चीन वादात अमेरिकेने सहकार्य केले तरच, मोदींनी दिलेल्या आलिंगनाला अर्थ - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 08:37 AM2017-07-26T08:37:04+5:302017-07-26T08:57:07+5:30

भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना उपरोधिक टोले लगावले आहेत.

If America stand with india for Row with china then only modi freindship with trump is fruitful | चीन वादात अमेरिकेने सहकार्य केले तरच, मोदींनी दिलेल्या आलिंगनाला अर्थ - उद्धव ठाकरे

चीन वादात अमेरिकेने सहकार्य केले तरच, मोदींनी दिलेल्या आलिंगनाला अर्थ - उद्धव ठाकरे

googlenewsNext
ठळक मुद्देसामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना उपरोधिक टोले लगावले आहेत. चीनव्याप्त डोकलामने छातीत काटा घुसवला आहे १९६२ च्या युद्धानंतर चिन्यांनी हिंदुस्थानला कुरतडले आहेच

मुंबई, दि. 26 - सिक्कीम जवळच्या डोकलाममध्ये भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना उपरोधिक टोले लगावले आहेत. डोकलाममध्ये घुसलेल्या चीनला मागे हटविण्यास तरी अमेरिका व इस्रायलचे पंतप्रधान मोदी यांना सहकार्य करतील काय? शेवटी तसे सहकार्य झालेच तर मोदी आणि या पंतप्रधानांनी एकमेकांना दिलेल्या आलिंगनास अर्थ आहे असे अग्रलेखात म्हटले आहे. 

पाकव्याप्त कश्मीरचा खंजीर पाठीत घुसला असतानाच चीनव्याप्त डोकलामने छातीत काटा घुसवला आहे असे अग्रलेखात लिहीले आहे.  चिनी लष्कराचे प्रवक्ते वू किमाने यांनीच उघड उघड धमकी दिली आहे. मात्र तरीही आपण ती गांभीर्याने घेताना दिसत नाही. कश्मीरचा एक भाग पाकड्यांनी घशात घातला. १९६२ च्या युद्धानंतर चिन्यांनी हिंदुस्थानला कुरतडले आहेच, त्यात आणखी थोडे कुरतडले तर काय झाले या मस्त विचारात सरकार मग्न आहे काय? असा सवाल विचारला आहे. 

विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसच्या भूमिकेवरही अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. बोफोर्सप्रश्नी लोकसभेत अध्यक्षांच्या दिशेने कागदाचे बोळे काँग्रेसवाले फेकतात, पण डोकलामप्रश्नी धारदार पद्धतीने प्रश्न विचारणे त्यांना जमत नाही. राष्ट्राच्या संरक्षणाबाबत सरकारपेक्षा विरोधी पक्षाने जास्त टोकदार भूमिका घेणे गरजेचे असते. युद्ध झालेच तर फक्त दहा दिवस पुरेल इतकाच दारूगोळा उरला आहे या बातमीने देशातील जनतेची झोप उडाली असेल, पण धडधाकट विरोधी पक्ष व सत्ताधारी जणू मांडलिकत्व पत्करून निपचीत जगण्याच्या तयारीस लागले आहेत असे अग्रलेखात म्हटले आहे. 

काय म्हटले आहे अग्रलेखात 
- डोकलाममध्ये घुसलेल्या चीनला मागे हटविण्यास तरी अमेरिका व इस्रायलचे पंतप्रधान मोदी यांना सहकार्य करतील काय? शेवटी तसे सहकार्य झालेच तर मोदी आणि या पंतप्रधानांनी एकमेकांना दिलेल्या आलिंगनास अर्थ आहे. नाहीतर नेहमीप्रमाणे आपली लढाई आपल्यालाच लढावी लागेल. पाकव्याप्त कश्मीरचा खंजीर पाठीत घुसला असतानाच चीनव्याप्त डोकलामने छातीत काटा घुसवला आहे. पंतप्रधानांवर व त्यांच्या क्षमतेवर आमचा विश्वास आहे. ते नक्कीच काहीतरी करतील.

- डोकलामप्रकरणी हिंदुस्थानचे पंतप्रधान गप्प का आहेत? चीनचे सैन्य डोकलामपर्यंत म्हणजे जवळजवळ हिंदुस्थानी हद्दीत घुसलेच आहे व सिक्कीम-भूतानच्या सीमेवर आता जे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे त्याबाबत देशवासीयांच्या मनात चिंतेची पाल चुकचुकू लागली आहे. डोकलाम चीनचाच भाग असून आपले सैन्य मागे हटणार नसल्याचे त्यांच्यातर्फे बजावण्यात आले आहे.  एवढेच नव्हे तर हिंदुस्थानने सैन्य मागे न घेतल्यास तेथील चिनी सैनिकांची संख्या वाढविण्यात येईल अशी धमकी आता चीनने दिली आहे. पुन्हा एकवेळ डोंगर हलविता येईल, पण चीनचे लष्कर डोकलाममधून हटविणे केवळ अशक्य आहे अशी दर्पोक्तीही चिनी लष्कराच्या प्रवक्त्याने केली आहे. कालपर्यंत चीनमधील वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांमधून अशाप्रकारच्या धमक्या, इशारे हिंदुस्थानला दिले जात होते.

