लोककलेच्या जागराने दुमदुमले नाट्यसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 06:08 AM2018-06-16T06:08:05+5:302018-06-16T06:08:05+5:30

सलग ६० तास चालणाऱ्या ९८व्या नाट्यसंमेलनाचे फलित काय? असा प्रश्न सर्वसामान्य प्रेक्षकाला आणि रंगकर्मींना संमेलनाआधी पडला होता. मात्र, मुंबई, पुण्याच्या बाहेरही रंगभूमी आहे, याची प्रचिती गुरुवारी पहाटे कालिदास नाट्यमंदिरात उपस्थित असलेल्या प्रत्येक रसिकाला आणि मराठी रंगभूमीवरील प्रत्येक सेलिब्रेटीला आली.

 The folk dance drama | लोककलेच्या जागराने दुमदुमले नाट्यसंमेलन

लोककलेच्या जागराने दुमदुमले नाट्यसंमेलन

Next

- अजय परचुरे
मुंबई : सलग ६० तास चालणाऱ्या ९८व्या नाट्यसंमेलनाचे फलित काय? असा प्रश्न सर्वसामान्य प्रेक्षकाला आणि रंगकर्मींना संमेलनाआधी पडला होता. मात्र, मुंबई, पुण्याच्या बाहेरही रंगभूमी आहे, याची प्रचिती गुरुवारी पहाटे कालिदास नाट्यमंदिरात उपस्थित असलेल्या प्रत्येक रसिकाला आणि मराठी रंगभूमीवरील प्रत्येक सेलिब्रेटीला आली. गुरुवारी मध्यरात्री ‘लोककला जागर’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध लोककलांचा याची देही याची डोळा अनुभव त्यांना घेता आला. उपस्थित प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवत या लोककलाकारांना दाद दिली. विदर्भातील झाडेपट्टी रंगभूमी, दंडार, कोकणातला दशावतार, नमन मराठवाड्यातील आदिशक्तीचे पारंपरिक नृत्य, अशा एकापाठोपाठ एक ताकदीच्या लोककला पाहून रसिक अचंबित झाले.
अठरापगड जातीच्या महाराष्ट्रात अनेक लोेककला आहेत. ग्रामीण भागातील या लोककला आणि तेथील रंगकर्मींमध्ये जबरदस्त ताकद असते. फक्त त्यांना गरज असते, ती मोठ्या व्यासपीठाची. नाट्यपरिषदेने मुलुंडच्या नाट्यसंमेलनात ही संधी या लोककलावंताना उपलब्ध
करून दिली. लोककलेच्या या जागराने मुंबईकरांनाही अवाक करून सोडले. मराठवाड्यातील आदिशक्ती महिशासूर पारंपरिक नृत्याने या लोककला जागर कार्यक्रमाला सुरुवात झाली. सलग १५ मिनिटे श्वास रोखून ठेवणारे पारंपरिक नृत्य उस्मानाबादच्या लोककलाकारांनी सादर केले. विशाल शिंगाडे या तरुण रंगकर्मीने या नृत्याचे दिग्दर्शन केले होते.
या संमेलनात सर्वात चर्चेचा विषय होता, तो विदर्भातील झाडेपट्टी रंगभूमीचा. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आदी भागांत रात्रभर चालणाºया या झाडेपट्टीच्या नाटकांविषयी मुंबईकरांमध्ये आणि खास करून मराठी कलाकारांमध्ये उत्सुकता होती. मुक्ता बर्वे, समीर विध्वंस, अद्वेत दादरकर, इरावती कर्णिक, समीर चौघुले, मनमीत पेम, अतुल तोडणकर, भारत गणेशपुरे, अनिता दाते, संतोष पवार ही रंगभूमीवरील मंडळी झाडेपट्टीचा आस्वाद घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उपस्थित होती. झाडेपट्टी रंगभूमीची नाटके ही सहसा रात्रभर चालतात. चंद्रपूरच्या चंद्रकमल थिएटर्सने फक्त ‘संसार’ अर्थात, ‘भोवरा’ हे शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावरील नाटक सादर
केले. कोणताही भव्य सेट नसतानाही, अभिनयाच्या जोरावर झाडेपट्टीच्या कलाकारांनी मुंबईकरांना मंत्रमुग्ध
केले. आपल्या कलेला मान्यवर रंगकर्मींचीही भरभरून दाद मिळतेय, हा अनुभवही या लोककलाकारांसाठी मोलाचा होता.
कोकणातील दशावतार, नमन यालाही रसिकांनी भरभरून दाद दिली. पहाटे १ वाजता सुरू झालेला ‘लोककला जागर’ हा कार्यक्रम उपस्थित प्रेक्षकांच्या टाळ्यांनी आणि वन्स मोअरनी पहाटे ६ पर्यंत अविरत सुरू होता. वाड्या, वस्त्या, लहान गावांमध्ये कमी प्रेक्षकांमध्ये आपल्या कलेचे सादरीकरण करणाºया या लोककलाकारांना नाट्यपरिषदेने मोठे व्यासपीठ तर मिळवून दिलेच. मात्र, मुंबईकर रसिकांनाही अभिरूची संपन्न असलेल्या या लोककलांचा आस्वाद घेता आला.

आमच्यासाठी हे खूप मोठे स्वप्न आहे, असे आम्ही मानतो. इतक्या मोठ्या व्यासपीठावर आम्ही पहिल्यांदाच काम करतोय. आमच्या झाडेपट्टी रंगभूमीच्या कलाकारांना आज एक मोठी संधी मिळाली. मला आनंद या गोष्टींचा वाटला की, रंगभूमीवरील मान्यवर कलाकारांनी आमच्या प्रयोगाला दाद तर दिलीच आणि नंतर प्रत्यक्ष भेटून भरभरून कौतुकही केले. मी नाट्यपरिषदेचा खूप आभारी आहे की, आम्हाला रंगभूमीच्या मुख्य धारेत आणण्यासाठी तुम्ही आम्हाला खूप मोलाची मदत केलीत.
- शेखर डोंगरे, अभिनेता,
दिग्दर्शक, झाडेपट्टी रंगभूमी
झाडेपट्टी रंगभूमीबद्दल फक्त ऐकून होतो. रात्रभर चालणाºया नाटकांबाबत मला अभिनेता म्हणून खूप मोठी उत्सुकता होती. कोणताही भव्य सेट नसतानाही या कलाकारांनी केलेला सहजसुंदर अभिनय निश्चित दाद देण्यासारखा आहे. रंगभूमीवर असे प्रयोग सर्रास व्हायला हवेत, असे मला वाटते.
- समीर चौघुले, अभिनेता

Web Title:  The folk dance drama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.