ऑनलाइन लोकमत
वाशी : भरधाव वेगातील दुचाकीस्वाराने पुढील दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका माजी सैनिकाचा मृत्यू झाला़ ही घटना रविवारी दुपारी औरंगाबाद- सोलापूर महामार्गावरील कन्हेरी फाट्याजवळ घडली़. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाशी शहरातील बाबा बलभीम जगताप हे रविवारी दुपारी त्यांच्या दुचाकीवरून (क्ऱएम़एच़२५- ए़ई़७१६१) औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरून जात होते़ जगताप हे कन्हेरवाडी पाटीजवळून शेताकडे वळत असताना पाठीमागून आलेल्या पारडी येथील माजी सैनिक कोंडाजी मोहम्मद शेख (वय-६०) यांच्या दुचाकीने (क्ऱ एम़एच़२५- ए़ई़ ६२९६) समोरील दुचाकीला जोराची धडक दिली़ या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कोंडाजी शेख यांचा जागीच मृत्यू झाला. तर बाबा जगताप हे किरकोळ जखमी झाले़. त्यांच्यावर वाशी येथील ग्रामीण रूग्णालयात डॉ. रामराजे माळी यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी उस्मानाबादकडे रेफर केले़

दरम्यान, माजी सैनिक कोंडाजी शेख यांचे सैन्यात असताना दोन्ही पाय निकामी झालेले होते. कृत्रीम पायावरच त्यांची दैनंदिनी चालत होती. सध्या ते एका खासगी कंपनीच्या पाण्याच्या बाटल्या विक्रीचा व्यवसाय करत होते. त्यांच्या पाश्च्यात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. या अपघाताची वाशी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ अधिक तपास हवालदार भाऊसाहेब बोबडे, रामराजे शिंदे हे करीत आहेत़