अण्णांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांना चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 06:34 AM2019-02-01T06:34:55+5:302019-02-01T06:35:13+5:30

दीड किलो वजन घटले; सरकारकडून दोन दिवसांत दखल नाही

Doctor's concern about Anna's health | अण्णांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांना चिंता

अण्णांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांना चिंता

Next

राळेगणसिद्धी : उपोषणामुळे अण्णा हजारे यांचे वजन पहिल्या दोन दिवसातच दीड किलोने घटले आहे. वयामुळे अण्णांचा रक्तदाबही अनियमित असल्याने त्यांनी जास्त काळ उपोषण करणे धोक्याचे आहे, असा सल्ला डॉक्टरांच्या पथकाने गुरुवारी दिला. अण्णा मात्र उपोषणावर ठाम आहेत. पहिल्या दोन दिवसात अण्णांशी सरकारकडून कुणीही संपर्क केलेला नाही. जिल्ह्यातील स्थानिक प्रशासकीय अधिकारीही राळेगणकडे फिरकलेले नाहीत.

लोकपाल कायद्याची अंमलबजावणी, राज्यांमध्ये लोकायुक्ताचा कायदा, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी या मागण्यांसाठी अण्णांनी बुधवारपासून उपोषण सुरू केले आहे. यादवबाबा मंदिरात हे उपोषण सुरू आहे. राज्य सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन हे अण्णांच्या आंदोलनात शिष्टाई करत होते. मात्र, दिल्लीबाबत काहीच निर्णय घेऊ शकत नसल्याने त्यांना शिष्टाईसाठी येण्यासही अण्णांनी व गावकऱ्यांनी नकार दिला.

अण्णांचे दोन दिवसातच १ किलो ७०० ग्रॅम वजन घटले आहे. अण्णा सध्या ८१ वर्षांचे आहेत. अण्णांनी तीन दिवसांपेक्षा अधिक काळ उपोषण केल्यास त्यांच्या अवयवांना गंभीर धोका पोहोचू शकतो, असे डॉ. पोटे यांनी सांगितले. अण्णांना मौन पाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण बोलण्यानेही त्यांच्यातील शक्ती कमी होत आहे.

सरकार लोकशाहीचा गळा घोटतेय : अण्णा हजारे
जनलोकपालच्या मागणीसाठी देशभर विविध राज्यात आंदोलने सुरु होत आहे. मात्र, सरकार या आंदोलकांवर दडपशाही करुन आंदोलने दडपत आहे, असे अण्णा म्हणाले. अण्णांच्या पाठिंब्यासाठी १५ राज्यात ३५ ठिकाणी आंदोलने सुरु झाली आहेत. तसेच राज्यात २५ जिल्ह्यांच्या ठिकाणी व वेगवेगळ्या ७३ गावांमध्ये गुरुवारी आंदोलन झाले, अशी माहिती भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाच्या वतीने देण्यात आली.

मुंबईतील डब्यावाल्यांचाही पाठिंबा
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील डब्यावाल्यांनीही पुढाकार घेतला आहे़ डब्यावाल्यांच्या मुलांनी शुक्रवारी राळेगणसिद्धी येथे येऊन अण्णांची भेट घेतली़

हजारे यांना मुख्यमंत्र्यांच्या पत्रासह भेटणार
नाशिक : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी पुन्हा जातानाच मुख्यमंत्र्यांचे पत्र घेऊन जाणार असल्याचेही गिरीश महाजन यांनी सांगितले. अण्णांच्या ८० टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत. अण्णांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहनही महाजन यांनी केले.

Web Title: Doctor's concern about Anna's health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.