विश्वास, आशा आणि प्रीती हीच येशूची त्रिसूत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 02:48 AM2018-12-23T02:48:10+5:302018-12-23T02:49:05+5:30

मंगळवारी ख्रिसमस अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस. ख्रिस्तीबांधवांकरिता हा सण मोठा आहे. ख्रिसमस साजरा करतानाच सामाजिक भान जपत ख्रिस्तीबांधव शिक्षण, आरोग्य, ज्येष्ठ, अपंग अशा अनेक क्षेत्रांत व्यापक सामाजिक कार्य करत आहेत. त्याचाच हा आढावा...

 Faith, hope and love are the trio of Jesus | विश्वास, आशा आणि प्रीती हीच येशूची त्रिसूत्री

विश्वास, आशा आणि प्रीती हीच येशूची त्रिसूत्री

Next

- प्रवीण क्षेत्रे

डोंबिवली शहरात राहणारे ख्रिस्तीबांधव बाहेरून आलेले आहेत. आजमितीस डोंबिवलीत तेरापेक्षा जास्त चर्च आहे. त्यामध्ये मार्थोमा, कॅथलिक, न्यू लाइफ फेलोशिप, सीएनआय, नाजयेरियन, सेंट थॉमस, ब्रदर अ‍ॅन असेंब्ली, मेथोडीस्ट, बॅक्टीस, चर्च आॅफ गॉड, असेंब्ली आॅफ गॉड, पेंटाकॉस्ट आदी चर्चचा त्यात समावेश आहे. या चर्चमधून विविध भाषांतून प्रार्थना केली जाते. त्याचबरोबर डोंबिवलीत जवळपास १२ कॉन्व्हेंट शाळा आहे. या शाळांतून ख्रिस्तीधर्मीय मुलांसोबत अन्य धर्मांची मुलेही शिक्षण घेत आहेत. शिक्षणाचा दर्जा चांगला असल्याने अन्य धर्मांतील पालकांचा त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कॉन्व्हेंट स्कूलकडे ओढा आहे. ही बाब समाजाला सुखावणारी आहे. चर्चमधून प्रभू येशू ख्रिस्ताची उपासना वर्षभर केली जाते. आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे प्रभू येशूचा जन्मदिवस २५ डिसेंबर. ख्रिसमस हा सण आमच्यासाठी मोठा सण आहे. प्रभूच्या जन्मोत्सवानिमित्त यापूर्वी शहरातील लोक एकत्रित येत होते. आता एकत्रित येण्याचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत वाढले आहे. पूर्वी समाजबांधवांची संख्या शहरात कमी होती. आता ती वाढत आहे.

डोंबिवलीत जवळपास एक लाख ख्रिस्तीबांधव वास्तव्य करत आहेत. या सगळ्यांच्या प्रार्थनेसाठी असलेले चर्च आणि समाजाची काळजी वाहण्यासाठी ख्रिश्चन असोसिएशन कार्यरत आहे. विविध चर्चमध्ये काम करणारे पास्टर यांचा मिळून एक गट आहे. पास्टर म्हणजेच फादर. त्याला मराठी ख्रिस्तीबांधव बाबा, पप्पा असेही संबोधतात. ३५ फादरचा मिळून गट आहे. फादर हे ख्रिस्ती असोसिएशनशी संलग्न आहेत. आम्ही सगळी मंडळी मिळून सगळ्या समाजांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो. विचारविनियम करतो. ख्रिस्तीबांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातात. प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण ‘प्रत्येकाला मदत करा’, अशी आहे. हेच तत्त्व जोपासून मदतीवर भर दिला जातो. समाज विखुरलेला आहे. त्याला एकत्रित करून सर्व प्रकारची मदत कशी होईल, यावर भर दिला जातो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवानिमित्त शहरातून ‘शांतियात्रा’ काढली जाते. त्यात शहरातील सर्व चर्चचे सदस्य, फादर आणि समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात. या शांतियात्रेतून शांततेचा संदेश समस्त लोकांपर्यंत पोहोचवला जातो. डोंबिवली पश्चिमेतून या यात्रेला सुरुवात होते. तिचा समारोप होली एंजल्स शाळेत होतो. त्याठिकाणी सामूहिक प्रार्थना केली जाते. प्रार्थनेपश्चात त्याठिकाणी स्नेहभोजन घेतले जाते. प्रभू येशूंनी त्यांच्या शिष्यासोबत जेवण घेतले होते. प्रभूंनी आपले रक्त सांडले. त्याचे प्रतीक म्हणून वाइन दिली जाते. तसेच ब्रेड दिला जातो. प्रभूने सुळावर जाऊन शरीराचे बलिदान दिले. ब्रेड अर्थात भाकरी हे प्रभूच्या शरीराचे प्रतीक आहे. त्यामुळे प्रसादाच्या स्वरूपात भाकरी व वाइनचा अंश प्रत्येकाला दिला जातो. येशूची शिकवण विश्वास, आशा आणि प्रीती या त्रिसूत्रीवर आधारित आहे. त्यातही प्रीती ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आपल्यात देव आहे. देवाच्या कृपेने आपण आहोत. त्यामुळे आपल्यावर आपण जसे प्रेम करतो, त्याचप्रमाणे प्रभूवर प्रेम करा. त्याचबरोबर शेजाऱ्यांवरही प्रेम करा.

