...तर महाराष्ट्रात ही परिस्थिती ओढवली नसती, फोडाफोडीच्या राजकारणावर फडणवीसांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 01:08 PM2024-02-23T13:08:38+5:302024-02-23T13:14:31+5:30

Devendra Fadnavis News: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फोडाफोडीवरून भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफेर टीका होत आहे. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फोडाफोडीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे.

... If this situation would not have happened in Maharashtra, Devendra Fadnavis's big statement on the politics of violence | ...तर महाराष्ट्रात ही परिस्थिती ओढवली नसती, फोडाफोडीच्या राजकारणावर फडणवीसांचं मोठं विधान

...तर महाराष्ट्रात ही परिस्थिती ओढवली नसती, फोडाफोडीच्या राजकारणावर फडणवीसांचं मोठं विधान

२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर  घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे युतीला स्पष्ट बहुमत मिळूनही भाजपा सत्तेबाहेर राहावं लागलं होतं. तर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडावं लागलं होतं. मात्र या घटनेनंतर अडीच वर्षांनी या सर्वांचा वचपा काढताना भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सुरूंग लावत अनुक्रमे शिंदे गट आणि अजित पवार गटाला आपल्यासोबत युतीमध्ये आणले होते. या फोडाफोडीवरून भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफेर टीका होत आहे. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फोडाफोडीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. जर २०१९ मध्ये जनतेनं दिलेला निकाल धुडकावून जनादेश नाकारून आमच्या पाठीत खंजीर खुपसला नसता तर ही परिस्थिती ओढवली नसती, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मी एवढंच सांगेन की, जनतेने बहुमत दिलेल्या सरकारला जेव्हा लोकशाही विरोधी पद्धतीने बाहेर केलं जातं तेव्हा महाराष्ट्रात घडल्या तशा घटना घडतात. मला वाटतं की, जर २०१९ मध्ये जनतेनं दिलेला निकाल धुडकावून जनादेश नाकारून आमच्या पाठीत खंजीर खुपसला नसता तर ही परिस्थिती ओढवली नसती. महाराष्ट्राला एक चांगलं स्थिर सरकार मिळालं असतं. मात्र आता आम्ही परत आलो आहोत. तसेच राज्याला स्थिर सरकार देत आहोत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच ‘आगे आगे देखीए होता है क्या’, असं राज्यातील पुढील घडामोडींबाबत सूचक विधान फडणवीस यांनी केलं आहे. 

त्यांनी पुढे सांगितले की, आमच्यासोबत असलेली एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही खरी शिवसेना आहे. एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक आहेत. एकप्रकारे बाळासाहेबांची शिवसेना आमच्यासोबत आहे. तसेच शिवसेनेसोबतची आमची युती ही भावनिक आहे. तर अजित पवार यांच्यासोबत तयार केलेली आघाडी ही राजकीय आहे. कदाचित ५-१० वर्षांनंतर ही आघाडीसुद्धा भावनिक होईल, अशी अपेक्षा आहे, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी उद्धव ठाकरे यांच्याबाबतही फडणवीस यांनी महत्त्वाचं विधान केलं. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे जेव्हा फोन करायचे तेव्हा मी यायचो, भेटायचो बोलायचो. मात्र २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माझे फोन उचलणे बंद केले होते. आता उद्धव ठाकरे हे आमच्यापासून मनाने दूर झाले आहेत. ते आता माझे मित्र आहेत का हे त्यांनाच विचारा. आता उद्धव ठाकरेंसोबत जाणं अशक्य आहे, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या महायुतीत येण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. 

Web Title: ... If this situation would not have happened in Maharashtra, Devendra Fadnavis's big statement on the politics of violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.