सुरेश भटेवरा / नवी दिल्ली
शिवसेनेच्या मागणीनुसार गृह मंत्रालयाने एलफिस्टन रोड स्थानकाचे प्रभादेवी नामकरणास मंजुरी दिली. उर्वरित ८ रेल्वे स्थानकांच्या नावातला बदल लवकरच मंजूर होईल, अशी माहिती गृहमंत्री राजनाथसिंग यांनी खासदार अरविंद सावंत, दिवाकर रावते व श्रीरंग बारणे यांना दिली.
एलफिस्टन रोडचे नाव प्रभादेवी, बॉम्बे सेंट्रलचे नाना शंकरशेठ, ग्रँटरोडचे गावदेवी, चर्नी रोडचे गिरगाव, मध्य रेल्वेच्या करी रोडचे लालबाग, सँडहर्स्ट रोडचे डोंगरी, कॉटन ग्रीनचे काळा चौकी आणि रे रोडचे घोडपदेव करण्याची सेनेची मागणी आहे. राज्य सरकारचा आलेला प्रस्ताव, गृह मंत्रालय आपल्या शिफारशीसह रेल्वे मंत्रालयाकडे पाठवते. रेल्वे मंत्रालयाने त्यास मंजुरी दिल्यानंतर तो अंतिम मंजुरीसह गृह मंत्रालयामार्फत राज्य सरकारकडे पाठवला जातो. या प्रक्रियेनुसार एलफिस्टन रोडचे नाव प्रभादेवी करण्यास गृह मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. याशिवाय महाराज असा उल्लेख जोडण्यासाठी छत्रपती शिवाजी टर्मिनसचे नाव सीएसएमटी करावे आणि छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टचे सीएसएमआयए करावे, अशी शिवसेनेची मागणी आहे. 
चर्नी रोडचे नाव का बदलायचे?
चर्नी रोड हे स्टेशन असलेल्या भागात एके काळी भरपूर कुरण होते आणि गायी व अन्य जनावरे तिथे चरण्यासाठी जात. त्यामुळे तो भाग चरणी म्हणून ओळखला जायचा. तिथे नारळ, आंबा, केळी यांच्या बागा होत्या आणि त्यावरून तिथे आजही त्या नावाच्या वाड्या आहेत. चरणीतून पुढे चर्नी रोड हे नाव आले. ते इंग्रजी अधिकाऱ्याचे नाव नाही. त्यामुळे त्याचे गिरगाव असे नामकरण कशासाठी हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
लॅबर्नमचाही झाला होता वाद
ग्रँट रोडहून चौपाटीकडे जाणाऱ्या गावदेवी भागातील लॅबर्नम रोडचे नाव बदलण्याचीही शिवसेनेने पूर्वी मागणी केली होती. महात्मा गांधी जिथे काही काळ राहिले, ते मणि भवन तिथे आहे. लॅबर्नम हे ब्रिटिश अधिकाऱ्याचे नव्हे, तर फुलाचे नाव आहे. त्या रस्त्यावर लॅबर्नमची झाडे असल्यानेच त्याला लॅबर्नम रोड हे नाव दिले गेले होते.