वीकेंडला जाताय, मग या ठिकाणांना आवर्जून भेट द्या !

By admin | Published: January 25, 2017 06:34 PM2017-01-25T18:34:20+5:302017-01-25T22:34:44+5:30

आम्ही तुमच्यासाठी मुंबईपासूनच काही तासांच्या म्हणजेच हाकेच्या अंतरावर असणा-या पिकनिक पाइंटची माहिती घेऊन आलो आहोत. तुम्ही ज्यावेळी पिकनिकला जायचा प्लॅन कराल त्यावेळी तुम्हाला नक्कीच ही माहिती उपयोगी पडेल.

Go to Weekend, then visit these places! | वीकेंडला जाताय, मग या ठिकाणांना आवर्जून भेट द्या !

वीकेंडला जाताय, मग या ठिकाणांना आवर्जून भेट द्या !

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - कामाच्या धकाधकीत ब-याचदा आपण स्वत: च्या आवडीनिवडी विसरून जातो, आजूबाजूच्या जगात काय सुरू आहे हे सुद्धा माहीत नसते. मनात एक प्रकारचे कामाचे दडपण असते, त्यातूनच थोडासा विरंगुळा मिळावा म्हणून पिकनिकचे बेत आखतो, मात्र ब-याचदा केलेले नियोजन काही कारणास्तव फिस्कटते. तसेच प्रसिद्ध असलेली पर्यटनस्थळे लांब असल्यामुळे ब-याचदा पिकनिकला जाता येत नाही. याचबरोबर काहींना मुंबईपासूनजवळ असलेले पिकनिक पॉइंट ठाऊक नसतात. मात्र आम्ही तुमच्यासाठी मुंबईपासूनच काही तासांच्या म्हणजेच हाकेच्या अंतरावर असणा-या पिकनिक पॉइंटची माहिती घेऊन आलो आहोत. तुम्ही ज्यावेळी पिकनिकला जायचा प्लॅन कराल त्यावेळी तुम्हाला नक्कीच ही माहिती उपयोगी पडेल. 

चला तर मग जाणून घेऊया मुंबईजवळचे पिकनिक पाइंट...

लोणावळा खंडाळा
मुंबईजवळचा वीकेंड पॉइंट म्हणजे लोणावळा खंडाळा...मुंबईहून 107 ते 110 किलोमीटर अंतरावर ही निसर्गरम्य ठिकाणं वसलेली आहेत. मुंबईपासून 2 तासांवर असलेल्या या ठिकाणाला गेल्या वर्षी ब-याच पर्यटकांनी भेट दिली आहे. मुंबई-पुणे महामार्गावरून जातानाच ही डेस्टिनेशन लागतात. या ठिकाणी तुम्ही ट्रेकिंगचाही आनंद लुटू शकता. बुशी डॅम, लायन्स पॉइंटसारखी प्रेक्षणीय स्थळं इथे पाहायला मिळतील.

काशीद अलिबाग
महाराष्ट्रातील स्वच्छ समुद्रकिना-यांसाठी काशीद बीच प्रसिद्ध आहे. अलिबागपासून 30 किलोमीटरच्या अंतरावर गेल्यास काशीद समुद्रकिना-याचं नयनरम्य दर्शन घडतं. हिवाळ्यातून या पर्यटनस्थळाला भेट दिल्यास वातावरणातील गारवा शरीराला झोंबतो आणि मन प्रफुल्लित होते. पिकनिकसाठी काशीद बीच हे योग्य ठिकाण आहे. मुंबईपासून 135 किलोमीटरच्या अंतरावर हे ठिकाण आहे. अलिबागवरून तुम्ही गाडीनं या ठिकाणासह मुरुड-जंजिराला भेट देऊ शकता, तुम्ही काशीद बीचवर बिनधास्त स्वतःला झोकून देऊ शकता. मुंबईहून मुरुडला काही बसेसही आहेत. या बसचा अलिबागलाही थांबा आहे.

कोलाड
महाराष्ट्रातील ऋषिकेशमधल्या कोलाडला वॉटर राफ्टिंगचा थरार अनुभवता येतो. हिरवेगार आणि धबधब्यांसाठी हे ठिकाणी प्रसिद्ध आहे. वॉटर रॅपेलिंग, ट्रेकिंग, कायाकिंग, रिव्हर झिप लायनिंग आणि इतरही काही गोष्टींची या ठिकाणी मज्जा घेता येते. मुंबईपासून 130 किलोमीटरच्या अंतरावर हे ठिकाण वसलेलं आहे. कोलाड हे मुंबई, नांदेड, लोणावळा आणि इतर प्रसिद्ध ठिकाणांशी जोडले गेलेलं आहे. पावसाळ्यात रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवण्याची मज्जा काही औरच असते. कोलाड हे जंगलाच्या मध्येच वसलेलं असल्यानं इथं आल्यावर सुखद गारव्याची अनुभूती होते.

