वाढत्या घटस्फोटामुळे ‘ पत्रिका’ बघण्याकडे सुशिक्षितांचा वाढतोय कल....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 06:00 AM2019-05-29T06:00:00+5:302019-05-29T10:15:17+5:30

सध्या तरूण-तरूणींसाठी  ‘लग्न’ हा विषय अत्यंत गंभीर बनला आहे. का वाटते तरुणांना पत्रिका महत्वाची.. जाणून घ्या..!

Due to increasing divorce, watching the 'janmapatrika' is going on. | वाढत्या घटस्फोटामुळे ‘ पत्रिका’ बघण्याकडे सुशिक्षितांचा वाढतोय कल....

वाढत्या घटस्फोटामुळे ‘ पत्रिका’ बघण्याकडे सुशिक्षितांचा वाढतोय कल....

Next
ठळक मुद्देपुरोगामी म्हणविल्या जाणा-या महाराष्ट्रात पत्रिकांचा अवैज्ञानिक आधार

नम्रता फडणीस

पुणे : समाजातील घटस्फोटांचे वाढते प्रमाण पाहिल्यानंतर सुशिक्षित कुटुंबांना भविष्यात मुलामुलींची लग्न टिकतील की नाही याचीच आता धास्ती वाटू लागली आहे. मन जुळण्यासाठी दोघांचे गुण जुळणे आवश्यक असल्याने सुशिक्षित तरूण-तरूणींचा ओढा पत्रिका पाहण्याकडे वाढला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एकविसाव्या शतकात लग्न ठरविताना तरूणी-तरूणी आरोग्यदृष्ट्या सुदृढ आहेत की नाही हे पाहण्यापेक्षा पुरोगामी म्हणविल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात पत्रिकांचा अवैज्ञानिक आधार घेतला जातोय, मात्र यामुळे घट्स्फोट रोखले जातील का? असा एक नवा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

सध्या तरूण-तरूणींसाठी  ‘लग्न’ हा विषय अत्यंत गंभीर बनला आहे. पूर्वीच्या काळी लग्न जमविताना मुलगा-मुलगी एकमेकांना पाहण्याआधी त्यांची पत्रिका जुळते का? हे पाहिले जायचे. मध्यंतरीच्या काळात सुशिक्षित कुटुंबानी पत्रिका बघण्याच्या इतिकर्तव्याला काहीसा फाटा दिला होता. मात्र, आता पुन्हा पत्रिका बघण्याचा ‘ट्रेंड’ सुशिक्षित कुटुंबामध्ये जोर धरू लागला आहे. दोघांचे किती गुण जुळतायत? नाडी एक तर नाही ना? षडाष्टक योग तर नाही ना? अशा चर्चा कुटुंबांमध्ये ऐकायला मिळत आहेत. लग्न ठरविताना दोघांचे मनोमिलन होईल की नाही, त्यांच्यात भविष्यात वादविवाद तर होणार नाहीत ना? याचीच अनेक सुशिक्षित कुटुंबाना काळजी सतावू लागली आहे. समाजात वाढत असलेले घट्स्फोटाचे प्रमाण हे यामागचे प्रमुख कारण आहे . मुली नोकरीनिमित्त घराबाहेर पडल्याने त्यांना आर्थिक स्वातंत्र्य आले आहे. त्यामुळे त्या कोणत्याही प्रकारे नव-याशी तडजोड करण्यास तयार नाहीत. त्यामुळे दोघांच्यातील वाद विकोपाला गेले की एका झटक्यात घटस्फोटाचा मार्ग दोघांपैकी एकाकडून स्वीकारला जात आहे. त्यामुळे भविष्यात ही घट्स्फोटाची जखम होऊ नये आणि ती लग्नाला मारक ठरू नये यासाठी सुशिक्षित कुटुंबांनी पत्रिकेचा आधार घेतला असल्याचे ज्योतिष अभ्यासकांकडून सांगितले जात आहे. मात्र पत्रिका बघूनही अनेकांचे घटस्फोट झाले आहेत अशी अनेक उदाहरणे आहेत. मग त्याचे काय? पत्रिका त्यांचे घटस्फोट का रोखू शकली नाही?असा सवाल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उपस्थित  केला आहे. 

घटना 1 

दोघं एकमेकांना आवडली. मात्र दोघांच्या पत्रिका बघायच्या असा दोन्हीकडच्या कुटुंबियांचा अट्टहास होता. पत्रिका दाखविल्यानंतर मुलाचे आयुष्य अल्प आहे. तो फारकाळ जगणार नाही असे ज्योतिषांनी पत्रिका बघून सांगितले. त्यानंतर तो मुलगा सहा महिन्यातच वारला असल्याचे एका कुटुंबाकडून सांगण्यात आले. वाढत्या घटस्फोटांमुळे पत्रिका बघण्याकडे सुशिक्षितांचा ओढा वाढला हे खरं आहे. पूर्वीच्या काळी महिला जास्त शिकलेल्या नसायच्या. त्यामुळे त्या तडजोड करून लग्न टिकवायच्या. मात्र आता मुली स्वत: नोकरी करू लागल्या आहेत. त्यांना आर्थिक स्थैर्य मिळत आहे. तडजोडपणाची वृत्ती राहिलेली नाही. हेच घटस्फोटाचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे लग्नाचा विचार करताना पत्रिका पाहून मन जुळतील की नाही? मतभेद तर होणार नाहीत ना? हे जाणून घेण्यासाठी पत्रिका पाहण्यावर जोर दिला जात आहे- चंद्रकांत शेवाळे, प्रसिद्ध ज्योतिषतज्ञ

लग्न जुळविताना पत्रिकेच्या माध्यमातून किमान मुलभूत गोष्टी पाहायल्या हव्यात या मताचा मी आहे. त्यामध्ये दोघांची नाडी एकच नाही ना? गुण किती जुळतात? किमान 18 गुण जुळतात का? हे पाहिले गेले पाहिजे. मुलीच्या पत्रिकेत कोणता प्रॉब्लेम नाही ना? ज्याने भविष्यात कोणत्या अडचणी येतील. हे पाहायला हवे. काही थोड्याफार तडजोडी या कराव्याच लागतात. पण घटस्फोटापर्यंत गोष्टी जाणार नाहीत ना? हे किमान जाणून घ्यायला हवं- सूरज पानसे, तरूण
.......................

मुळात ज्यांचा घटस्फोट झालाय त्यांनी पत्रिका पाहिल्या होत्या का ? याचे सवर््हेक्षण करायला हवे. पत्रिका पाहिल्यानंतरही अनेक जोडप्यांचे घटस्फोट झाल्याची  अनेक उदाहरणे आहेत. पत्रिकेपेक्षाही स्वभाव जुळणे आवश्यक आहे. दोघेही आरोग्यदृष्ट्या सुदृढ आहेत का नाही? हे पाहायला हवे. लग्न जुळविताना पत्रिका पाहाणे हे पूर्णत: अवैज्ञानिक आहे-  डॉ. मिलिंद देशमुख, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
 

Web Title: Due to increasing divorce, watching the 'janmapatrika' is going on.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.