गुरुद्वारा बोर्डाचे ६१ कोटींचे कर्ज माफ - मुख्यमंत्र्यांची घोषणा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 06:27 AM2018-01-01T06:27:54+5:302018-01-01T06:28:02+5:30

गुरु-ता-गद्दी सोहळ्यादरम्यान विकासकामांसाठी नांदेड गुरुद्वारा बोर्डाला दिलेले ६१ कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केली़ फडणवीस हे श्री गुरुगोविंदसिंघजी जयंतीनिमित्त आयोजित प्रकाशपर्व सोहळ्यानिमित्त श्री सचखंड गुरुद्वारा येथे आले होते़

 Gurudwara Board's debt waiver - Chief minister's announcement | गुरुद्वारा बोर्डाचे ६१ कोटींचे कर्ज माफ - मुख्यमंत्र्यांची घोषणा  

गुरुद्वारा बोर्डाचे ६१ कोटींचे कर्ज माफ - मुख्यमंत्र्यांची घोषणा  

Next

नांदेड : गुरु-ता-गद्दी सोहळ्यादरम्यान विकासकामांसाठी नांदेड गुरुद्वारा बोर्डाला दिलेले ६१ कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केली़ फडणवीस हे श्री गुरुगोविंदसिंघजी जयंतीनिमित्त आयोजित प्रकाशपर्व सोहळ्यानिमित्त श्री सचखंड गुरुद्वारा येथे आले होते़
श्री सचखंड गुरुद्वारामध्ये झालेल्या प्रकाशपर्व सोहळ्यास संतबाबा कुलवंतसिंघजी, संतबाबा बलविंदरसिंघजी, पंजप्यारे साहिबान आदींची प्रमुख उपस्थिती होती़ तत्कालीन सरकारने गुरुद्वारा बोर्डाला विकासकामासाठी कर्ज स्वरूपात ६१ कोटी रुपये दिले. त्याची संचिका पाहून आपल्याला आश्चर्य वाटल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले़ आपण गुरूकडून नेहमी घेत असतो, गुरूला देणारे आपण कोण, गुरूला देण्याची ताकद कोणात आहे, असे सांगत गुरुद्वारा बोर्डावरील ६१ कोटींचे कर्ज माफ केल्याचे त्यांनी सांगितले.
शीख धर्मात बलिदानाची परंपरा आहे़ शीख धर्माच्या गुरूंनी समाजाला संघटित करण्यासाठी आहुती दिली आहे़ समाजाला गुलामीपासून दूर ठेवण्यासाठीच गुरूंनी संघर्ष केला. श्री गुरुगोविंदसिंघजी यांनी अतुलनीय शौर्याच्या बळावर खालसा धर्माची स्थापना केली़ समतेचा संदेश देणारा हा पंथ नेहमी समाजाच्या रक्षणासाठी पुढे आला आहे़ नांदेड गुरुद्वारा बोर्डाच्या जमिनीवरील आरक्षण रद्द करण्यासाठी प्रयत्न करू. गुरुगोविंदसिंघजी जयंतीनिमित्त सार्वजनिक सुटीच्या मागणीचाही सकारात्मक विचार करू. गुरुद्वारा परिसरातील दारू दुकाने हटविली जातील, असे ते म्हणाले़
प्रास्ताविकात गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष स़ आ़ तारासिंघ यांनी सरकारी निवासस्थानी पाठ, कीर्तन आयोजित करणारे फडणवीस हे राज्यातील पहिले मुख्यमंत्री असल्याचे सांगितले़ नांदेड-मुंबई, अमृतसर-नांदेड विमानसेवा मुख्यमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे सुरू झाल्याचे ते म्हणाले़

मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न विमानतळानजीक युवा पँथरच्या कार्यकर्त्यांनी केला़ पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेतले़ राष्ट्रवादी काँग्रेसनेही कंधार येथे मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले़

प्रकाशपर्व सोहळ्यास उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संतबाबा कुलवंतसिंघजी, संतबाबा बलविंदरसिंघजी तसेच पंजप्यारे साहिबान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ या वेळी बोर्डाचे अध्यक्ष स़ तारासिंघ, आ़ हेमंत पाटील व गुरुद्वारा बोर्डाचे पदाधिकारी़

Web Title:  Gurudwara Board's debt waiver - Chief minister's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.