“हिंदू धर्माचे सण आल्यानंतरच उद्धव ठाकरे यांना ही नाटकं का सुचतात?”

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 07:13 PM2023-11-11T19:13:56+5:302023-11-11T19:14:28+5:30

उबाठा गटाचे काही लोक बिल्डिंग मटेरियलचा धंदा थाटून बसले होते. शाखा भाड्याने दिली होती. शाखा भाड्याने देणे हे आईच दूध विकून खाण्याचा प्रकार आहे असं शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे म्हणाल्या.

Eknath Shinde group criticized Uddhav Thackeray over his visit to Mumbra Sakha | “हिंदू धर्माचे सण आल्यानंतरच उद्धव ठाकरे यांना ही नाटकं का सुचतात?”

“हिंदू धर्माचे सण आल्यानंतरच उद्धव ठाकरे यांना ही नाटकं का सुचतात?”

मुंबई –  हिंदू धर्माचे सण उत्सव आल्यानंतरच उद्धव ठाकरे यांना ही नाटकं का सुचतात? हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार आणि तत्वांना बुलडोझर लावून उद्धव ठाकरे यांनी सत्ता मिळवली. अनेक सण उत्सवावर निर्बंध लागले होते आणि आता निर्बंध मुक्त सण उत्सव साजरे होत आहेत. आज दिवाळी सारखा अत्यंत मोठा सण होताना दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी होऊ नये असे उद्धव ठाकरे यांना वाटते का? प्रत्येक वेळी हिंदूंच्या सण उत्सवाला गालबोट लावण्याचे काम ते का करतात असा सवाल शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे यांनी विचारला आहे.

ज्योती वाघमारे म्हणाल्या की, मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात केवळ अडीच दिवस मंत्रालयात उपस्थिती दर्शवली हा विश्वविक्रम उद्धव ठाकरे यांनी केला. सत्तेवर असताना त्यांना शिवसेना शाखा व कार्यकर्ता दिसला नाही. आज मुंब्रा शाखेला भेट द्यायला निघालेत मात्र आज उशीर झाला आहे. वेळीच हे काम केलं असतं तर आज घर का ना घाट का अशी स्थिती झाली नसती. संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे, अशा परिस्थितीत राजकीय चिखल फेकीचे वातावरण महाराष्ट्रात निर्माण केले गेले आहे. अत्यंत दुर्दैवी हा प्रकार आहे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत मुंब्रा शाखा ही धर्मवीर आनंद दिघे यांनी घेतली होती. त्या शाखेचे जे प्रमुख आहेत, त्यांचे वय ७५ वर्षापेक्षा अधिक आहे. ते जगताप हे शिवसेना शिंदे गटासोबत आहेत. ही शाखा शिवसेनेची आत्मा आहे. या शाखेत अनेक वर्ष समाजकारण आणि सेवा घडायचे. मात्र आज तिथे उबाठा गटाचे काही लोक बिल्डिंग मटेरियलचा धंदा थाटून बसले होते. शाखा भाड्याने दिली होती. शाखा भाड्याने देणे हे आईच दूध विकून खाण्याचा प्रकार आहे. तुम्ही तुमचा पक्ष शरद पवार यांना भाड्याने दिला. मुंबई महापालिका कॉन्ट्रॅक्टरला भाड्याने दिली. तुमचं सरकार काँग्रेसला भाड्याने दिले आणि अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी भाड्याने देऊन जगण्याचे राजकारण तुम्ही करत आहात. असा घणाघाती आरोप शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी केला.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला आमदार जितेंद्र आव्हाड, खा. संजय राऊत हे यापूर्वी जातीय दंगली घडविण्याची भाषा करीत होते. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सामाजिक धार्मिक समता धोक्यात आणून महाराष्ट्रात राजकारणाची पोळी भाजणार आहात का? खासदार संजय राऊत यांनी आता पिंजरा व पोपट घेऊन सगळ्यांचे भविष्य सांगत बसावे. तेवढेच काम आता त्यांना उरले आहे. वास्तविक पाहता त्यांनी स्वतःच्या भविष्याची चिंता करावी असं वाघमारे यांनी राऊतांना म्हटलं आहे.

Web Title: Eknath Shinde group criticized Uddhav Thackeray over his visit to Mumbra Sakha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.