वारंवार खोटे बोलणा-या मुख्यमंत्र्यांवर विश्वास कसा ठेवायचा? - खा. अशोक चव्हाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 05:16 PM2018-08-06T17:16:08+5:302018-08-06T17:16:47+5:30

वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करणा-या मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या आश्वासनावर विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल चव्हाण यांनी केला आहे.   

How to trust the chief minister repeatedly lying? - Ashok Chavan | वारंवार खोटे बोलणा-या मुख्यमंत्र्यांवर विश्वास कसा ठेवायचा? - खा. अशोक चव्हाण 

वारंवार खोटे बोलणा-या मुख्यमंत्र्यांवर विश्वास कसा ठेवायचा? - खा. अशोक चव्हाण 

Next

मुंबई - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे.  शेतकरी कर्जमाफी, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण अशा विविध विषयांवर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करणा-या मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या आश्वासनावर विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल चव्हाण यांनी केला आहे.   

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण नांदेड येथे पत्रकारांशी बोलताना  म्हणाले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे सरकार सत्तेत आल्यावर पहिल्या मंत्रीमंडळ बैठकीत धनगर समजाला आरक्षण देऊ. मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवू अशी आश्वासने दिली होती. सत्तेत येऊन साडेतीन वर्षापेक्षा जास्त काळ झाला, पण हे प्रश्न काही सुटले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांना कर्जमाफी देण्याची घोषणा करून एक वर्ष उलटले तरी अद्याप कर्जमाफी मिळाली नाही. आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याऐवजी आरक्षणाच्या मुद्द्यावरून बेताल वक्तव्ये केली जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे हे वेगवेगळी वक्तव्ये करून संभ्रम निर्माण करत आहेत,"  

"मुस्लीम आरक्षणाला न्यायालयाने मान्यता दिली आहे. तरीही सरकार मुस्लीम समाजाला आरक्षण देत नाही. मुख्यमंत्री याबाबत काहीच बोलत नाहीत. सरकारने मुस्लीम आरक्षणाबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी. मेगाभरती रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे. मात्र यामुळे सर्वच समाजातील वयोमर्यादा संपत आलेल्या तरूणांचे नुकसान होणार आहे. मराठा आरक्षण मिळणार आहे, असे मुख्यमंत्री सांगत आहेत. काँग्रेस सरकारने मराठा समाजाला 16%आरक्षण दिले होते. तेवढ्या जागा मराठा तरूणांसाठी रिक्त ठेवून इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता सरकार मेगाभरती करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. मग आता अचानक भरती रद्द का केली? मराठा आरक्षणाच्या आंदोलनाप्रमाणेच मेगाभरतीचा उपयोग करून मराठा विरूध्द इतर समाज असा संघर्ष निर्माण करण्याचा डाव आहे का? असे प्रश्न खा. चव्हाण यांनी विचारले. 
काँग्रेस सरकारने मराठा व मुस्लीम समाजाला आरक्षण दिले होते. काँग्रेस पक्षाने कधीही आरक्षणाच्या मुद्दयाचे राजकारण केले नाही. सत्ताधारी भाजपानेच आरक्षणावरून राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात शांतता असावी ही आमची इच्छा आहे. त्यामुळे हिंसा व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नये, असे आवाहन आम्ही सातत्याने केले आहे. आज पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी लोकशाही मार्गानेच लढा द्यावा असे आवाहन आम्ही सर्वांना करत आहोत असे खा. चव्हाण म्हणाले. भाजप खा. हिना गावीत यांच्यावरील हल्ल्याची घटना निषेधार्ह असल्याचे सांगून हा शासनाच्या वेळकाढूपणाच्या धोरणाचा परिणाम आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Web Title: How to trust the chief minister repeatedly lying? - Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.