"ऑडिओमधील आवाज अंगावर शहारे आणणारा, तात्काळ कारवाई करा"; देवेंद्र फडणवीसांनी लिहिलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 06:00 PM2021-08-20T18:00:53+5:302021-08-20T18:15:09+5:30

लोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा मार्ग आपण स्वीकारला आहे अशा आशयाची अहमदनगरमधील महिला तहसिलदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं खळबळ माजली आहे.

Jyoti Devare Audio Clip on Nilesh Lanke, Devendra Fadnavis wrote a letter to CM Uddhav Thackeray | "ऑडिओमधील आवाज अंगावर शहारे आणणारा, तात्काळ कारवाई करा"; देवेंद्र फडणवीसांनी लिहिलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

"ऑडिओमधील आवाज अंगावर शहारे आणणारा, तात्काळ कारवाई करा"; देवेंद्र फडणवीसांनी लिहिलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

googlenewsNext
ठळक मुद्देएक स्त्री अधिकारी आपले कर्तव्य पार पाडत असताना संपूर्ण यंत्रणाच तिचे मानसिक खच्चीकरण करीत असेलमहिला अधिकार्‍याला आत्महत्येचा इशारा द्यावा लागत असेल तर ही बाब अतिशय गंभीरछत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एखाद्या महिला अधिकार्‍याची इतकी अवहेलना होऊ नये

मुंबई - अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील तहसिलदार ज्योती देवरे(Jyoti Devare Audio Clip) यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकार्‍यांवर केलेले आरोप अतिशय गंभीर आहेत. त्यांनी आत्महत्येचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप सुद्धा जारी केली आहे. या प्रकरणाची तातडीने दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि त्यांचे म्हणणे प्रत्यक्ष ऐकून घेत त्यांना न्याय द्यावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवून केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, नगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांनी ११ मिनिटांची एक ऑडिओ क्लिप जारी करून अनेक गंभीर आरोप स्थानिक लोकप्रतिनिधीवर आणि वरिष्ठ अधिकार्‍यांवर केले आहेत. लसीकरणावरून काही कर्मचार्‍यांना पोलिस अधिकार्‍यांच्या समोर मारहाण करणे, अश्लील शिविगाळ करणे, महिला कर्मचार्‍यांना मारण्यासाठी महिला पोलिसांना बोलाविण्यास सांगणे, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांपर्यंत प्रकरण नेल्यानंतर तहसिलदार ज्योती देवरे यांच्याच बदनामीचा प्रयत्न करणे, वरिष्ठ अधिकार्‍यांकडूनही त्यांना धमक्या प्राप्त होणे, कोरोना काळात नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करीत असताना त्यातही अडचणी उत्पन्न करणे आणि मग थेट मंत्र्यांकडे त्यांच्या बदलीची शिफारस करणे, यातून महिला अधिकार्‍यांचे खच्चीकरण करणे, असे अनेक गंभीर आरोप त्यांनी केले असल्याचं फडणवीस यांनी सांगितले आहे.

तसेच थेट दीपाली चव्हाण प्रकरणाचा उल्लेख करून मी सुद्धा तुझ्याकडे येतेय. हा त्यांचा ऑडिओमधील आवाज अंगावर शहारे आणणारा आहे. एक स्त्री अधिकारी आपले कर्तव्य पार पाडत असताना संपूर्ण यंत्रणाच तिचे मानसिक खच्चीकरण करीत असेल आणि परिणामी त्या महिला अधिकार्‍याला आत्महत्येचा इशारा द्यावा लागत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आणि मनाला वेदना देणारी आहे. खरे तर कोरोना काळात संपूर्ण यंत्रणा दबावात काम करीत असताना त्यांना आणखी नाहक त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाणे अतिशय आवश्यक आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

दरम्यान, आपण यात तात्काळ लक्ष घालून हस्तक्षेप करावा. या महिला अधिकार्‍याला आपण स्वत: बोलावून घेऊन त्यांची तक्रार ऐकून घ्यावी आणि त्यांच्या व्यथा समजून घ्याव्यात आणि तात्काळ त्यावर तोडगा काढून त्या अधिकार्‍याला न्याय द्यावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एखाद्या महिला अधिकार्‍याची इतकी अवहेलना होऊ नये, हीच कळकळीची विनंती अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रातून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

काय आहे प्रकरण?

लोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा मार्ग आपण स्वीकारला आहे अशा आशयाची महिला तहसिलदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं खळबळ माजली आहे. ही क्लिप ज्योती देवरे यांचीच असल्याचे अहमदनगर जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आत्महत्या केलेल्या वनाधिकारी दीपाली चव्हाण यांना उद्देशून देवेरे यांनी या क्लिपमध्ये निवेदन केले आहे. शुक्रवारी सकाळी ही क्लिप सोशल मीडियावर पोस्ट झाली. मी लवकरच तुझ्यासोबत येत असल्याचे सांगत, महिला म्हणून प्रशासनात कसा छळ होतो, लोकप्रतिनिधी कसा त्रास देतात आणि वरिष्ठ त्यांना कसे पाठीशी घालतात, याबाबत त्यांनी या क्लिपमध्ये आरोप केले आहेत.

पारनेरच्या महिला तहसीलदारांचा आत्महत्येचा इशारा; ऑडिओ क्लिपमध्ये आमदार निलेश लंकेंवर आरोप

आपल्या विरुद्ध विधिमंडळात प्रश्न मांडणे, दमदाटी करणे, मी मारहाण केल्याची तक्रार माझ्या गाडीचालकाकडून लिहून घेणे, अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये तक्रार दाखल करण्याची धमकी देणे, असे अनेक प्रकार घडले आहेत, असे देवेरे यांनी आपल्या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे. याबाबतचे निवेदन कथन करताना त्या अनेकदा रडतही आहेत.

Web Title: Jyoti Devare Audio Clip on Nilesh Lanke, Devendra Fadnavis wrote a letter to CM Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.