महाबळेश्वर
उन्हाळ्याच्या दिवसांत थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाराष्ट्रातील महाबळेश्वरकडे आपली पावलं आपसुकच वळतात. मुंबईपासून महाबळेश्वर हे 238 किलोमीटरच्या अंतरावर आहे. महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी गार्डन हे खूप प्रसिद्ध आहे. या हिल स्टेशनवरच्या माप्रो कारखान्याला इथं आलेले पर्यटक आवर्जून भेट देतात. महाबळेश्वरमध्ये वर्षाच्या कोणत्याही ऋतूत हवामान थंडच असते. विशेष म्हणजे मुंबईत उकाडा जाणवत असतानाही इथं हवामान थंड असते.

कामशेत
पॅराग्लायडर्ससाठी कामशेत म्हणजे एक प्रकार स्वर्गच आहे. कामशेत या साहसी पर्यटनासाठी तरुणाईचे आवडते ठिकाण आहे. मुंबईपासून 118 किलोमीटरच्या अंतरावर कामशेत वसलेलं आहे. पॅराग्लायडिंगसह इथं ट्रेकिंगही करता येते. ट्रेकिंगसाठी तरुणाई कोंडेश्वर आणि शेलार कड्याची आवर्जून निवड करतात. पवना लेकही इथलं पाहण्यासारखं ठिकाण आहे. इथे तुम्हाला जाण्यासाठी किफायतशीर पॅकेजही उपलब्ध आहेत. हिवाळ्यात या पर्यटनस्थळाला प्रेक्षक जास्त भेट देतात. भैरी लेणी, कोंडेश्वर मंदिर, बंदर डोंगर आणि इतरही काही पाहण्यासारखी ठिकाणं आहेत.

इगतपुरी
मुंबई-नाशिक महामार्गावरून जाता जाता इगतपुरीत हे पर्यटनस्थळ लागते. इगतपुरीला पर्वत, किल्ले, मंदिरे आणि धबधब्यांच्या रुपानं निसर्गसंपदा लाभली आहे. गेल्या काही वर्षांत इगतपुरी हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून नावारुपाला आलं आहे. विपश्यना आंतरराष्ट्रीय अकादमीला मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असून, ध्यान करतात. ट्रिंगलवाडी आणि रतनगड किल्ले, घाटणदेवी आणि अमृतेश्वर सारखं ऐतिहासिक मंदिर लोकांना आकर्षित करते. इगतपुरीला तरुणाई ट्रेकिंग आणि रॉक क्लायबिंगसाठी भेट देते. अलानगड, मदनगड, कुलंगगडही ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहेत.

दिवेआगर
महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यात दिवेआगर हे पर्यटनस्थळ आहे. येथील गोल्डन गणेश मंदिर आणि स्वच्छ समुद्रकिनारे पर्यटकांना सदोदित आकर्षिक करतात. दिवेआगर मुंबईपासून 170 किलोमीटरच्या अंतरावर आहे. श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरहून तुम्ही दिवेआगरला जाऊ शकता. थंडीच्या दिवसांत म्हणजेच ऑक्टोबर ते जानेवारीदरम्यान इथलं वातावरण आल्हाददायक असते.

भंडारदरा
नाशिक आणि शिर्डीला जाणा-या प्रवाशांना भंडारदरा पर्यटनस्थळ मध्येच लागतं. येथील आर्थर लेक आणि विल्सन धरण हे पर्यटकांचं लक्ष वेधून घेत असतात. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई इथं वसलेले असून, तुम्ही ट्रेकिंगचाही अनुभव घेऊ शकता. तुम्ही इथं 200 वर्षं जुन्या रतनगड किल्ल्यावरही ट्रेकिंग करू शकता. ऑगस्ट ते मार्चमध्ये इथं पर्यटकांना कायम राबता असतो.

कर्नाळा
मुंबईपासून 61 किलोमीटरच्या अंतरावरील कर्नाळा हे अनेकांना आकर्षून घेतं. मुंबईहून गाडीनं निघाल्यास दीड तासात तुम्ही इथे पोहोचू शकता. कर्नाळा किल्ला, शिव मंदिर आणि पक्षी अभयारण्य पाहण्यासाठी पर्यटक इथं आवर्जून भेट देतात. कर्नाळामधील हे तीन ठिकाणं पाहण्यासारखी आहेत. इथं काही दुर्मीळ प्रजातीचे पक्षीही दृष्टिक्षेपात पडतात. मलबार पक्षी, मॅगपाई रॉबिन आणि नाइटिंगलसारखे पक्षीही पर्यटकांना आकर्षिक करून घेतात.

Web Title: Go to Weekend, then visit these places!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.