पर्रीकरांबाबतच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास, जितेंद्र आव्हाड यांच्याकडून सारवासारव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 12:15 AM2019-03-19T00:15:27+5:302019-03-19T00:21:29+5:30

मनोहर पर्रीकर यांच्याबाबत मी केलेल्या विधानाचा प्रसारमाध्यमांनी विपर्यास केला, अशी सारवासारव राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

Jitendra Awhad statement on Manohar Parrikar | पर्रीकरांबाबतच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास, जितेंद्र आव्हाड यांच्याकडून सारवासारव

पर्रीकरांबाबतच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास, जितेंद्र आव्हाड यांच्याकडून सारवासारव

googlenewsNext

मुंबई -  मनोहर पर्रीकर यांच्याबाबत मी केलेल्या विधानाचा प्रसारमाध्यमांनी विपर्यास केला, अशी सारवासारव राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. मनोहर पर्रीकर हे राफेल विवादातील पहिले बळी आहेत, असे आव्हाड यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून वादाला तोंड फुटले होते. 

गोव्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे रविवारी संध्याकाळी निधन झाले होते. गेल्या वर्षभरापासून ते कर्करोगाशी झुंजत होते. दरम्यान, पर्रीकर यांच्या मृत्यूबाबत बोलताना आव्हाड यांनी मनोहर पर्रीकर हे राफेल विवादातील पहिले बळी आहेत, असे म्हटले होते. मात्र आव्हाड यांनी आपल्या या वक्तव्याबाबत आता स्पष्टिकरण दिले आहे. ते म्हणाले की,'' मी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेचा विपर्यास करण्यात आला. माझ्या ज्या प्रतिक्रियेचा विपर्यास करण्यात आला आहे. तीच प्रतिक्रिया मी खोलवर देत आहे.  रविवारी दुपारी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे र्ककरोगाशी झुंज देताना निधन झाले. त्यांच्या जाण्याने एक प्रामाणिक राजकारण्याची उणीव निर्माण झाली आहे. त्यांची माझी ;चार ते पाच वेळा भेट झाली होती.  कधी विमानतळावर.. कधी विमानात तर कधी गोव्यात मी त्यांना भेटलो होतो. हसतमुखं, निर्गवी  असलेले हे व्यक्तीमत्व पुस्तकात रममान झालेले असायचं. त्यांच्याशी थोडंस बोलणं झालं की ते पुन्हा पुस्तकात रममान व्हायचे. आयआयटीमध्ये शिक्षण झालेले ते अभ्यासू राजकारणी होते.'' 

''ठाण्यात त्यांचा एक वर्गमित्र राहतो. त्यांच्या वर्गमित्राशी चर्चा करताना पर्रिकर यांच्या मिनमिळाऊ स्वभावाची अनेकदा आठवण निघायची.  पर्रिकर यांच्या कपड्यांवरुन त्यांच्या राहणीमानाची कल्पना यायची. साधारणसा शर्ट आणि साधारणशी पँट ते वापरायचे. पायात कधी साधी चप्पल तर कधी सँडल असयाचे. एकदा एका फोटोग्राफरने त्यांच्या तुटलेल्या चप्पलेसह त्यांचा फोटो काढला. मात्र, पर्रिकर यांनी लगेच त्या फोटोग्राफरला सांगून हा फोटो छापू नकोस, अशी सूचना केली. तो फोटो कधीच कुठे प्रसिद्ध झाला नाही. साधे राहणीमान असलेले पर्रिकर हे दिल्लीत गेले.  तेथे त्यांच्या खांद्यावर संरक्षणमंत्रीपदाची धुरा देण्यात आली. त्यांनी आपली ही जबाबदारी अत्यंत कुशलतेने पार पाडली. जो पर्यंत त्यांना बंगला मिळाला नाही. तोपर्यंत ते नौदलाच्या विश्रामगृहात राहिले. एकीकडे अनेक मंत्री फाईव्हस्टार हॉटेलात रहात असताना पर्रिकर हे मात्र, एका रेस्ट हाऊसमध्ये राहिले होते.''असेही आव्हाड यांनी सांगितले. 

पर्रीकर आणि राफेलसंदर्भात भाष्य करताना त्यांनी सांगितले की, ''राफेलच्या संदर्भात जस-जसे आवाज उंचावू लागला. तस-तसे ते अस्वस्थ होऊ लागले. त्यातूनच ते गोव्याला रवाना झाले. आजपर्यंत राफेलच्या प्रकरणात अनेकांवर आरोप झाले. मात्र, पर्रिकरांच्या नावाचा उल्लेखही कोणी केला नाही. यावरुनच त्यांच्या सच्चाईची आणि सचोटीची ओळख पटते.  मात्र, हा तणावच त्यांच्या शरीराला अपायकारक ठरत गेला. हा तणावच त्यांच्या शरीराला मारक ठरला. त्यातच त्यांना देवाज्ञा झाली अन् एका चांगल्या प्रामाणिक राजकारणी व्यक्तीमत्वाला हा देश मुकला. आज देशभर राफेलचा धुरळा उडत असतानाही त्याची साधी धूळही पर्रिकरांच्या जवळपासही गेली नाही.  राफेलची बोलणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सला गेले. पण , संरक्षण मंत्री असतानाही पर्रिकर हे या वाटाघाटींमध्ये सहभागी झाले नाहीत. यावरून पर्रिकर यांच्यातील प्रामाणिकतेची साक्ष पटते. त्यानंतर ते प्रचंड अस्वस्थ झाले होते. त्यांच्या मनातील ही अस्वस्थता त्यांनी आपल्या अनेक मित्रांजवळ बोलूनही दाखवली होती.  या प्रामाणिक व्यक्तिमत्वाला मी आदरांजली अर्पण करतो.'' 

 

Web Title: Jitendra Awhad statement on Manohar Parrikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.