महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना ठरविण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत त्वरित बैठक घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 05:57 PM2017-10-24T17:57:15+5:302017-10-24T18:19:18+5:30

To convene an emergency meeting with the officials to decide the safety measures for women. | महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना ठरविण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत त्वरित बैठक घेणार

महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना ठरविण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत त्वरित बैठक घेणार

Next

 मुंबई - मुंबईतील महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर राज्याच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्यमंत्री  दीपक केसरकर यांनी आज डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या निवेदनावर दिले.

मागील काही दिवसांत महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत सातत्याने होत असलेली वाढते प्रमाण पाहून आ. डॉ. गोऱ्हे यांनी आज मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले आणि या विषयाची चर्चा केली.

मुंबईमध्ये  उपनगरीय रेल्वे प्रवास करताना तरुणीवर होणारे हल्ले, महिलांसाठीच्या डब्यात पुरुषांचे अचानक प्रवेश करणे, महिलांच्या डब्याशेजारील जागेत बसून अंगविक्षेप व हातवारे करणे, महिलांना गर्दीत त्रास देणे अशा प्रकारचे विकृत व विपरीत वर्तन करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. महिलांना कमी गर्दीच्या आणि रात्रीच्या वेळी सुरक्षित वातावरणात प्रवास करता यावा यासाठी नवनवीन उपाययोजना रेल्वे आणि गृह खात्याच्या संयुक्त सहकार्याने राबविण्यात येण्याची आवश्यकता या निमित्ताने अधोरेखित होत आहे. याबाबत तत्काळ तक्रार करण्यासाठी अथवा मदतीसाठी आता कोणतीही सबळ यंत्रणा उपलब्ध नाही. महिलांना रेल्वे प्रवासात अधिकाधिक असुरक्षितता भासत आहे. या पार्श्वभूमीवर आज आ.  डॉ. गोऱ्हे यांनी हे निवेदन दिले.

महिला सुरक्षा आणि अत्याचाराबाबत अनेक संस्था संघटना गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात काम करीत आहेत. या सर्व कामाचा परिपाक म्हणून राज्यात बलात्कार विरोधी कायदा लागू केला गेला. याची परिणीती महिलांना काही प्रमाणात दिलासा मिळण्यात झाली. परंतु महिला संरक्षणाकरिता अधिक प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या हेतूने राज्य सरकारने महिला सुरक्षितता व संरक्षणाच्या विषयावर अभ्यास करण्यासाठी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीच्या सन्माननीय सदस्य म्हणूनही आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काम पहिले होते. या समितीने राज्य शासनाला आपला अंतरिम अहवाल सन २०१३ मध्ये (अहवाल प्रसिद्धी तारीख – २९ नोव्हेंबर २०१३) दिला होता. यातील ४१ शिफारशी गृह विभागाशी संबंधित आहेत. या शिफारशींची अंमलबजावणी अधिक वेगाने आणि त्वरीत होण्याच्या उद्देशाने आ. डॉ. गोऱ्हे यांनी आज दोन्ही मंत्री महोदयांची भेट घेतली होती. याची मा. मुख्यमंत्री व गृहराज्य मंत्र्यांनी तत्काळ दखल घेत त्यांनी ताबडतोब याबाबत बैठक घेण्याची सूचना अधिकाऱ्याना दिली.

याबाबत उपाययोजना निश्चित करण्याच्या हेतूने चर्चा करण्यासाठी रेल्वे, गृह विभागाचे अधिकारी आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत ही बैठक होणार आहे. यामुळे या विषयावर आता सकारात्मक कार्यवाही होईल अशी आशा निर्माण झाली आहे.   

पुणे शहरात धायरी परिसरात दिनांक २१ ऑक्टोबर २०१७ रोजी एका अडीच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याची घटना घडली होती. या घटनेतील आरोपी पकडला गेला असला तरी त्याची चौकशी होऊन दोषी असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.बऱ्याचदा लहान मुला – मुलींच्या बाबत घडणाऱ्या अशा घटनांमध्ये जवळच्या आरोपी नातेवाईकांमधीलच कोणीतरी असण्याची शक्यता असते. या अनुषंगाने शहरी भागात बीट स्तरावर महिला दक्षता व नागरिक सुरक्षा दले स्थापन करून त्यांच्या मदतीने त्या त्या भागातील दुर्गम व निर्जन भागात अधिकाधिक लक्ष देण्यात यावे अशी मागणी आ. डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री आणि गृह राज्यामंत्र्याकडे केली आहे. यावर सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी अशा सूचना ताबडतोब देऊन याबाबत एक बैठका घेण्यात येईल, असे सांगितले. 

Web Title: To convene an emergency meeting with the officials to decide the safety measures for women.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.