कर्नाटकमध्ये भाजपाच बाजी मारणार- अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2018 08:20 PM2018-03-04T20:20:22+5:302018-03-04T20:20:22+5:30

त्रिपुरा तसेच नागालँडमधील विजयानंतर भाजपाचे पुढील टार्गेट कर्नाटक राज्य असणार आहे. यासंदर्भात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना पूर्ण आत्मविश्वास असून तुम्ही लिहून ठेवा, कर्नाटकमध्येदेखील भाजपच बाजी मारणार, असे वक्तव्य त्यांनी नागपुरात केले.

In Karnataka, the BJP will win - Amit Shah | कर्नाटकमध्ये भाजपाच बाजी मारणार- अमित शहा

कर्नाटकमध्ये भाजपाच बाजी मारणार- अमित शहा

Next

नागपूर : त्रिपुरा तसेच नागालँडमधील विजयानंतर भाजपाचे पुढील टार्गेट कर्नाटक राज्य असणार आहे. यासंदर्भात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना पूर्ण आत्मविश्वास असून तुम्ही लिहून ठेवा, कर्नाटकमध्येदेखील भाजपच बाजी मारणार, असे वक्तव्य त्यांनी नागपुरात केले. अमित शहा यांनी रविवारी संघ मुख्यालयात येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. दिवसभर शहा नागपुरात होते, मात्र प्रसारमाध्यमांशी त्यांनी अवघ्या वरील एका वाक्यात संवाद साधला. संघ मुख्यालयात ते सुमारे ४ तास होते.

अमित शहा यांचे रविवारी दुपारी १२ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन झाले. त्यानंतर ते थेट केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी गेले. यावेळी गडकरी व शहा यांच्यात सुमारे ४५ मिनिटे चर्चा झाली. यावेळी शहा यांनी गडकरी यांच्याकडेच भोजन केले. त्यानंतर ते रविभवनकडे रवाना झाले.

संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला ९ मार्चपासून रेशीमबाग येथे सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर दुपारी पावणेतीन वाजता अमित शहा संघ मुख्यालयात पोहोचले. तेथे त्यांनी सर्वात अगोदर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली व दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी सरकार्यवाह भय्याजी जोशी, सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, सहसरकार्यवाह सुरेश सोनी हेदेखील उपस्थित होते. संघ मुख्यालयात शहा यांनी नेमकी काय भूमिका मांडली याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. परंतु अखिल भारतीय प्रतिनिधी सभेसोबतच कर्नाटकमधील निवडणुकांसंदर्भातील मुद्द्यांवरदेखील निश्चितपणे चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अमित शहा सायंकाळी पावणेसात वाजता संघ मुख्यालयातून बाहेर पडले.

पूर्वनियोजित होती भेट
त्रिपुरा विजय, मेघालयमधील सत्तास्थापनेसाठी प्रयत्न या मुद्द्यांवरच चर्चा करण्यासाठीच शहा नागपुरात आल्याचे कयास लावण्यात येत होते. परंतु संघातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्यक्षात ही भेट पूर्वनियोजित होती व ९ मार्चपासून रेशीमबागेत सुरू होणा-या संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या अगोदर शहा यांनी संघ पदाधिका-यांजवळ भाजपचे प्रतिनिधी म्हणून काही अपेक्षा व पुढील ३ वर्षांसाठीच्या योजनेचे प्रारुप त्यांनी यावेळी मांडले. संघात अशी प्रक्रियाच असून विविध संघटनांचे प्रतिनिधी संघश्रेष्ठींची भेट घेतात. सोमवारपासून प्रतिनिधी सभेअगोदरच्या बैठक सत्रांना प्रारंभ होणार आहे. २०१५ साली नागपुरात अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत अमित शहा सहभागी झाले होते. त्या बैठकीच्या ६ दिवस अगोदर अमित शहा यांना ऐन धुळवडीच्या दिवशी संघ मुख्यालयात बोलविण्यात आले होते हे विशेष.

कर्नाटकचे टार्गेट
कॉंग्रेसमुक्त भारत हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून शहांच्या नेतृत्वात भाजपाची घोडदौड सुरू आहे. पुढील काळात कर्नाटकमध्ये निवडणुका आहेत. पूर्वोत्तरमधील विजयामुळे हुरळून न जाता कर्नाटकमध्ये नेमकी काय भूमिका असायला हवी, याबाबत संघश्रेष्ठींनी शहा यांना मार्गदर्शन केले. या निवडणुकांमधील नियोजनासंबंधात यावेळी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: In Karnataka, the BJP will win - Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.