फोफावतोय वैचारिक दहशतवाद

By admin | Published: May 30, 2017 03:20 AM2017-05-30T03:20:40+5:302017-05-30T03:20:40+5:30

आजकाल उंटावर बसून शेळ्या हाकणाऱ्या विद्वानांची संख्या वाढली आहे. प्रसारमाध्यमांवर देशाच्या सुरक्षेसंदर्भात नको त्या विषयांवर

Fascinating ideological terrorism | फोफावतोय वैचारिक दहशतवाद

फोफावतोय वैचारिक दहशतवाद

Next

पुणे : आजकाल उंटावर बसून शेळ्या हाकणाऱ्या विद्वानांची संख्या वाढली आहे. प्रसारमाध्यमांवर देशाच्या सुरक्षेसंदर्भात नको त्या विषयांवर चर्चा घडतात आणि वाट चुकलेले विचारवंत सैन्याच्या विरोधात बोलतात. भारतात सध्या वैचारिक दहशतवाद फोफावला आहे. देशद्रोही लोकांपासून देशाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे आवाहन ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले.
शिवधनुष्य प्रतिष्ठानच्या वतीने दुर्ग शिवनेरी ते दुर्गदुर्गेश्वर रायगड या पायी पालखी सोहळ्यानिमित्त लालमहाल येथे शिवधनुष्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी महाजन बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ लेखक व दुर्ग अभ्यासक प्र. के. घाणेकर, छायाचित्रकार सुरेश तरलगट्टी, संदीप भोंडवे यांना क्रीडा पुरस्कार, शीतल कापशीकर यांना शाहिरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी महापौर मुक्ता टिळक प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, सरसेनापती येसाजी कंक यांचे वंशज शशिकांत कंक, सरदार कृष्णाजी नाईक बांदल यांचे वंशज करणराजे बांदल, पिलाजीराव सणस यांचे वंशज बाळासाहेब सणस, शिवशाही संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित थोपटे आदी या वेळी उपस्थित होते. शाहीर हेमंत मावळे व शाहीर हिंगे कला प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनी पोवाडे,ऐतिहासिक गीते सादर केली.
महाजन म्हणाले, ‘भारतात चीन आणि पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी हल्ले होत आहेत. चीनने भारतावर आर्थिक घुसखोरी आणि आक्रमणही केले आहे. अशा वेळी नागरिकांनी स्वदेशी वस्तूंच्या खरेदीवर भर देऊन चिनी वस्तूंची होळी केली पाहिजे.
दहशतवादी हल्ल्यांना आळा घालण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्क होणे गरजेचे
आहे. आपले घर, परिसर सुरक्षित असेल तर देशही सुरक्षित राहू शकतो. देशाच्या सुरक्षेला घातक ई-मेल, एसएमएस येत असल्यास सायबर पोलिसांना तत्काळ माहिती देणे गरजेचे आहे. नागरिकांनी कान आणि डोळे उघडे ठेवून वावरणे गरजेचे आहे.’

युद्धाचा अपारंपरिक मार्ग
काश्मीरमध्ये मेजर गोगोई यांनी केलेल्या कारवाईचे त्यांनी समर्थन केले. ‘लढाईला कोणतेही नियम नसतात. काश्मीरमध्ये जे युद्ध लढले जात आहे ते अत्यंत अपारंपरिक आहे. भारतीय सैन्याला अपारंपरिक मार्गच चोखाळावा लागणार आहे. छत्रपती शिवरायांनी हेच केले होते. आपली ताकद शत्रूपेक्षा कमी असते तेव्हा शत्रूला बेसावध पकडून त्याच्यावर हल्ला करणे म्हणजे गनिमी कावा होय. आजचे विचारवंत तेव्हा असते, तर शाहिस्तेखानावर वार करण्याबद्दल त्यांनी छत्रपतींनाही प्रश्न विचारले असते, असे ते म्हणाले. जे राजकीय पक्ष सैनिकांच्या विरोधात बोलतील त्यांना आम्ही मतदान करणार नाही, असे लोकांनी सांगायला हवे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

शिवरायांच्या कर्तृत्वाचा, नेतृत्वाचा ठसा जनतेवर उमटला आहे. हे श्रद्धास्थान जगाला परिचित होणे आवश्यक आहे. शिवरायांची वीरता, शौर्य, आस्था काही अंशी आपल्यामध्ये रुजली तरच आपण स्वत:ला त्यांचे पाईक म्हणवून घेऊ.
- मुक्ता टिळक, महापौर

देशाला सशक्त करण्यात महाराष्ट्राची, मराठी माणसाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. समाजात तरुणांना विधायक कामांसाठी प्रोत्साहित करणे हे आपले कर्तव्य आहे. सशक्त, भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, विज्ञाननिष्ठ आणि समृद्ध भारत हे आपले स्वप्न आहे. स्वप्न साकार करण्यासाठी शिवाजीमहाराज, संभाजीमहाराज यांचा मूलमंत्र उपयुक्त ठरणार आहे.
- पांडुरंग बलकवडे, इतिहासतज्ज्ञ

Web Title: Fascinating ideological terrorism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.