देवेंद्रभौंनी एका वाक्यातच सांगून टाकलं, 'मुख्यमंत्री कुणाचा'!; तुम्ही ऐकलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 01:24 PM2019-06-20T13:24:20+5:302019-06-20T13:41:17+5:30

आता शिवसेनेच्या वाघालाही फार गुरगुरता येईल असं वाटत नाही.

Devendra Fadnavis give hint on CM post while attending Shiv Sena Melava with Uddhav Thackeray | देवेंद्रभौंनी एका वाक्यातच सांगून टाकलं, 'मुख्यमंत्री कुणाचा'!; तुम्ही ऐकलंत का?

देवेंद्रभौंनी एका वाक्यातच सांगून टाकलं, 'मुख्यमंत्री कुणाचा'!; तुम्ही ऐकलंत का?

Next
ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय प्रगल्भतेचाच प्रत्यय शिवसेनेच्या स्थापना मेळाव्यात आला.शिवसेनेनं भाजपासोबत जागावाटपाचा ५०-५० फॉर्म्युला निश्चित केला आहे.वाघ-सिंहाची जोडी एकत्र येते, तेव्हा जंगलात राज्य कोणाचं हे सांगावं लागत नाही', असं सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अभ्यासू वृत्ती आणि हुशारी अनेकांना अनेक वर्षांपासून ठाऊक आहे. परंतु, गेल्या पाच वर्षात अनेक प्रसंगांमध्ये त्यांनी स्वतःला मुरब्बी राजकारणी म्हणूनही सिद्ध केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या याच राजकीय प्रगल्भतेचाच प्रत्यय काल शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्यात आला. युतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कुणाचा असेल, भाजपा-शिवसेना अडीच-अडीच वर्षांसाठी हे पद वाटून घेणार का, यावरून सुरू असलेल्या चर्चेचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात देऊन टाकलं. हे वाक्य इतकं सूचक आहे की, आता शिवसेनेच्या वाघालाही फार गुरगुरता येईल असं वाटत नाही.

लोकसभा निवडणुकीआधी युती करतानाच, शिवसेनेनं भाजपासोबत जागावाटपाचा ५०-५० फॉर्म्युला निश्चित केला आहे. परंतु, मुख्यमंत्रिपदाबाबत त्यांचं काय ठरलंय, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात बरेच तर्कवितर्कही लढवले जात आहेत. या खुर्चीच्या वाटपावरून मोठा भाऊ-छोटा भाऊ यांच्यात थोडे रुसवे-फुगवेही असल्याचं बोललं जातंय. काही शिवसैनिकांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यासाठीच मोर्चेबांधणी सुरू केल्याचं दिसतंय. त्यामुळे शिवसेनेच्या कालच्या ५३व्या स्थापना मेळाव्याबद्दल उत्सुकता होती. कारण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी एकाच मंचावर येणार होते. त्यांच्या बोलण्यातून मुख्यमंत्रिपदाच्या वाटपाबाबत काही संकेत मिळतात का, याकडे सगळ्यांचे कान लागले होते. बहुधा, त्यांची ही इच्छा ओळखूनच देवेंद्रभौंनी 'मन की बात' वेगळ्या शब्दांत सांगून टाकली.

'भाजपा-शिवसेना एकत्र आहेत आणि राहतील. वाघ-सिंहाची जोडी एकत्र येते, तेव्हा जंगलात राज्य कोणाचं हे सांगावं लागत नाही', असं सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केलं. त्याचा एक अर्थ युतीचं सरकार येईल, असा असला तरी, जंगलाचा राजा वाघ नव्हे सिंह असतो, हेही त्यातून प्रतीत होतं. वाघ हे शिवसेनेचं, तर सिंह हे भाजपाचं प्रतीक आहे. त्यामुळे जंगलाचा राजा सिंह याचा अर्थ मुख्यमंत्री भाजपाचाच असाही घेता येतो. 


उद्धव ठाकरे यांचा उल्लेख देवेंद्र फडणवीसांनी 'माझे मोठे बंधू' असा केला. आमचं सगळंच ठरलं आहे, योग्य वेळी जाहीर करू. तुम्ही युतीच्या विजयासाठी सज्ज व्हा, असं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांना केलं. उद्धव यांनीसुद्धा, मुख्यमंत्रिपदाबाबत आमचं ठरलंय, कोणी चिंता करू नये, अशी पुस्ती जोडली. अर्थात, युतीत सगळं समसमान असलं पाहिजे, अशी एक 'पुडी' सोडून उद्धव यांनी शिवसैनिकांच्या आशा पल्लवित केल्या. मुख्यमंत्र्यांकडे पाहून ते हसलेसुद्धा. पण नंतर लगेचच, आपण कार्यक्रमांबद्दल बोलतोय, युतीच्या कार्यक्रमात दोन्ही पक्षांचे नेते हवेत, असं म्हणत त्यांनी विषय बदलला.


दरम्यान, शिवसेनेच्या स्थापना मेळाव्याला अन्य राजकीय पक्षाचा नेता उपस्थित राहिलाय, त्यानं भाषण केलंय, असं अनेक वर्षांत घडलं नव्हतं. परंतु, उद्धव यांनी देवेंद्र फडणवीसांना आग्रहाचं आमंत्रण केलं. देशातील हवा पाहिल्यानंतर, विधानसभा निवडणूकही एकत्र लढवली पाहिजे आणि त्यासाठी एकीचा संदेश राज्यभरात पोहोचला पाहिजे, हा हेतू त्यामागे होता. तसंच, मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडू लागलेल्या शिवसेनेतील नेत्यांना सूचक इशारा देण्याची उद्धवनीती म्हणूनही त्याकडे पाहिलं गेलं होतं.

 



 

Web Title: Devendra Fadnavis give hint on CM post while attending Shiv Sena Melava with Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.