‘तरुण भारत’वरून काँग्रेसने भाजपाला घेरले

By admin | Published: February 27, 2016 04:53 AM2016-02-27T04:53:30+5:302016-02-27T04:53:30+5:30

भाजपाने उकरून काढलेल्या नॅशनल हेराल्ड प्रकरणाला ‘जशास तसे’ प्रत्युत्तर देताना काँग्रेसने तरुण भारत या दैनिकाचा मुद्दा उपस्थित केला आहे. भाजपाने हे वृत्तपत्र चालविणाऱ्या

The Congress surrounds the BJP on 'Tarun Bharat' | ‘तरुण भारत’वरून काँग्रेसने भाजपाला घेरले

‘तरुण भारत’वरून काँग्रेसने भाजपाला घेरले

Next

- शीलेश शर्मा,  नवी दिल्ली
भाजपाने उकरून काढलेल्या नॅशनल हेराल्ड प्रकरणाला ‘जशास तसे’ प्रत्युत्तर देताना काँग्रेसने तरुण भारत या दैनिकाचा मुद्दा उपस्थित केला आहे. भाजपाने हे वृत्तपत्र चालविणाऱ्या श्री मल्टी मीडिया व्हिजन लिमिटेडला (एसएमव्हीएल) कर्ज दिले आहे. त्यामुळे आता अर्थमंत्री अरुण जेटली या भाजपावर कारवाई करणार का, असा सवाल काँग्रेसने राज्यसभेत केला.
काँग्रेसने महाराष्ट्रातील घोटाळ्यांचा मुद्दा उपस्थित करीत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. नफा कमावणाऱ्या व्यावसायिक कंपनीचे कार्यालय भाजपाच्या कार्यालयातून कसे चालविले जात आहे, असा सवाल विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि रणदीप सूरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत केला. या दोन नेत्यांनी संबंधित दस्तऐवज सादर करीत हे कायद्याचे उल्लंघन असल्याचे स्पष्ट केले. केशव कुंजनेसुद्धा सदर कंपनीला २० लाख रुपयांचे कर्ज दिले आहे. रा.स्व. संघाचे दिल्लीतील कार्यालय असलेले केशवकुंज ते हेच काय? याचे उत्तर देशाला दिले जावे, अशी मागणी त्यांनी केली.
२०१२-१३च्या आयकर रिटर्नमध्ये भाजपाने तरुण भारतला दिलेले कर्ज या वृत्तपत्राकडे पैसा नसल्यामुळे परत होऊ शकणार नाही, असे स्पष्ट केले होते. एसएमव्हीएल ही कंपनी तरुण भारतचे प्रकाशन करते. व्यावसायिक हित आणि पदाची गोपनीयता यांच्यात संघर्ष उभा ठाकत असेल तर कारवाई व्हायला नको काय, असा सवालही या दोन नेत्यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केला. विनोद तावडे हे मंत्री असूनही अनेक कंपन्यांचे संचालक बनले आहेत. हे कसे काय? तरुण भारतचे संपादक दिलीप करंबेळकर आणि तावडे यांच्यांत कोणते व्यावसायिक संबंध आहेत,हे मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट करावे. ज्या २४ नावांची शिफारस करण्यात आली त्यात समावेश नसतानाही करंबेळकर यांना मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाचे अध्यक्ष बनविण्यात आले. तावडेंनी मुख्यमंत्र्यांचा सल्ला न घेताच अन्य नावे हटवत करंबेळकर यांना अध्यक्ष कसे बनवले यामागचे रहस्य उघड व्हावे, अशीही मागणी काँग्रेस नेत्यांनी केली.
गडकरींचा मित्तल यांच्याशी कोणता संबंध?
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे श्री मल्टी मीडिया व्हिजन लिमिटेडमध्ये रवींद्र बोरटकर यांच्यासोबत भागभांडलदार आहेत. त्यांनीही ही माहिती आयोगापासून लपून ठेवली आहे. प्रतिज्ञापत्रात या गुंतवणुकीचा उल्लेख नाही. राम मित्तल यांच्याशी गडकरी यांचा काय संबंध आहे, याचाही खुलासा केला जावा. कारण मित्तल यांचा एका घोटाळ्यात काळ्या यादीत समावेश असतानाही त्यांना महामार्ग प्राधिकरणात (एनएचएआय) मोठे कंत्राट दिले जात आहे. मित्तल यांनी कोणाच्या इशाऱ्यावरून एसएमव्हीएलला १५ लाखांचे कर्ज दिले आहे. मोदी, शहा, जेटली आणि गडकरी यांनी सर्व आरोपांचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही या नेत्यांनी केली.

Web Title: The Congress surrounds the BJP on 'Tarun Bharat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.