Government will get positive, Sarpanch will get identity cards | सरपंचांच्या मानधन वाढीसाठी शासन सकारात्मक, सरपंचांना मिळणार ओळखपत्र 

मुंबई: ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सरपंच दरबार आयोजित करुन त्यांच्या गावाच्या विकासाबद्दलचे विचार जाणून घेतले. तसेच यावेळी सरपंचांचे मानधनासाठी शासन सकारात्मक असल्याचे सांगून प्रत्येक सरपंचाला  ओळखपत्र देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्रालयातील परिषद सभागृहात आयोजित सरपंच दरबारात म्हणाल्या की, राज्यातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या अनेक योजना अपूर्ण आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याबरोबर नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार आहे. राज्यातील पहिल्यांदा निवडून आलेल्या तरुण सरपंचांची संख्या मोठी आहे. त्यांना गावांच्या विकासाबद्दल आणि शासनाच्या विविध योजनांविषयी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरुवारी सरपंचासाठी वेळ राखून ठेवणार असल्याचे सांगून त्यांच्याशी सामाजिक माध्यमांद्वारे थेट संपर्क साधणार असल्याचे सांगितले. सरपंच हा ग्रामविकासाचा पाया मजबूत करणारा महत्वाचा घटक असल्याने त्याच्याकडून गावाच्या समस्या जाणून घेवून त्या सोडविण्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यांची मोठी समस्या ही शासनाची भविष्यात योजना होऊ शकते असेही त्या म्हणाल्या. 
मंत्री मुंडे म्हणाल्या की, गावात उत्पन्न वाढविण्यासाठी बीओटी तत्वावर व्यापारी संकुल बांधण्यासाठी परवानगी देता येणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या योजनेंतर्गत गावात ग्रामसचिवालय बांधण्यात येणार आहे. ज्यामध्ये गावातील तलाठी, ग्रामसेवक यांच्या कार्यालयासह इतर कार्यालये एकत्रित बांधण्यात येणार आहेत. विविध विकास कामे करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा असून सरपंचांनी याचा गांभीर्याने विचार करावा. सरपंचांनी गावाच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावे असे आवाहन करुन गाव हागणदारीमुक्त, सांडपाणी मुक्त आणि पाणंद मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे.  शासनाच्या विविध निर्णयाचा अभ्यास करुन शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार आदिंचा निधी आणण्यासाठी पाठपूरावा करुन नियोजनपूर्वक कामे केली तर गावांचा विकास होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

गावे स्वयंपूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील, सरपंचांचे योगदान महत्वाचे-
गावे स्वयंपूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून यासाठी सरपंचांचे योगदान महत्वाचे आहे. रोजगार हमी योजनेतून गावातील अनेक कामे होऊ शकतात. फक्त योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. गावात नागरिकांना लागणारी आवश्यक प्रमाणपत्र गावातच मिळण्याची व्यवस्था यापूर्वीच करण्यात आलेली आहे. 

सरपंचांनी मंत्री मुंडे यांचे मानले आभार-

यावेळी सरपंचांनी दिलखुलासपणे मंत्री मुंडे यांच्याशी चर्चा करुन विविध समस्या मांडल्या. मंत्री मुंडे यांनी सर्व प्रश्नांची सकारात्मक उत्तरे दिली. यावेळी सर्व सरपंचांनी सरपंच दरबार आयोजित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. 


 


Web Title: Government will get positive, Sarpanch will get identity cards
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.