेल्या काही हॉटेल व्यवसायिकांची माहितीच्या अधिकारात त्यांनी माहिती मागवली होती. प्रसाद कर्वे यांनीच किरीट सोमय्या यांना माहिती पुरवण्याच्या काही क्लिप व्हायरल झाल्याने अचानक प्रसाद कर्वे पुन्हा एकदा प्रकाशझोतामध्ये आले आहेत.

कर्वेंचा माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याशी झालेला संवादसुद्धा व्हायरल झाला आहे. त्यामुळे राज्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पक्षातचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब व मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यांसंदर्भातली संपूर्ण माहिती प्रसाद कर्वे यांनीच पुरवली असल्याचा खळबळजनक आरोप माजी आमदार संजय कदम आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला आहे त्यामुळे प्रसाद कर्वे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

 दापोली तालुक्यात प्रसाद कर्वे पुजारी माहितीचा अधिकार कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते मातोश्री भेट संपर्क असलेले निष्ठावंत शिवसैनिक अशी त्यांची आज पर्यंत इमेज होती परंतु प्रसाद कर्वे यांच्या संवादाच्या क्लिप वायरल झाल्याने राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Web Title: know Prasad Karve whose audio clip with kirit somaiya and ramdas kadam went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.