समाजाच्या आरोग्यव्यवस्थेसाठी समाजबांधवांनी मोठी रुग्णालयेच सुरू केलेली आहेत. त्यात माफक दराने आरोग्यसेवा पुरवली जाते. त्याचबरोबर समाजबांधवांच्या मुलांसाठी शाळा काढलेल्या आहेत. त्या शाळांतून दिले जाणारे शिक्षण उच्च दर्जाचे आणि इंग्रजी माध्यमाचे आहे. आरोग्य व शिक्षणाच्या माध्यमातून समाजस्तर सुधारण्यावर भर दिला जातो. थंडीच्या दिवसांत रस्त्यावर झोपलेल्या निराधार लोकांना पांघरुणांचे वाटप केले जाते. ते झोपेत असताना ते घालून कार्यकर्ते निघून जातात. केलेल्या समाजकार्याची कुठेही वाच्यता केली जात नाही. वृद्धाश्रमात जाऊन ज्येष्ठांशी संवाद साधला जातो. त्यांना बायबलची प्रत मोफत भेट दिली जाते. अनाथाश्रमातील मुलांना जेवण दिले जाते. अनाथ मुलांचा वाढदिवस साजरा केला जातो. त्यांच्या चेहºयावरील व जीवनातील आनंद हाच प्रभूचा प्रसाद समजला जातो. झोपडपट्टीत जाऊन अन्नदान केले जाते. जुने कपडे गोळा करून त्यांचे वाटप केले जाते. तुरुंगात जाऊन बायबलचे वाटप करतो. कैद्यांची शिबिरे घेतो. तुरुंगातून बाहेर आलेल्यांकडे जास्त लक्ष दिले जाते. त्यांना रोजगार मिळवून दिला जातो. त्यांचे पुनर्वसन करण्यावर समाजाचा भर असतो.

बंगळुरू येथील रेव्हरंड विल्यम जॉन हे ११०० अनाथ मुलांना जेवण देतात. त्यांची व्यवस्था करतात. ११ हजार अनाथ मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी घेण्याचा त्यांचा मानस आहे. ख्रिश्चन असोसिएशनने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक योजना तयार केली आहे.
त्यांना तीन प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका दिल्या जातील. त्या सोडवून घेतल्या जातील. समाजातील अनुभवी व्यक्तींकडून या तयार केलेल्या आहेत. आवश्यकता भासल्यास प्रश्न व उत्तरपत्रिका तपासून देण्याची सोय आहे. या योजनेंंतर्गत विद्यार्थ्यांना १० हजार रुपयांचे प्रथम, साडेसात हजार रुपयांचे दुसरे आणि पाच हजार रुपये तिसºया क्रमांकाचे पारितोषिक दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांचा एक लाखाचा विमा काढला जाणार आहे. अपंग विद्यार्थ्यांनाही मदत केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना खाजगी मार्गदर्शन केले जाईल. केंद्र व राज्य सरकारतर्फे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती ख्रिस्ती समाजाच्या विद्यार्थ्यांसह जैन, मुस्लिम विद्यार्थ्यांनाही मिळवून दिली जाणार आहे. त्यांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी मदत केली जाणार आहे. ही योजना २५ डिसेंबरपर्यंतच आहे.

प्रभू येशू या जगात पुन्हा लवकरच येणार आहे. यापूर्वी दोन हजार वर्षांपूर्वी आला होता. ख्रिस्ती धर्मात दोन प्रकारे कालगणना केली जाते. ख्रिस्तपूर्व आणि ख्रिस्तपश्चात. प्रभू दोन हजार वर्षांपूर्वी या जगात आला, तो मनुष्याला तारण्यासाठी. मनुष्याच्या मोक्षाकरिता, पापाची क्षमा करण्यासाठी येशूने आपले पवित्र रक्त सांडले. पापात हरवलेल्या लोकांच्या क्षमेसाठी, मुक्तीसाठी आणि मोक्षासाठी प्रभू आले. पापांची क्षमा करण्यासाठी ख्रिश्चन सोसायटीतर्फे आमचे धर्मोपदेशक सुवार्ता करतात. सुवार्ता म्हणजे चांगली वार्ता, चांगली बातमी. ही चांगली बातमी काय तर प्रभूच्या शिकवणीच्या आधारे चाला. प्रभू नक्की परत येणार आहे, हा विश्वास आम्ही समाजबांधवांना देतो.
येशूच्या जन्माची तारीख २५ डिसेंबर आहे, यावर ठाम मत नाही. त्याचा बायबलमध्ये कुठेही उल्लेख नाही. त्याकाळचा समाज मेंढपाळ होता. थंडीचे दिवस होते. त्याच्या अनुमानावरून जन्मतारीख २५ डिसेंबर अशी नमूद करण्यात आली आहे. तिला धर्माच्या उच्चस्तर धर्मगुरुंनी मान्यता दिल्याने ती मान्यताप्राप्त झाली. त्यानुसार, प्रभूच्या जन्माचा उत्सव ख्रिसमस २५ डिसेंबरला साजरा केला जातो.
(लेखक ख्रिश्चन असोसिएशनचे सेक्रेटरी आहेत.)
- शब्दांकन : मुरलीधर भवार

Web Title:  Faith, hope and love are the trio of Jesus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Christmasनाताळ