डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची युनोतील जयंती सरकारच्या विरोधामुळे रद्द, डॉ. मुणगेकरांच्या पोस्टने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2018 02:48 PM2018-03-24T14:48:33+5:302018-03-24T14:48:33+5:30

युनोच्या जनरल असेंब्ली हॉलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यास मोदी सरकारने विरोध केल्याने तो रद्द केला गेल्याचा आरोप काँग्रेसचे माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केला आहे.

Dr. Babasaheb Ambedkar birthday celebration canceled due to government's opposition | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची युनोतील जयंती सरकारच्या विरोधामुळे रद्द, डॉ. मुणगेकरांच्या पोस्टने खळबळ

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची युनोतील जयंती सरकारच्या विरोधामुळे रद्द, डॉ. मुणगेकरांच्या पोस्टने खळबळ

Next

मुंबई :  मोदी सरकारवर आरोप करणारी पोस्ट काँग्रेसचे माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली आहे. युनोच्या जनरल असेंब्ली हॉलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यास मोदी सरकारने आक्षेप घेतल्याचा  आरोप त्यांनी केला आहे. भारताच्या युनोतील कायमस्वरुपी राजदुताने आक्षेप घेतल्याने तो सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी लोकमत ऑनलाइनशी बोलताना दिली आहे. युनोसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर बाबासाहेबांच्या जयंती सोहळ्यास आक्षेप घेतला गेल्याच्या चर्चेने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. 

भालचंद्र मुणगेकर यांनी फेसबुकवर केलेली पोस्ट स्फोटक ठरली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी थेट मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांची पोस्ट पुढीलप्रमाणे आहे: “युनोने जनरल असेंब्ली हॉलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याची परवानगी दिली होती. पण मुख्य आयोजकांनी आताच मला मेलने कळवले की मोदी सरकारने युनोला परवानगी नाकारण्यास कळवले आहे. बाबासाहेबांच्या कोट्यवधी अनुयायांच्या वतीने भारतीय घटनेच्या शिल्पकारांचा अपमान केल्याबद्दल मोदी सरकारचा मी निषेध करतो.”

डॉ.मुणगेकर यांच्या या पोस्टनंतर आंबेडकरी चळवळीत प्रचंड खळबळ माजली. सरकारविषयी संताप व्यक्त होऊ लागला. मात्र मागूनही डॉ.मुणगेकर सदर मेलबद्दल माहिती देत नसल्याने संभ्रमही निर्माण झाला. मात्र, आंबेडकरी चळवळीतील डॉ.विजय कदम यांनी लोकमत ऑनलाइनला सदर वादासंदर्भातील मेल आणि चॅटची माहिती दिली. 

लोकमत ऑनलाइनकडे असलेल्या कागदपत्रांनुसार युनोचे महासचिव अँटिनिओ गुटेरेश यांना यासंदर्भात एक पत्रही पाठवण्यात आले आहे. २३ मार्च रोजी पाठवलेले हे पत्र इंटरनॅशनल कमिशन फॉर दलित राइट, फाऊंडेशन फॉर ह्युमन हॉरिझॉन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, बोस्ट स्टडी ग्रुप या आणि अन्य संघटनांनी पाठवले आहे. या पत्रात युनोतील कायमस्वरुपी भारतीय राजदूत बाबासाहेबांच्या जयंती सोहळा आयोजनात सहकार्य करण्याऐवजी तो रद्द करण्यासाठी प्रभावित करत असल्याबद्दल निषेध करण्यात आला आहे. पत्रातील महत्त्वाचा मजकूर पुढीलप्रमाणे आहे.

२०१६ पासून आम्ही बाबासाहेबांचा जयंती सोहळा युनोतील असेंब्ली हॉलमध्ये साजरा करतो. यावेळी गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, आयबीएमसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या सहभागामुळे तो ऐतिहासिक ठरणार होता, असेही नमूद केले आहे. ‘मानवतेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) वापर’ या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला होता, ज्यासाठी जगभरातून महत्त्वाच्या व्यक्ती येणार होत्या. मात्र अचानक भारत सरकारच्या कायमस्वरूपी राजदूतांनी समर्थन मागे घेतानाच, कार्यक्रमच रद्द करण्याचे सुचवून धक्का दिला आहे, असेही पत्रात म्हटले आहे. त्यामुळेच आता युनोने पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित करू द्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

फाऊंडेशन फॉर ह्युमन हॉरिझॉनचे दिलीप म्हस्के यांना युनोने नकार कळवला असला. तरी ते कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे डॉ.कदम यांनी सांगितले आहे. 

मोदी सरकारचा विरोध नाही, जयंती युनोमध्ये साजरी होणारच!

दरम्यान, या वादाविषयी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी बाबासाहेबांच्या जयंतीला मोदी सरकारचा विरोध नसल्याचा दावा केला आहे. असे कोणतेही पत्र मोदी सरकारकडून देण्यात आलेले नाही. मात्र जयंतीला विरोध करणे कधीही निषेधार्हच असल्याचेही आठवले यांनी ठासून सांगितले. तसेच दिलीप म्हस्के यांच्या प्रयत्नांना आपली साथ असून जयंतीचे कार्यक्रम युनोच्या सभागृहात होणारच असा दावाही त्यांनी केला. 

Web Title: Dr. Babasaheb Ambedkar birthday celebration canceled due to government's opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.