वीजबिल रोखीने भरण्यासाठी आता पाच हजारांची मर्यादा, विनामर्यादा वीजबिल भरण्यासाठी ‘ऑनलाईन’ सेवा उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 08:37 PM2021-10-26T20:37:25+5:302021-10-26T20:38:15+5:30

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार महावितरणकडून वीजबिलांच्या भरण्याद्वारे रोखीने स्वीकारण्यात येणाऱ्या रकमेवर १ नोव्हेंबरपासून निर्बंध लागू करण्यात आले आहे.

Five thousand limit for cash electricity bill payment, online service available for unlimited payment of electricity bills | वीजबिल रोखीने भरण्यासाठी आता पाच हजारांची मर्यादा, विनामर्यादा वीजबिल भरण्यासाठी ‘ऑनलाईन’ सेवा उपलब्ध

वीजबिल रोखीने भरण्यासाठी आता पाच हजारांची मर्यादा, विनामर्यादा वीजबिल भरण्यासाठी ‘ऑनलाईन’ सेवा उपलब्ध

Next

मुंबई - महावितरणच्या सर्व वर्गवारीतील ग्राहकांना येत्या सोमवारपासून वीजबिल रोखीने भरण्यासाठी दरमहा पाच हजार रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र वीजग्राहकांना केव्हाही व कुठूनही विनामर्यादा रकमेचे वीजबिल भरण्यासाठी महावितरणचे मोबाईल अॅप तसेच www.mahadiscom.in या संकेतस्थळावर ‘ऑनलाईन’ सेवा उपलब्ध आहे. ही सेवा सोयीची व सुरक्षित असून महावितरणचे ७५ लाख ग्राहक दरमहा ‘ऑनलाईन’ वीजबिल भरीत आहेत.  

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार महावितरणकडून वीजबिलांच्या भरण्याद्वारे रोखीने स्वीकारण्यात येणाऱ्या रकमेवर १ नोव्हेंबरपासून निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्याप्रमाणे ग्राहकांना वीजबिलांचा रोखीने भरणा करण्यासाठी यापुढे पाच हजार रुपयांची मर्यादा राहणार आहे. परंतु त्यापेक्षा अधिक रकमेचे वीजबिल भरण्यासाठी ‘ऑनलाईन’ सेवा उपलब्ध आहे. तसेच धनादेशाद्वारे देखील रक्कम स्वीकारली जाणार आहे. तथापि मुदतीनंतर धनादेश क्लीअर झाल्यास विलंब आकार शुल्क आणि कोणत्याही कारणास्तव धनादेश अनादरित झाल्यास प्रत्येक वीजबिलासाठी ७५०/- रुपये बँक अॅडमिनिस्ट्रेशन चार्जेस व त्यावरील १८ टक्के जीएसटी कराचे १३५/- रुपये असे एकूण ८८५/- रुपये ग्राहकांना भरावे लागणार आहे.

वीजबिलांपोटी पाच हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम भरण्यासाठी 'ऑनलाईन'ची सोय उपलब्ध आहे. महावितरणचे www.mahadiscom.in हे संकेतस्थळ तसेच महावितरण मोबाईल अॅपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे, 'ऑनलाईन' भरणा करणे तसेच मागील पावत्या व तपशील पाहणे ग्राहकांसाठी घरबसल्या शक्य आहे. एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांचे बील भरण्यासह इतर सेवा उपलब्ध आहे. तसेच क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बॅकींग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगद्वारे भरणा केल्यास वीजबिलामध्ये ०.२५ टक्के (५००/- रुपयांच्या मर्यादेत) सूट देण्यात येत आहे. क्रेडीटकार्ड वगळता सर्व 'ऑनलाईन'द्वारे होणारा भरणा हा निःशुल्क आहे. 

वीजबिलांचा 'ऑनलाईन' पद्धतीने भरणा करणे सोयीचे व सुरक्षित आहे. या पद्धतीला भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) पेमेंट व सेटलमेंट कायदा २००७ च्या तरतुदी लागू आहेत. तसेच 'ऑनलाईन'द्वारे वीजबिल भरणा केल्यानंतर ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे पोच दिली जाते. वीज बिल भरण्यासंदर्भात काही तक्रार किंवा शंका असल्यास ग्राहक helpdesk_pg@mahadiscom.in या ईमेलद्वारे महावितरणशी संपर्क साधू शकतात. सद्यस्थितीत महावितरणचे ७५ लाख ग्राहक दरमहा सुमारे १४०० कोटी रुपयांच्या वीजबिलांचा 'ऑनलाईन'द्वारे भरणा करीत आहेत. 

तसेच लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती किंवा सोसायट्यांच्या ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध आहे. त्यासाठी या ग्राहकांच्या वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देण्यात येत आहे. वीजग्राहकांनी कोरोना महामारीच्या काळात रांगेत उभे राहून किंवा इतर व्यक्तींच्या संपर्कात येण्याऐवजी 'ऑनलाईन'द्वारे वीजबिलांचा भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
 

Web Title: Five thousand limit for cash electricity bill payment, online service available for unlimited payment of electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.