- मात्र आता चिनी लष्कराचे प्रवक्ते वू किमाने यांनीच उघड उघड धमकी दिली आहे. मात्र तरीही आपण ती गांभीर्याने घेताना दिसत नाही. कश्मीरचा एक भाग पाकड्यांनी घशात घातला. १९६२ च्या युद्धानंतर चिन्यांनी हिंदुस्थानला कुरतडले आहेच, त्यात आणखी थोडे कुरतडले तर काय झाले या मस्त विचारात सरकार मग्न आहे काय? हिंदुस्थान, चीन आणि भूतान यांच्या सीमारेषा येऊन मिळतात तिथे हा डोकलाम भाग आहे. चीनला तिथे रस्ता बनवायचा आहे. हिंदुस्थान व भूतानने त्यास विरोध केला असला तरी डोकलाम हा चीनचाच भाग असल्याचे सांगून चीनने तिथे सैन्य घुसवले आहे व युद्धसामग्री पोहोचवून दबावाची पहिली तोफ डागली आहे. चीन डोकलामप्रश्नी रोज धमक्या देत आहे व दिल्लीत राजकीय उत्सवाची आतषबाजी सुरूच आहे. संसदेचे अधिवेशन इतक्या निरस आणि कंटाळवाण्या पद्धतीने चालले आहे की, बोफोर्सप्रश्नी लोकसभेत अध्यक्षांच्या दिशेने कागदाचे बोळे काँग्रेसवाले फेकतात, पण डोकलामप्रश्नी धारदार पद्धतीने प्रश्न विचारणे त्यांना जमत नाही. राष्ट्राच्या संरक्षणाबाबत सरकारपेक्षा विरोधी पक्षाने जास्त टोकदार भूमिका घेणे गरजेचे असते. युद्ध झालेच तर फक्त दहा दिवस पुरेल इतकाच दारूगोळा उरला आहे या बातमीने देशातील जनतेची झोप उडाली असेल, पण धडधाकट विरोधी पक्ष व सत्ताधारी जणू मांडलिकत्व पत्करून निपचीत जगण्याच्या तयारीस लागले आहेत.

- कश्मीरचा एक भाग पाकव्याप्त झाला तसे डोकलामही कायमचे चीनव्याप्त होऊ नये. रामनाथ कोविंद यांच्या रूपाने देशाला नवे राष्ट्रपती मिळाले आहेत. राष्ट्रपती हे तिन्ही सेनादलांचे प्रमुख असले तरी अमेरिका व इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षांशी पंतप्रधान मोदी यांची व्यक्तिगत मैत्री आहे. ती कशी दृढ आहे तेदेखील जगाने त्यांच्या भेटीगाठींद्वारा पाहिले आहे. त्यामुळेच हिंदुस्थानसमोरील चीन आणि पाकिस्तानचे आव्हान मोडून काढण्यासाठी ही मैत्री उपयोगी पडेल अशी एक अपेक्षा हिंदुस्थानी जनतेची आहे. अर्थात, पाकिस्तानकडून हिंदुस्थानात होणारी घुसखोरी आणि कश्मीर सीमेवर होणारे पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ले संपविण्यासाठी आजपर्यंत तरी ही मैत्री मदतीला आलेली नाही. आता निदान डोकलाममध्ये घुसलेल्या चीनला मागे हटविण्यास तरी अमेरिका व इस्रायलचे पंतप्रधान मोदी यांना सहकार्य करतील काय? शेवटी तसे सहकार्य झालेच तर मोदी आणि या पंतप्रधानांनी एकमेकांना दिलेल्या आलिंगनास अर्थ आहे. नाहीतर नेहमीप्रमाणे आपली लढाई आपल्यालाच लढावी लागेल. पाकव्याप्त कश्मीरचा खंजीर पाठीत घुसला असतानाच चीनव्याप्त डोकलामने छातीत काटा घुसवला आहे. पंतप्रधानांवर व त्यांच्या क्षमतेवर आमचा विश्वास आहे. ते नक्कीच काहीतरी करतील.

Web Title: If America stand with india for Row with china then only modi freindship with trump is fruitful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.