Government's claim to fall, Maharashtra's GDP drops | सरकारचा दावा फोल, महाराष्ट्राचा GDP घसरला 

मुंबई  :  राज्याच्या कृषी विकासदरात मोठी घसरण झाली आहे. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेची वाढही मंदावली असल्याचा अंदाज आर्थिक पाहणीमध्ये वर्तवण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कृषी क्षेत्रात 8.3 टक्क्यांची घट झाल्याचं या अहवालात नोंद करण्यात आलं आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्या बजेट सादर करणार आहेत

गेल्या वर्षी कृषी विकास दर 30.7 टक्के होता. पण यंदा यात मोठी घसरण होऊन, हा उणे 14.4 टक्के इतका झाला आहे. अपुऱ्या पावसामुळे हा दर घटल्याचं निरीक्षणही नोंदवण्यात आलं आहे. तसेच कृषी संलग्न क्षेत्रातही लक्षणीय घट अपेक्षित असल्याचेही अहवातून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी (2016-17) राज्याचा विकासदर 10 टक्के होता. पण यंदा यात 2.7 टक्क्यांनी घट होऊन 7.3 टक्के राहण्याचा अंदाज यातून व्यक्त करण्यात आला आहे.  त्यामुळे चालू वर्षी राज्याचा विकास दर 10 टक्के राहण्याचा राज्य सरकारचा दावा फोल ठरला आहे. 

राज्याच्या उत्पन्नापेक्षा खर्च वाढला असल्याचं या अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्याचं गेल्या वर्षी एकूण उत्पन्न 2 लाख 43 हजार कोटी रुपये इतके होतं. पण सरकारने 2 लाख 48 हजार कोटी रुपये खर्च केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे यंदा राज्याच्या तिजोरीत 4,511 कोटीची वित्तीय तूट असल्याचं अहवालातून स्पष्ट करण्यात आलं.


Web Title: Government's claim to fall, Maharashtra's GDP drops
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.